Wednesday, January 6, 2016

स्वागत

खिन्नता
विषण्णता
निर्जीवशी
निष्क्रियता

चांगले
निमाले
करपले
ते उरले

सुटले
ते हरवले
न जाणे कसे
निसटले

हातावरी
किरमिजी
नक्षी अशी
नाजुकी

रंगीत
फुलपाखरू
अलगदी
उडाले

अंगणात
दरवळतो
मनी सय
तो ठेवतो

हातावरी
पारिजात'
सुकतो
कोमेजतो

एकले
परी धाकले
पुष्प आज
उमलले

उद्या परी
पायदळी
अथवा
निर्माल्ये

किलकिले
करी डोळे
सूर्यदेव
उगवले

येइ त्वरे
निशाराणी
जेव्हा ते
बिंब ढळे

ऐक गड्या
जगी रोज
हाच असा
खेळ चाले

शून्यातून
एक आणि
एकातून
शून्य मिळे

सूर्यबिंब
झळकले
पहा फूल
सळसळे

मनी हेच
ठरवले
अंधारा
हरवले

सोहळे
जे पाहीले
हरखले
आनंदले

मीही नव्या
उदयाच्या
स्वागतास
सज्ज झाले....
Monday, January 4, 2016

आशा

उध्वस्त एका माळरानी
इवलेसे बीज एकले
वसंताची वाट पाहे
मिटुनी डोळे आपले

बीज हळूच बोलले
जरी मोठा तो उत्पात
आस सोडू नये रे
येणार नक्की पहाट

नाजूक जरी मुळे माझी
शोधीत जाती जीवना
आणि तो सुर्यदेवही
धाडीतो किरणे कानना

हलकेच उघडी पापणी
हिरवीच छोटी पालवी
जणू चाखण्या चव जीवनी
ती हात आपुले लांबवी

वाढीत जाये दरदिशी
ती वेल साजरी सुंदर
मग फुलही धरले तिला
हे सृष्टीचक्र निरंतर

अनेक झाडे वेल वाढले
सृष्टी आली मदतीला
उध्वस्त त्या माळरानाला
जणू हिरवाईचा लेप दिला

पहा सृजनाची बीजे रुजली
आणि कवाडे नवी उघडली
नवीन निर्मितीची बीजे
जणू अस्ताच्या उदरी दडली...अधुरी कहाणी

साथ आपली संपली
आणि रस्ते दुभंगले
वाहुनी गेलास तू ...
पण मी इथेच थांबले

मागली कित्येक वर्षे
सोबतीने संपली
मात्र एकलीच आता
ना वृक्ष ना सावली

हसण्यात साथ होती
दुःखात हात हाती
तुझ्या सवे अवसही
एक चांदरात होती

मागे वळू नको सख्या
मी ही न पाही परतुनी
बांध फुटेल अश्रुंचा
जाऊ दोघेही वाहूनी

जरी कधी भेट झाली
वाटेत पुन्हा आपली
तडक जा निघुनी तू
तसाच उलट पावली

मी ही कधी ऐकीले
जरी कधी तुझेच नाव
झुकवेन नजर आणि
लपवेन सारेच भाव

नाव तुझे न कामना
काही न उरले जीवनी
अर्थच लागे न आता
अधुरी उरली कहाणी

Friday, January 1, 2016

लिहिता लिहिता ...

आज प्याला रिता आहे
कागदही पालथा आहे
गजबज होती काल जेथे
आज बस शांतता आहे


होते सारे जे विचारी
लिहून थकली गात्रे सारी
क्लान्त या शरीरात माझ्या
अजब अशी शून्यता आहे


नववर्षाची नवी पहाट
नको उगा ते जुने चऱ्हाट
नव्या क्षितीजाच्या दिसण्याची
खरेच का सुरूवात आहे ?


असते नव्या सर्जना आधी
म्हणे एक रिकामी साधी
कोरी करकरी नवीन पाटी
तीच माझ्या आत आहे ?


अक्षरांचा खेळ बांधला
शब्दांचाही मांडी भोंडला
खरेच सांगू पुन्हा लिहीता
वाटे मज मी सुखात आहे….