मी का लिहिते -
अजून मला कळलं नाही….
खरंच मला काही सांगायचंय -
की आपलं उगाच ….
आणि सांगायचंय तरी काय ?
गोष्टी … त्या मला येत नाहीत
शोधते आहे एक कल्पना ….
काही पात्र ….
माझी अशी ….
माझ्या मनात जन्मून ,
फक्त माझच ऐकतील -
मला वाटेल तसं जगतील ...
मी सांगू तसं वागतील …
नाहीतर सरळ निघून जातील -
गोष्टीतून , जगातून ….
कधी चार उपदेशाचे गोष्टी-
सांगून शहाण करावं लोकांना ?
छे! कसलं कप्पाळाचं तत्वज्ञान ?
उगाच नसता आवेश-
उसना आणलेला आव ...
खरं तर मला पक्कं कळलंय-
हे सारे फक्त शब्दांचे बुडबुडे
जीव नसलेले ,
असण्याचा आव आणू पाहणारे ….
मग बंद करावं का लिहिणं ?
निरुद्देश , अनाकलनीय भ्रमंती …
शब्दांच्या प्रदेशातली ….
सारं कसं शांत होईल …
आणि सुटतील अनेक प्रश्न …
शब्दांनी निर्माण केलेले -
आणि मिळतील उत्तरे -
दोन शब्दांच्या मध्ये
किंवा शब्दांच्या पल्याड …
No comments:
Post a Comment