Friday, October 14, 2016

बॉम्बे टॉकीज

मध्यंतरी एक थोडे क्लिष्ट पुस्तक वाचत होते . खरं तर ते नीट समजत नव्हतं , पण “कसं समजत नाही ते बघते “ अशा हट्टाला पेटून ते बाजूलाही ठेववत नव्हतं….

मग अधूनमधून, फक्त येता जाता तोंडात टाकावं , तसं एक हलकं फुलक पुस्तकही वाचत होते….बाबू मोशाय यांनी लिहिलेल ‘बॉम्बे टॉकीज ‘. बाबू मोशाय हे नाव चित्रपट लेखनासाठी नवं नाही , पण बाबू मोशाय म्हणजे कोण हे या निमित्ताने मला प्रथमच समजलं…( ते रहस्य मी उघड करणार नाहीये …)

खरं तर हे पुस्तक अतिशय माहितीपूर्ण आहे , रंजकही आहे पण त्यात संपादनाचा अभाव प्रकर्षाने जाणवतो ...एखाद्या विषयावर chronologically , मुद्देसूद लिहिलं नसून , सहज येत जाता गप्पा माराव्यात तसं लिहिलंय , परिणामी विषयांतर-इथून तिथे मारलेल्या उडया -विखुरलेलं लिखाण  ,जणू कुणी आपली रोजनिशी मनात येणाऱ्या सर्व विचारांसकट जशीच्या तशी छापली आहे ….

पण तरीही लेखकाचा सिनेमाचा अभ्यास , प्रेम मात्र पुरेपूर जाणवते - उदा.“ कहा गये वो लोग “ हा पाकिस्तानात निघून गेलेल्या चित्रपट कलाकारांविषयी लिहिलेला लेख .....

तसेच देव आनंद वर लिहिलेला लेख , माहितीपूर्ण असूनही मोठे असल्याने गुणापेक्षा दोषांमुळेच लक्षात राहतात .

याउलट असीत सेन वरचा छोटेखानी लेख - यात मात्र विषयांतराला फार वाव नसल्याने वाचनीय झाला आहे . काहीश्या अप्रसिद्ध पण सुरेल गाणी असणाऱ्या चित्रपटांचे सेन दिग्दर्शक होते -(इथे माझ्या मनातील एक गोंधळ दूर झाला - मी असित सेन हे हास्य अभिनेते आहेत असं समजत होते- आता कळलं की दोन असित सेन आहेत.) अन्नदाता , अनोखा दान तसेच गाजलेल्या सफर,खामोशी ,ममता या चित्रपटांचेही. खामोशीमधील गाण्याबद्दल लेखक म्हणतो “ वो शाम आणि तुम पुकारलो या दोन्ही गाण्यात एक प्रकारची खामोशी जाणवते ! “गुलझारचे अप्रतिम शब्द असलेली ही गाणी नक्कीच पुन्हा ऐकायला हवीत ( पण माझा आवडतं गाणं मात्र ‘हमने देखी है’ - “ हाथ से छुके इसे रिशते का इलजाम ना दो “ सुंदर ओळ !)

“जिन्हे नाझ है हिंद पार वो कहा है “सारखा लेख मदर इंडिया वर सुरु होतो , अनेक वेळा मनोजकुमारला स्पर्श करत हल्लीच्या चित्रपटांवर येऊन थांबतो . रंजक पण विस्कळीत .

मृणाल सेनवर लिहिलेला लेख छोटा आणि सुबक - आता माझ्याकडे भविष्यकाळात पाहण्याच्या चित्रपटांची एक यादीच तयार झाली आहे …

थोडक्यात काय तर जर संयम बाळगला तर हे पुस्तक नक्कीच काही छान आणून जाते ….

No comments:

Post a Comment