Tuesday, December 5, 2017

कपूरवंशम...

आमच्याकडे बाहेर चालू असलेले संभाषण , वॉर्डबॉय, आयाबाई आणि रिसेपशनिस्ट मधील

-कौन मर गया रे कल ?

-राज कपूर

-अरे मरे हुए को क्यू मार रही है ? राज कपूर बरसो पहले मरा है ।

-वो करीना का बाप मर गया ना ?

-अरे, करीना का बाप रणधीर है, वो जिंदा है अभी ।

-फिर कौन मरा ?

-शशी कपूर

-शशी कपूर के रशी कपूर ?(ही शुद्ध लेखनाची चूक नाहीये , जसं ऐकलं तसाच लिहितेय )

-रशी नाही भाई , शशी

-अरे वो गोलमाल-2 मे है ना, उस का बाप मर गया ।( म्हणजे कोण ते मला कळलं नाही)

पण अशा रीतीने पूर्ण कपूर खानदानाचा वध झाला आज आमच्याकडे !

Sunday, December 3, 2017

पार्ले कट्टा : एक सुगंधी अनुभव

आमच्याकडे खूप सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात-त्यातला एक म्हणजे पार्ले कट्टा.वर्षातले सहा महिने, दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी, संध्याकाळी पाच वाजता ,माझ्या घराजवळच्या एक छोट्याशा उद्यानात हा कार्यक्रम होतो.यावर्षीचा या उपक्रमाला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत.म्हटलं तर घरगुतीच -प्रमुख पाहुण्यांचं स्वागत चाफ्याची परडी देऊन केलं जातं आणि त्यांच्यासाठी थर्मोस मधून चहा आणला जातो..

कट्ट्याचे काही कार्यक्रम मी पूर्वी पाहिले आहेत मी,पण हल्ली 5 ची वेळ फार त्रासाची असते.शनिवारीसुद्धा 7 पर्यंत ऑफिस असल्याने गेले अनेक महिने मी हा कार्यक्रम पाहू शकले नव्हते.

या शनिवारी सुद्धा थोडी दोलायमान परिस्थिती होती. लगेच 6 वाजता त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मराठी आणि हिंदी गाण्यांचा कार्यक्रम होता. मी हावरेपणाने दोन्ही कार्यक्रम पहायचे असं ठरवूनसुद्धा टाकलं. पण प्रथम प्राधान्य : पार्ले कट्ट्याला , कारण तिथे माझे आवडते निवेदक अंबरीश मिश्र यांची मुलाखत होती.

लवकर पोचल्याने मला अगदी पुढे जागा मिळाली. साठे उद्यानात हा कार्यक्रम होतो, ज्याला आम्ही पार्लेकर त्रिकोणी  बाग म्हणतो . गवतावर मांडलेल्या खुर्च्या , आजूबाजूचे वृक्ष, मधेच आपल्या मांडीवर येऊन पडणारी झाडाची वाळकी पानं,वातानुकूलित सभागृहाला लाजवेल असा गारवा,ओलसर मातीचा आणि नुकत्याच पाणी घातलेल्या झुडपांचा ताजा वास यासारखी वातावरणनिर्मिती एखाद्या बंदिस्त नाट्यगृहात कशी मिळेल ?

(कार्यक्रमाची सुरुवात सौ.कुलकर्णी यांच्या काव्यवाचनाने झाली. मला कविता कळतीलच अस नाही, हे पुन्हा एकदा जाणवलं.अर्थात, कळल्या नाहीत,तरीही मी सर्व कवितांना उत्साहाने टाळ्या वाजवल्या.)

मिश्रजींनी निवेदन केलेला एक गाण्याचा कार्यक्रम मी दोनेक वर्षांपूर्वी पहिला होता, त्यानंतर मी संधी मिळेल तेव्हा त्यांना ऐकायचं असं ठरवलं होतं. त्या कार्यक्रमात मी त्यांची अस्खलित हिंदी , त्यांची मराठी आणि त्यांचं हिंदी गाण्यांबद्दल असलेलं सखोल ज्ञान यांनी प्रभावित झाले होते.

कालची मुलाखत प्रज्ञा काणे ह्यांनी फार छान घेतली, मिश्र अत्यंत रसाळ आणि रंजक अशा मराठीतून बोलत होते. त्यांची आई कोकणातली असल्याने आणि त्यांचं बालपण गिरगावात गेल्याने त्यांना मराठीबद्दल प्रेम वाटू लागलं आणि वाचनामुळे त्यांची भाषा समृद्ध झाली.भाषा ही केवळ संवादासाठी नाही तर अभिव्यक्तीसाठीही आहे त्यामुळं आशयाबरोबर तिचं सौन्दर्यही अबाधित राहील ही काळजी आपण सर्वानीच घ्यायला हवी असं ते म्हणतात. त्यांचं हिंदी चित्रपट आणि सिनेसंगीत याबद्दलचं प्रेम , त्यांची पत्रकारिता जी ऑल इंडिया रेडिओ वर सुरू होऊन टाइम्स ऑफ इंडिया पर्यंत आली, जिथे ते अजूनही कार्यरत आहेत, या सर्व प्रवासाचे ,त्यांना भेटलेल्या प्रभावी व्यक्तींचे सुरेख वर्णन त्यांनी केले. गुलजार यांची दोन पुस्तके त्यांनी मराठीत अनुवादित केली आहेत, तसेच त्यांचे स्वतंत्र लिखाण आणि काव्य याबद्दलही ते बोलले. कार्यक्रमाचा शेवट त्यांनी स्वतःची एक गज़ल गाऊन केला, त्यांना सुरेल गाताही येतं हा त्यांचा एक नवाच पैलू समोर आला.

या कार्यक्रमाने इतका आनंद दिला की यानंतर गाण्याच्या कार्यक्रमालाही जायचे होते हेही विसरून गेले .

आता त्यांची पुस्तकं पुन्हा एकदा वाचणार आहे… ( ‘शुभ्र काही जीवघेणे’ … किती सुंदर नाव !)