हल्ली काही दिवसांपासून पुस्तकांवर लिहिलेली पुस्तकं वाचायचा सपाटा लावलाय , अर्थात इंग्रजीमध्ये !
बऱ्याच पुस्तकांमध्ये एक लेख जरूर असतो , लेखकाच्या लहानपणातील वाचनानुभवाबद्दल .
पण ह्या लेखकांच्या आणि आपल्या ...खरं तर माझ्या , बालपणीच्या लेखनविश्वात बराच फरक आहे ….
या सर्व लेखकांत एक गोष्ट समान आढळते , या सर्वांना त्यांनी वाचायला कधी आणि कुठे सुरवात केली ते लख्ख आठवतं , मला मात्र मी थेट मोठ्या अक्षरातली पुस्तकं वाचू लागले त्या आधीचं काहीच आठवत नाही , ( नाही म्हणायला इंग्रजी अक्षर ओळख चांगलीच आठवते - चौथीच्या वर्गात असताना ,माझ्या बाजूला बसलेल्या मुलाला मी a b c d लिहून दाखवलं आणि फुशारक्याही मारत होते !)
माझ्या आयुष्यात एनिड ब्लायटन आणि तत्सम इतर लेखक कधी आलेच नाहीत , माझं लहानपण फक्त मराठी पुस्तकांनी भरलेलं आणि भारलेलं होतं. लायब्ररीपेक्षा पुस्तकं विकत घेऊन जास्त वाचायचे. माझे आजोबा दर सुट्टीत मला १५-२० पुस्तकं घेऊन द्यायचे , त्यांची अखंड पारायणं चालू असायची .
जादूचा घोडा , उडणारा गालिचासारखी साहित्याच्या वर्गवारीत ना बसणारी पुस्तकं आता लक्षातही नाहीत. पण तीसुद्धा सतत वाचायला आवडायची .
भा.रा.भागवत आणि लीलावती भागवतांची अनेक अत्यंत रंजक पुस्तकं वाचली , अर्थात त्यातली बरीच भाषांतरित होती हे नंतर कळलं, पण भा. रां. चा मानसपुत्र फास्टर फेणे आम्हा सर्वांचाच हिरो होता. त्यांचा दुसरा मानसपुत्र बिपीन बुकलवार मात्र काहीसा अप्रसिद्ध . हा बिपिनदादा कधी ओरिजिनल तर कधी गाजलेल्या लेखकांच्या गोष्टी सांगे. एका दिवाळी अंकात आलेली ‘घड्याळाचे गुपित’ मला काही वर्षांपूर्वी मॅजेस्टिक प्रदर्शनात मिळाली - जुना मित्र खूप दिवसांनी भेटल्याचा आनंद मिळाला .
दिवाळी अंक - मुलांचे- माझ्या वाचन विश्वाचा महत्वाचा घटक होते. त्यावेळचे दिवाळी अंक balanced म्हणावे असे होते - म्हणजे कविता, गोष्टी,लेख अगदी मुलांना आवडतील अशा प्रमाणात ! मनोरंजन हे आपले काम आहे हे ते अंक कधीही विसरले नाहीत - मागे माझ्या मुलासाठी मी काही दिवाळी अंक चाळले , ते फक्त माहितीपूर्ण लेखांनी भरले होते!
वर्षभर ना मिळणाऱ्या दोन गोष्टी - फराळ आणि दिवाळी अंक माझी दिवाळी खास बनवायचे -आता ह्या दोन्ही गमती संपल्या , ही खंत वाटत राहते ….
काही ओरिजिनल पुस्तकं आठवतायत , ह्यांचे लेखक अप्रसिद्ध … एक होतं ‘गोष्टींची दुलई ‘ - ह्या पुस्तकातल्या २-३ गोष्टी अजूनही आठवतायत - ‘ राजुची डायरी ‘ नावाची गोष्ट माझी आवडती --राजू नावाच्या काहीश्या एकलकोंड्या मुलाला सांताक्लाउस भेटतो - दरवर्षी एक याप्रमाणे अनेक रंगीबेरंगी डायऱ्या देतो - आणि राजू त्या आपल्या रंगीबेरंगी अनुभवांनी भरून टाकतो - दरवर्षी काही नवं शिकून डायरी भरून टाकण्याची कल्पना मला फारच आवडली होती ! त्यात एक ‘ दुलदुलची गोष्ट ‘ या नावांनीही कथा मला फार आवडे. दुलदुलचं नाक नकट होतं ही गोष्ट दुलदुलला इतकी त्रास देई की त्यासाठी वाट्टेल ते करायची तिची तयारी होती - तिच्या प्रयत्नांना कसे यश येते आणि त्यातून काय गमतीजमती होतात यांची मजेशीर गोष्ट सांगितली होती.
आणि एक मजेशीर गोष्ट - पुस्तक अगदी प्रस्तावनेपासून वाचायचं हा माझा खाक्या - ‘अरगडे ,कुलकर्णी आणि मंडळी हे नाव तुमच्या चांगल्याच परिचयाचे झाले आहे ‘ ही काही प्रस्तावनांची सुरुवात आठवतेय ,म्हणजे ह्या प्रकाशकांची खरं तर बरीच पुस्तकं असावीत ,- कुणी ‘अ ,कु आणि मं ‘ आपल्यासाठी पुस्तकं काढतायत हे वाचून खूप बरं वाटलं होतं!(अ कु मं च्या पुस्तकात पर्वतीच्या पोटात दडलेलं एक भुयार आणि पेशवेकालीन गुप्त कागदपत्र होते...)
इतर अनेक भाषांतरित पुस्तकं मी वाचली - टारझन(ग. रा. टिकेकर) , हॅन्स अँडरसनच्या परीकथा ( सुमती पायगावकर), अरेबियन नाईट्स .गुलबकावली ,वेताळ पंचविशीसारखी सदाबहार पुस्तकं सुद्धा .’साने गुरुजींच्या गोड गोष्टी ‘मध्येही बऱ्याच भाषांतरित गोष्टी होत्या ( म्हणजे मराठी बालवाङ्मय फार कमी ओरिजिनल आहे ?त्यावेळी अर्थात या गोष्टीमुळे काहीही फरक पडायचा नाही म्हणा ...)
मग सातवी आठवीत कधी तरी गोनिदा , पु. ल.,भेटले ...स्वामी ,मृत्युंजय ,राजा शिवछत्रपती, वीरधवल यांची पारायणे सुरु झाली ...
ही मोठ्यांच्या पुस्तकविश्वातल्या दीर्घ सफरीची सुरुवात होती ….
No comments:
Post a Comment