Wednesday, April 6, 2016

पुन्हा एकदा गलका ... (यावेळी पद्य !)

फेरफटका जगात मारून
पुन्हा आले स्वतःशी.,
खरेच मजला पुन्हा कळाले ,
माझे आहे मजपाशी !

नको वाटतो गोंधळ-गलका
नकोच ती वादावादी
सतत प्रश्न ,अभिवादन नेहमी
काय अर्थ या संवादी ?

प्रत्यक्ष भेटुनी नजर भिडवूनी
चेहरा वाचत बोलावे
मोडित निघाली प्रथाच आता
दुखणे कोणा सांगावे

सतत हाती असतो तो फोन
बोटांचे जणू नृत्य चालते
शुभप्रभात आणि शुभरात्रीचा
मी उगीचच रतीब घालते

अति जाहले,मन उबगले
तक्रार सांगू कोणाला ?
तसे पाहता या सैताना
मीच नाही का जन्म दिला ?

Monday, April 4, 2016

मी काय वाचतेय.....

सध्या मी रोज एक छोटीशी पोस्ट लिहिण्याचा संकल्प केलाय , एका challenge चा भाग म्हणून. पण  ( कबुल करायला हरकत नाही की) खरं तर थोडी फसवणूकच करतेय . पुढच्या साधारण २० एक पोस्ट्स लिहून तयार आहेत माझ्या!

परिणामे मला आता उबग आला....इंग्रजी लिखाण आणि वाचनाचा ! त्यामुळे आता गाडी मराठीकडे !
आपल्याला ज्या विषयात फारसं कळत नाही अशा एका विषयाकडे मी आता वळणार आहे....खूप दिवसापासून आणून ठेवली होती ही...आजपासून श्रीगणेशा !