Sunday, February 7, 2016

रवींद्र जैन- एक उपेक्षित संगीतकार

जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात एक सांगीतिक कार्यक्रम पाहण्याचा योग आला. हा कार्यक्रम संगीतकार रवींद्र जैन ह्यांच्या गाण्यावर आधारित होता. खरं तर मी ऑर्केस्ट्रा  वगैरे फारशा आवडीने ऐकत नाही...बऱ्याच वेळा गायक बेसूर गातात आणि कर्णकर्कश अशा संगीताने हे दोष झाकून टाकायचा प्रयत्न केला जातो.( आणि मला सतत " मी ह्यापेक्षा नक्कीच चांगली गाते" असे अतिशायोक्तीपूर्ण भास होत राहतात ते वेगळेच !)पण हा कार्यक्रम निश्चितच आश्चर्याचा एक सुखद धक्का होता.

माझ्या दुर्दैवाने हा कार्यक्रम मला पूर्ण पाहता आला नाही.( आई enjoy करतेय ते मुलांना पाहवत नाही असं म्हणतात ते अगदी खरंच !)पहिल्या रांगेतून,चालू कार्यक्रमातून, उठून जाण्याचा प्रमाद मी केला.असो.पण त्या निमित्ताने ,रवींद्र जैन यांच्या संगीताची, खूप दिवसांनी गाठभेट झाली...हा आनंद इतर सर्व किल्मिषे दूर करून गेला !

ह्या कार्यक्रमातील सर्वच गोष्टी उत्तम! अंबरीश मिश्र यांचं निवेदन - केवळ " मध " म्हणाव असं ! शुध्द हिंदी , कानाला  आणि मनाला अतिशय सुखावणारं असा सुरेख ,अभ्यासपूर्ण निवेदन .रवींद्र जैन आणि एकंदरीत हिंदी सिनेसंगीताबद्दल त्यांना असणारं ज्ञान आणि आस्था सतत जाणवत होती.आयुष्यात प्रथमच ,कुणा निवेदकामुळे  "त्यांचे सर्व कार्यक्रम पाहायला सुरुवात केली पाहिजे   "असं वाटून गेलं मला !

गाण्यांची निवड - सुंदर ! रवींद्र जैन अगदी साध्या , सोप्या ,सरळ , रसाळ अशा  रचना करत ( आणि लिहितही !). ह्यातून जी गाणी निवडली ,ती कानाला सुखावून गेली...अनेक हरवलेली गाणी मला या कार्यक्रमात सापडली ! " सोना , करे झिलमील झिलमील " किंवा " कौन दिसा  में " सारखी गाणी शाळेच्या दिवसात नेहमी विविधभारतीवर लागायची ,पण आता फारशी ऐकू येत नाहीत.' कोतवाल साहब' या चित्रपटातील " साथी रे, भूल ना जाना मेरा प्यार " हे अत्यंत सुरेल आणि तितकंच कठीण गाणं , काहीस अप्रसिद्धच आहे...पण आशाने तिच्या आवडत्या गाण्यात या गाण्याला स्थान दिलं आहे.
तसच " एक राधा एक मीरा " ," हुस्न पहाडोंका " किंवा " तू जो मेरे सूर में " एकाहून एक सरस आणि मधुर !

या कार्यक्रमाच्या यशाचे शिल्पकार - यातील गायक...चौघेही अगदी तयारीचे ,( विद्या , आनंद, प्राजक्ता आणि आलोक ) - उत्कृष्ट पेशकरण ( मी ह्यांच्या पेक्षा चांगली गाते अस मला वाटल नाही...यातच सगळ आल !  )विशेष उल्लेख विद्या या गुणी गायीकेचा...तिने " एक राधा एक मीरा " हे गीत जे गायलंय...अहाहा !! ..त्याला तोडच नाही !

रवींद्र जैन माझे आवडते संगीतकार कधीच नव्हते...जयदेव ,सलील चौधरी ,मदन मोहन ह्यांनी माझा विश्व व्यापल होतं...आता वाटतं ...अन्याय झाला माझ्या हातून... ( त्यांच्या अनेक गाण्यातून दिसणाऱ्या हेमलता ,या गायिकेचा आवाज ,मला फारसा भावला नाही , मी लता आणि आशाच्या पलीकडे फारसं जाऊ शकले नाही ही या गोष्टीची काही कारणे असू शकतील ...  )

" शाम तेरी बन्सी" हे 'गीत गाता चल ' मधील किंवा " दो पंछी दो तिनके" हे ' तपस्या ' मधील गीत घ्या - अशी सुंदर गाणी देणारा संगीतकार माझ्याकडून दुर्लक्षिला गेला हा मोठाच अपराध झाला !! आता या निमित्ताने हा खजिना पुन्हा हाती लागलाय अस वाटून गेलं .....








पन्नाशीचा भोज्या -रवी अभ्यंकर

काही दिवसांपूर्वी Majestic गप्पा आणि ग्रंथप्रदर्शनात जायचा योग आला.सालाबादप्रमाणेच उत्तमोत्तम पुस्तके पाहता आली. पुस्तकं चाळून ,वाचून विकत घेण्याची मजाच काही और ! अस समाधान online पुस्तक खरेदीत मिळत नाही ! असो.

मौज प्रकाशनाची पुस्तक निवडीबाबत अगदी योग्य प्रतिमा आहे. श्री.पु. भागवत होते तेव्हा अगदी प्रत्येक पुस्तक वाचून ,दर्जेदार असल्याची खात्री करून मगच प्रसिद्ध केले जाई.अनेक पुस्तकांवर त्यांचे संपादकीय संस्कार आहेत असेही ऐकिवात आहे. त्यांच्यानंतरही ही परंपरा जिवंत ठेवण्यात आली आहे ह्यात तिळमात्रही शंका नाही !

पन्नाशीचा भोज्या हे मौज प्रकाशनाचे पुस्तक प्रदर्शनात फिरता फिरता दिसण्यात आले. अल्पावधीतच या पुस्तकाची दुसरी आवृत्ती निघाली आहे आणि मौज प्रकाशन ह्या दोन गोष्टी माझी उत्सुकता चाळवण्यास पुरेशा होत्या.नावही अतिशय वेधक ! म्हटल.. आपली पन्नाशी आता ७-८ वर्षांवर येऊन ठेपलीये...पाहूया तरी लेखक काय म्हणतोय....

पुस्तक विकत घेऊन घरी आले.काम संपवून वाचायला सुरुवात केली. आणि खरच सांगते...एकदा पुस्तक जे उचलले ते संपवूनच खाली ठेवू शकले! अतिशय ओघवती भाषा,कुठेही कंटाळा आला नाही किंवा काही भाग गळून ,स्किप करून पुढे जावसं वाटलाच नाही. गोष्टी ,किस्से अतिशय रंजक,मी स्वतःला अनेक ठिकाणी relate करू शकले.मधेच तिरकस टिप्पणी , एखादी नर्मविनोदी comment किंवा जाणवणारही अशा रीतीने सांगितलेले जीवनविषयी तत्वज्ञान ...वाह !! खूप सुरेख !!

पन्नाशीच्या आसपास असणाऱ्या सर्वांचे प्रातिनिधिक अनुभव सांगणारे हे पुस्तक . मुंबईत राहणारे, मराठी शाळेत शिकणारे आणि साधारण एकाच वळणाची स्वप्ने उराशी घेऊन जगणारे आपण सर्व!घरातली संस्कृती ,वातावरण ,शेजार,नाती साधारण एकाच धाटणीची ( म्हणजे डिग्री म्हणजे सबकुछ ,अभ्यास एके अभ्यास ,दहावी हे एवरेस्ट आणि बोर्डात येणे = गगनाला गवसणी घालणे वगैरे वगैरे...)...सार कसा अगदी ओळखीचं !

पण लेखक कुठे तरी एक वेगळी वाट चोखाळतो , चाकोरी मोडण्याचे धैर्य दाखवतो .C.A.पूर्ण करूनही या व्यवसायाला नाकारतो आणि रशियन भाषेच्या प्रेमापोटी तिच्या अभ्यासावरच लक्ष केंद्रित करतो. पुढे हाच व्यवसायही स्वीकारतो...पण नोकरी सुरु करायच्या आधी , वयाच्या २६ व्या वर्षीच ठरवतो की ४० व्या वर्षी मी या व्यवसायातून निवृत्त होणार.

प्रत्येक पानावर आयुष्याकडे अत्यंत डोळसपणे पाहणारा आणि तरीही आयुष्य enjoy करणारा लेखक भेटतो .एके ठिकाणी तो म्हणतो..." आपल्या पिढीने विचारपूर्वक मुलांना इंग्रजी माध्यमात शिकवण्याचा निर्णय घेतला. माझ्याच वर्गातल उदाहरण सांगतो...बालमोहनमधील अनेक विद्यार्थी IIT ला गेले ( लेखी) पण IIM ला जाऊ शकले नाही( तोंडी).हा आत्मविश्वासाच्या अभावाचा  किंवा इंग्रजीच्या न्युनगंडाचा परिणाम....तो  आपल्या मुलांना तरी भोगावा लागू नये ही त्या मागची विचारधारा !"

लेखक म्हणतो तसं हे पुस्तक आत्मचरित्र नाही ..पण जे काही आहे ते अत्यंत वाचनीय आहे हे नक्की ! खरोखर पुन्हा पुन्हा वाचाव अस हे पुस्तक !

हा शेखर खोसला कोण आहे ?

नाट्यगृहात प्रवेश केला...अरेच्या ! पडदा उघडाच !! एक सुरेख set मांडला होता ...हिरवी , आल्हाददायक रंगसंगती  ...की चातुर्याने केलेली प्रकाशयोजना ? एका भिंतीवर एक लक्ष वेधून घेणारे maze...भूलभुलैयाच जणू...कदाचित पुढे नाटकात येणारी गुंतागुंत दर्शवणारे ....

तिसऱ्या घंटेनंतर नाटक सुरु झाले...काहीशा कृत्रिम,नाटकी आणि जुनाट शैलीत पात्र संवाद म्हणू लागली...माझ्या मनात थोडा गोंधळच होता....अचानक एक पिस्तुलही आल त्या नाटकात...आणि काय, कस झाल... काही कळलच नाही...पण अचानक नाटकातलं एक पात्र वळल आणि...आणि...चक्क मलाच गोळी घातली !!!!
 (अस मला वाटल खरं ,पण अर्थातच.... मी जिवंत आहे !!.... पहिल्या रांगेत बसल्याचा दुष्परिणाम !)

अतिशय वेगळी सुरुवात असणारा हे नाटक ...आणि नाटकातलं नाटकही ....त्याच्या जबरदस्त दिग्दर्शनामुळे पहिल्या सीन पासूनच मनाची पकड घेते .खून कोणी केला हे नाटकातील कोडं नाहीये तर, का केला आणि हा शेखर खोसला आहे तरी कोण ,या गोष्टींभोवती हे नाटक फिरते.

Flashback दाखवण्याच तंत्र किंवा पात्रांना freeze करून ,एकेकाच्या मनातील आठवणी अभिनित करण्याचा तंत्रही खूप छान आणि वेगळा.विजय केंकरे दिग्दर्शक म्हणून अत्यंत सरस !

नाटकातील अभिनय खूप सशक्त - विशेषतः मधुर वेलणकर - तिने नाटकाच्या  नायिकेची भूमिका  खूप छान पेलली आहे .Emotional सीन जबरदस्त केले आहेत- गोंधळलेली ,काहीशी पछाडलेली व्यक्तिरेखा खूप सुरेखपणे उभी केली आहे....आपल्या हातांच्या सतत चाळा करण्याच्या सवयीने खूप काही बोलून जाते ती !तिचं नृत्यही अगदी graceful !

तुषार दळवी,लोकेश गुप्ते ,शर्वरी ,विवेक तसेच कविराजच्या  भूमिकेतील सुशील इनामदारही चपखल.
खटकण्यासारखी एकाच गोष्ट - शेवट थोडा धूसर वाटतो. खुनामागाचा कार्यकारणभाव नीटसा समाजात नाही...थोडा अस्पष्ट राहतो आणि जेवढा आपल्याला समजतो तोही पचत नाही.

पण एक वेगळा अनुभव अस नक्कीच म्हणता येईल या नाटकाला ......किंबहुना सशक्त अभिनय आणि  उत्तम दिग्दर्शन यामुळे नक्की पाहाव असं हे नाटक !