Showing posts with label कविता. Show all posts
Showing posts with label कविता. Show all posts

Friday, December 2, 2016

शब्द -२

मी का लिहिते -

अजून मला कळलं नाही….

खरंच मला काही सांगायचंय -

की आपलं उगाच ….

आणि सांगायचंय तरी काय ?

गोष्टी … त्या मला येत नाहीत

शोधते आहे एक कल्पना ….

काही पात्र ….

माझी अशी ….

माझ्या मनात जन्मून ,

फक्त माझच ऐकतील -

मला वाटेल तसं जगतील ...

मी सांगू तसं वागतील …

नाहीतर सरळ निघून जातील -

गोष्टीतून , जगातून ….

कधी चार उपदेशाचे गोष्टी-

सांगून शहाण करावं लोकांना ?

छे! कसलं कप्पाळाचं तत्वज्ञान ?

उगाच नसता आवेश-

उसना आणलेला आव ...

खरं तर मला पक्कं कळलंय-

हे सारे फक्त शब्दांचे बुडबुडे

जीव नसलेले ,

असण्याचा आव आणू पाहणारे ….

मग बंद करावं का लिहिणं ?

निरुद्देश , अनाकलनीय भ्रमंती …

शब्दांच्या प्रदेशातली ….

सारं कसं शांत होईल …

आणि सुटतील अनेक प्रश्न …

शब्दांनी निर्माण केलेले -

आणि मिळतील उत्तरे -

दोन शब्दांच्या मध्ये

किंवा शब्दांच्या पल्याड …

Monday, November 28, 2016

शब्द

शब्द…. शब्द ...

शब्दांचा पाऊस….

गुदमरावणारा….

कशासाठी ?

मी लिहिते कशासाठी ?

तू वाचतोस कशासाठी ?

तू बोलतोस कशासाठी ?

मी ऐकते कशासाठी ?

नको ...नकोच सांगूस ….

कारण पुन्हा येतील शब्दच...

चोहो बाजूनी घेरत...

इतर सर्व अर्थ पुसत...

मनातल्या विचारांचा धागा तोडत...

पण मनातले विचार ?

तेही शब्दच-

आणि सुंदर कल्पना ?

त्याही शब्दच -

अगदी अमूर्त असल्या तरीही...

मग शब्दशिवाय काहीच नाही ?

काही तलम,अस्पर्श असे ..

जे तुझ्या माझ्यात आहे …

ते काय आहे ?

शब्दांत न मावणारे ?

की शब्दांच्या पलीकडले ?


Wednesday, April 6, 2016

पुन्हा एकदा गलका ... (यावेळी पद्य !)

फेरफटका जगात मारून
पुन्हा आले स्वतःशी.,
खरेच मजला पुन्हा कळाले ,
माझे आहे मजपाशी !

नको वाटतो गोंधळ-गलका
नकोच ती वादावादी
सतत प्रश्न ,अभिवादन नेहमी
काय अर्थ या संवादी ?

प्रत्यक्ष भेटुनी नजर भिडवूनी
चेहरा वाचत बोलावे
मोडित निघाली प्रथाच आता
दुखणे कोणा सांगावे

सतत हाती असतो तो फोन
बोटांचे जणू नृत्य चालते
शुभप्रभात आणि शुभरात्रीचा
मी उगीचच रतीब घालते

अति जाहले,मन उबगले
तक्रार सांगू कोणाला ?
तसे पाहता या सैताना
मीच नाही का जन्म दिला ?

Wednesday, January 6, 2016

स्वागत

खिन्नता
विषण्णता
निर्जीवशी
निष्क्रियता

चांगले
निमाले
करपले
ते उरले

सुटले
ते हरवले
न जाणे कसे
निसटले

हातावरी
किरमिजी
नक्षी अशी
नाजुकी

रंगीत
फुलपाखरू
अलगदी
उडाले

अंगणात
दरवळतो
मनी सय
तो ठेवतो

हातावरी
पारिजात'
सुकतो
कोमेजतो

एकले
परी धाकले
पुष्प आज
उमलले

उद्या परी
पायदळी
अथवा
निर्माल्ये

किलकिले
करी डोळे
सूर्यदेव
उगवले

येइ त्वरे
निशाराणी
जेव्हा ते
बिंब ढळे

ऐक गड्या
जगी रोज
हाच असा
खेळ चाले

शून्यातून
एक आणि
एकातून
शून्य मिळे

सूर्यबिंब
झळकले
पहा फूल
सळसळे

मनी हेच
ठरवले
अंधारा
हरवले

सोहळे
जे पाहीले
हरखले
आनंदले

मीही नव्या
उदयाच्या
स्वागतास
सज्ज झाले....








Monday, January 4, 2016

आशा

उध्वस्त एका माळरानी
इवलेसे बीज एकले
वसंताची वाट पाहे
मिटुनी डोळे आपले

बीज हळूच बोलले
जरी मोठा तो उत्पात
आस सोडू नये रे
येणार नक्की पहाट

नाजूक जरी मुळे माझी
शोधीत जाती जीवना
आणि तो सुर्यदेवही
धाडीतो किरणे कानना

हलकेच उघडी पापणी
हिरवीच छोटी पालवी
जणू चाखण्या चव जीवनी
ती हात आपुले लांबवी

वाढीत जाये दरदिशी
ती वेल साजरी सुंदर
मग फुलही धरले तिला
हे सृष्टीचक्र निरंतर

अनेक झाडे वेल वाढले
सृष्टी आली मदतीला
उध्वस्त त्या माळरानाला
जणू हिरवाईचा लेप दिला

पहा सृजनाची बीजे रुजली
आणि कवाडे नवी उघडली
नवीन निर्मितीची बीजे
जणू अस्ताच्या उदरी दडली...



अधुरी कहाणी

साथ आपली संपली
आणि रस्ते दुभंगले
वाहुनी गेलास तू ...
पण मी इथेच थांबले

मागली कित्येक वर्षे
सोबतीने संपली
मात्र एकलीच आता
ना वृक्ष ना सावली

हसण्यात साथ होती
दुःखात हात हाती
तुझ्या सवे अवसही
एक चांदरात होती

मागे वळू नको सख्या
मी ही न पाही परतुनी
बांध फुटेल अश्रुंचा
जाऊ दोघेही वाहूनी

जरी कधी भेट झाली
वाटेत पुन्हा आपली
तडक जा निघुनी तू
तसाच उलट पावली

मी ही कधी ऐकीले
जरी कधी तुझेच नाव
झुकवेन नजर आणि
लपवेन सारेच भाव

नाव तुझे न कामना
काही न उरले जीवनी
अर्थच लागे न आता
अधुरी उरली कहाणी

Friday, January 1, 2016

लिहिता लिहिता ...

आज प्याला रिता आहे
कागदही पालथा आहे
गजबज होती काल जेथे
आज बस शांतता आहे


होते सारे जे विचारी
लिहून थकली गात्रे सारी
क्लान्त या शरीरात माझ्या
अजब अशी शून्यता आहे


नववर्षाची नवी पहाट
नको उगा ते जुने चऱ्हाट
नव्या क्षितीजाच्या दिसण्याची
खरेच का सुरूवात आहे ?


असते नव्या सर्जना आधी
म्हणे एक रिकामी साधी
कोरी करकरी नवीन पाटी
तीच माझ्या आत आहे ?


अक्षरांचा खेळ बांधला
शब्दांचाही मांडी भोंडला
खरेच सांगू पुन्हा लिहीता
वाटे मज मी सुखात आहे….

Thursday, December 31, 2015

निसर्ग

कधी वाटते तडक उठावे
वाटेने या चालत जावे....

सोडून ही मळलेली वाट....
ओलांडून हा जुनकट घाट....

पोहोचावे त्या वनात नीरव ...
गच्च झाडीचा जेथे मांडव ...

खळखळणारा जेथे झरा ....
अलवार सोबत करतो वारा...

पाय सोडूनी जळात बसावे....
मनातले गुज त्यास वदावे.....

खळखळ झरा जातो वाहत ...
ठेवत नाही काही मनात ....

किलबिल कुंजन सुरेख सुंदर
नाजूक ते रव मनही नीडर....

भिनते अंगी ही शांतता ...
शहरी गजबज निघून जाता ...

प्रतिमा तेथे आपुली पाहून ....
परत फिरावे ताजे होऊन ....

Tuesday, December 29, 2015

शब्द जुळारी !!

मी तर केवळ शब्द जुळारी ...



भावनांचा पीळ...
लांबलचक वाक्ये...
काही चमकदार शब्द...
काही उद्गारचिन्हे !!!

तोडून फोडून
उलटून सुलटून...
ठेवते समोरासमोर
जरा आलटून पालटून...

कधी जाते जमून
पटकन एखादे यमक
पण असते कुठे त्यात
ती काव्याची महक

नुसतीच बोलीभाषा
असते गद्यच खरे
चांगले म्हटले म्हणून
ठरेल कसे बरे

धन्य ते कवी-शायर
लिहिती सुरेख ओळी
किंवा भावपूर्ण,आशयगर्भ
सुबकशी चारोळी

मी बापडी,उचलून पेन
खरडत राही काहीबाही
मी कसली कवयित्री
मी तर केवळ  शब्द जुळारी !!!

मूर्ती

छे ! नाही !! अजिबात नाही !!!
तू तर "तो " बिलकुल नाहीस....
ज्याला मी शोधतेय
कित्येक वर्षापासून...
तू तर असाच एक आपला
आकाशातला दूरगामी तारा ..

पहिल्यांदा भेटले तुला ...
चक्क देवच समजले !
असाही माणूस असतो का ?
अशा विचारात हरपले...
हळूहळू ओळख...मग मैत्री...
देवाचा माणूस...आणि माणसाचा मित्र....

मग काळाच्या ओघात वाहून गेलो...
कुठे तू...आणि कुठे मी.....
गुपचूप तुझी खबर ठेवून होते
तू मोठ्ठा माणूस झाल्याचे ऐकून होते...
मधल्या काळात माझ्या लेखी...
अधिकच "गुणी" बनलास तू...

मग कधीतरी पुन्हा प्रकटलास ...
या दिव्यजालातून अचानक...
मी आनंदून हात पुढे केला...
अनोळखी नजरेने मात्र तू प्रतिसाद दिला...
आठवण द्यावी तुला...नाही धजावले मी...
"कोण आपण ?" या प्रश्नाला ...प्रचंड घाबरले मी....

असू दे...असतात अशीही माणसे
विसरभोळी....
पण हो...ती तर माणसच असतात.....
आणि तुला तर मी देव बनवलेलं !'
पण तुझे पाय मातीचे होते....
तुझा नाही रे बाबा...माझंच चुकलं !!

वाट

नव्या वाटेवर ,नवे काटे...
नवे दगड , नवे गोटे...

ठेच तर लागणारच...
वेदना जाणारच मस्तकात..
अंगात झिणझिण्या आणि
बधीरता येणारच देहात...

पण तरीही...
पुन्हा उठायच...
विचार न करता...
चालू पडायचं.....

अनुभवायची
वेदनेची धुंदी...
नशीली ....
नविनता पदोपदी....

ही वाट
सतत नव शिकवते....
विजयाकडे
हीच तर घेऊन जाते...

अंतिम जयापेक्षा थरारक
या वाटेचा प्रवास...
एकदम मोठे होण्यापेक्षा
हळूहळू बदलण्याचा प्रयास..



Monday, December 28, 2015

आमचाही एक असाच… बाजीराव

प्रत्येकीच्या मनात
एक बाजीराव असतो…
कधी रोमीयो ,कधी फरहाद
तर कधी फवादही भासतो….

गालावरच्या बटा हटवत
थेट मनात पाहतो…
“खुप सुंदर दिसतेस “
अलगद सांगून जातो…


लाडीगोडी ,छेडखानी
चोरटे स्पर्श उगीचच…
नुसत्या नजरेने त्याच्या
देही उठती रोमांच…


चांदण्या रात्री लाँग वॉक…
कधी मोगऱ्याचा  गजरा…
कधी एकच गुलाब
लालचुटुक टपोरा…


या स्वप्नांच्या गावी…
प्रेमानेच पोट भरतं…
जेवणबीवण ,कामबीम
असं काहीच नसतं…


आमच्या मनातला बाजी
कधीच व्यभिचार नसतो…
खरं सांगू का..हा चेहरा..
आपल्याच माणसाचा असतो….

Thursday, November 12, 2015

चालत राहा…...

चालायला तर लाग तू ….

वाट सापडेलच हळूहळू -

उजेडही होईल …...

जरी आता अंधार असला तरी ,

  • कारण सूर्य या अंधाराच्या पलीकडेच आहे …..

वाट बघत थांबलाय  ,  

तुझी -

घाबरलीस ?

ही तर झाडं आहेत …..

राक्षस नाहीत ,

सावल्या आहेत …..

ज्या सोबतच करतात….. उजेडी …..

- आणि थोड चाललीस ,

तर जंगल संपेल -

मग -

फुलांच शेत ,

पहाट वाऱ्यावर  डोलणारी फुलं …..

तुलाही वाटेल -

नाचावं …..

या फुलांसोबत …..

कारण ….पहाट झालीये ……

आणि हो ,

इथेच बसून राहिलीस ,

तर पहाट  होईल आपल्या वेळी …..

पण तुझ्यापर्यंत पोचणार नाही ……

चाललीस तर ……

रंग , गंध , स्पर्श , उजेड …..

थोडक्यात ….स्वर्ग ……

फक्त चार पावलांवर …….

उठ …..

चल……

थांबू नकोस …..

वळू नकोस ……

पावलापुढे पाउल ……

टाकत राहा ……..

चालत राहा……

चालत राहा…...

अमूर्त

आपलं नातं ......जगावेगळ .....शब्दापलीकडल.....

मी न मागण्याच ......

आणि तरीही तू  देण्याच .......

कधी एकांतात , निशब्द .....शांतता ऐकू येते .....

मला माहितीये .....ती तुझीच चाहूल असते .....

कधी वाऱ्याची  झुळूक स्पर्शून जाते ......

तीही तुझीच आश्वासक मिठी ......

काही लिहिते कधी .....जणू तुझ्याशीच बोलते .....

आणि तुझी उत्तरे .....

सापडतात मला ठायी ठायी ....

कधी एखाद्या पुस्तकात -

तर कधी त्या मूर्ख ठोकळ्यांवरील एखाद्या संवादात -

गुळगुळीत पानांच्या निरर्थक लेखातील एखाद्याच समर्पक वाक्यात -

प्रश्नाच्या आधी उत्तर ....असही होत कधी .......

पण तरीही , साशंक  , वेड मन .....

तुला ऐकू जात नाहीये - अशा विचाराने कासावीस होतं.....

धाय मोकलु लागत.....

मग कळत...इथेच आहेस तू .....माझ्या भोवती ......

पण माझ्या मनाची कवाडं बंद झालीत ......या अनाठायी भीतीपोटी.....

पुन्हा दीर्घ श्वास घेऊन....डोळे मिटून .....

आणि मनाची दारं उघडून ....

तुला शोधते ......

आणि तू खरच तिथेच असतोस , भेटतोस.....

कायमच ......