Tuesday, December 5, 2017

कपूरवंशम...

आमच्याकडे बाहेर चालू असलेले संभाषण , वॉर्डबॉय, आयाबाई आणि रिसेपशनिस्ट मधील

-कौन मर गया रे कल ?

-राज कपूर

-अरे मरे हुए को क्यू मार रही है ? राज कपूर बरसो पहले मरा है ।

-वो करीना का बाप मर गया ना ?

-अरे, करीना का बाप रणधीर है, वो जिंदा है अभी ।

-फिर कौन मरा ?

-शशी कपूर

-शशी कपूर के रशी कपूर ?(ही शुद्ध लेखनाची चूक नाहीये , जसं ऐकलं तसाच लिहितेय )

-रशी नाही भाई , शशी

-अरे वो गोलमाल-2 मे है ना, उस का बाप मर गया ।( म्हणजे कोण ते मला कळलं नाही)

पण अशा रीतीने पूर्ण कपूर खानदानाचा वध झाला आज आमच्याकडे !

Sunday, December 3, 2017

पार्ले कट्टा : एक सुगंधी अनुभव

आमच्याकडे खूप सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात-त्यातला एक म्हणजे पार्ले कट्टा.वर्षातले सहा महिने, दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी, संध्याकाळी पाच वाजता ,माझ्या घराजवळच्या एक छोट्याशा उद्यानात हा कार्यक्रम होतो.यावर्षीचा या उपक्रमाला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत.म्हटलं तर घरगुतीच -प्रमुख पाहुण्यांचं स्वागत चाफ्याची परडी देऊन केलं जातं आणि त्यांच्यासाठी थर्मोस मधून चहा आणला जातो..

कट्ट्याचे काही कार्यक्रम मी पूर्वी पाहिले आहेत मी,पण हल्ली 5 ची वेळ फार त्रासाची असते.शनिवारीसुद्धा 7 पर्यंत ऑफिस असल्याने गेले अनेक महिने मी हा कार्यक्रम पाहू शकले नव्हते.

या शनिवारी सुद्धा थोडी दोलायमान परिस्थिती होती. लगेच 6 वाजता त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मराठी आणि हिंदी गाण्यांचा कार्यक्रम होता. मी हावरेपणाने दोन्ही कार्यक्रम पहायचे असं ठरवूनसुद्धा टाकलं. पण प्रथम प्राधान्य : पार्ले कट्ट्याला , कारण तिथे माझे आवडते निवेदक अंबरीश मिश्र यांची मुलाखत होती.

लवकर पोचल्याने मला अगदी पुढे जागा मिळाली. साठे उद्यानात हा कार्यक्रम होतो, ज्याला आम्ही पार्लेकर त्रिकोणी  बाग म्हणतो . गवतावर मांडलेल्या खुर्च्या , आजूबाजूचे वृक्ष, मधेच आपल्या मांडीवर येऊन पडणारी झाडाची वाळकी पानं,वातानुकूलित सभागृहाला लाजवेल असा गारवा,ओलसर मातीचा आणि नुकत्याच पाणी घातलेल्या झुडपांचा ताजा वास यासारखी वातावरणनिर्मिती एखाद्या बंदिस्त नाट्यगृहात कशी मिळेल ?

(कार्यक्रमाची सुरुवात सौ.कुलकर्णी यांच्या काव्यवाचनाने झाली. मला कविता कळतीलच अस नाही, हे पुन्हा एकदा जाणवलं.अर्थात, कळल्या नाहीत,तरीही मी सर्व कवितांना उत्साहाने टाळ्या वाजवल्या.)

मिश्रजींनी निवेदन केलेला एक गाण्याचा कार्यक्रम मी दोनेक वर्षांपूर्वी पहिला होता, त्यानंतर मी संधी मिळेल तेव्हा त्यांना ऐकायचं असं ठरवलं होतं. त्या कार्यक्रमात मी त्यांची अस्खलित हिंदी , त्यांची मराठी आणि त्यांचं हिंदी गाण्यांबद्दल असलेलं सखोल ज्ञान यांनी प्रभावित झाले होते.

कालची मुलाखत प्रज्ञा काणे ह्यांनी फार छान घेतली, मिश्र अत्यंत रसाळ आणि रंजक अशा मराठीतून बोलत होते. त्यांची आई कोकणातली असल्याने आणि त्यांचं बालपण गिरगावात गेल्याने त्यांना मराठीबद्दल प्रेम वाटू लागलं आणि वाचनामुळे त्यांची भाषा समृद्ध झाली.भाषा ही केवळ संवादासाठी नाही तर अभिव्यक्तीसाठीही आहे त्यामुळं आशयाबरोबर तिचं सौन्दर्यही अबाधित राहील ही काळजी आपण सर्वानीच घ्यायला हवी असं ते म्हणतात. त्यांचं हिंदी चित्रपट आणि सिनेसंगीत याबद्दलचं प्रेम , त्यांची पत्रकारिता जी ऑल इंडिया रेडिओ वर सुरू होऊन टाइम्स ऑफ इंडिया पर्यंत आली, जिथे ते अजूनही कार्यरत आहेत, या सर्व प्रवासाचे ,त्यांना भेटलेल्या प्रभावी व्यक्तींचे सुरेख वर्णन त्यांनी केले. गुलजार यांची दोन पुस्तके त्यांनी मराठीत अनुवादित केली आहेत, तसेच त्यांचे स्वतंत्र लिखाण आणि काव्य याबद्दलही ते बोलले. कार्यक्रमाचा शेवट त्यांनी स्वतःची एक गज़ल गाऊन केला, त्यांना सुरेल गाताही येतं हा त्यांचा एक नवाच पैलू समोर आला.

या कार्यक्रमाने इतका आनंद दिला की यानंतर गाण्याच्या कार्यक्रमालाही जायचे होते हेही विसरून गेले .

आता त्यांची पुस्तकं पुन्हा एकदा वाचणार आहे… ( ‘शुभ्र काही जीवघेणे’ … किती सुंदर नाव !)

Tuesday, January 24, 2017

अनपेक्षित आज्जीबाई

कामाच्या त्रासदायक विचारांपासून दूर पळण्याचा उत्तम उपाय म्हणजे मनाला बधिर करणे. काही लोक व्यसनाधीन होतात. माझ्यासारखे काही लोक मात्र काही राजमान्य अथवा सर्वमान्य व्यसनांचा आसरा घेतात. मी पुस्तक , आणि दृक श्राव्य माध्यम यांच्याबद्दल बोलतेय. दृकश्राव्य म्हणजे पूर्वी दूरचित्रवाणी होती . अर्थात तिथे आपली मर्जी फार चालत नसे. यु-ट्यूबने मात्र हा प्रश्न काहीसा सोडवलाय.

पूर्वी घरी आले की कामं आटपून TV समोर बसायचे , ते आता कानात earphones घालून मोबाइलला चिकटून बसते. अर्थात, लेकाच्या अभ्यासात अडथळा नको अशी एक उदात्त विचारधाराही आहे ( असं मी सर्वांना सांगते ! महान मातृहृदय वगैरे वगैरे !! तोही इतक्या गंभीरपणे अभ्यास करतो की मलाच कधी कधी भरून येते..)

यू ट्यूबची एक फार छान गोष्ट, खरं तर सोय, अशी आहे की आपण एक व्हिडिओ पाहिला, की आपल्याला भावतील अशा अनेक व्हिडिओंची रांगच उभी करतो आपल्यापुढे...घ्या, किती पाहाल ते.

एक जमाना होता, ज्यावेळी मी पाकिस्तानी उर्दू मालिकांची पारायणे करत होते. पण देशभक्ती,लोकलाज आणि तोचतोचपणा (इथे त्यांचं आपल्याशी असलेलं साधर्म्य दिसतं -कुणी कितीही नाकारलं तरीही ! विनोदात बाष्कळपणा अगदी तसाच !) या सर्वांमुळे मी त्यांच्याकडे पाठ फिरवली.( आणि आता पाहिल्या तरी गुपचूप ! या कानाची त्या कानाला खबर नाही लागू देत !)

अशा एका नाजूक (!) वळणावर मला कॉलिन फर्थ भेटला.( ऐकायलाही छान वाटतं ...भेटला !!) त्याबद्दल मी माझ्या दुसऱ्या ब्लॉगवर लिहिलं आहेच.त्यानंतर इंग्रजी सिनेमा आणि TV मालिकांची एक मोठी रांगच लागली.

आज youtube वर फिरताना अचानक The millionairess हा BBC ने प्ले ऑफ द मंथ या शीर्षकांतर्गत प्रसारित केलेला एक नाट्यचित्रपट पाहिला.

मूळ लेखक : George Bernard Shaw .

एका अतिश्रीमंत बाईची ही गोष्ट , जी स्वतःसाठी सुयोग्य जोडीदाराच्या शोधात आहे. ह्या बाईची सवय आहे-मी म्हणेल ती पूर्व. तिच्या इच्छांच्या आड प्रत्यक्ष परमेश्वरही यायला धजावणार नाही.

यातला विनोद caustic आणि pungent म्हणावा लागेल.ऑस्कर वाइल्ड सारखा witty किंवा शब्दांशी खेळणारा निश्चितच नाही. बर्नार्ड शॉचं 'पिगमालिओन' आठ्वल्यावाचून राहवत नाही. त्याचीही अनेक रुपं पाहिलीत. 'ती फुलराणी' पासून देव आनंदच्या 'मनपसंद 'पर्यंत.रेक्स हॅरिसनचा 'माय फेअर लेडी' मूळ नाटकाच्या सर्वात जवळचा. तिथे शॉ चा विनोद बोचणारा होता आणि शाब्दीकही . मुळात ते नाटकच शब्दांच्या आणि भाषेच्या जादूवर लिहिलेले आहे.असो. त्यावर पुन्हा कधीतरी.

तर एस्पॅनिया या अतिश्रीमंत तरुणीची भूमिका वठवलीये मॅगी स्मिथ यांनी.चेहरा ओळखीचा वाटलं म्हणून गूगल केलं ( हल्ली ही एक खूप छान गोष्ट झालीये -कुठलंही पुस्तक,नाटक,सिनेमा पाहिला, किंवा पुस्तक वाचलं की गूगल करून त्याबद्दल अधिक माहिती मिळवायची. कधीकधी ही माहिती/Trivia मूळ सिनेमा/पुस्तकापेक्षाही अधिक मजेदार व entertaining असते.) अरे! ही तर आपली McGonagall...Minerva McGonagall. चेहऱ्यावरील करारीपणा तेव्हाही तसाच होता. No nonsense वृत्ती आणि कर्तबगारीही तशीच.

अचानक ओळखीचं माणूस भेटल्याचा आनंद झाला...

...आणि मिनर्वा आज्जी तरुणपणी कशा दिसायच्या- बोलायच्या तेही दिसलं !!

Saturday, January 21, 2017

गोडी अपूर्णतेची

ऑस्कर वाइल्डने म्हटलंय -  There are only two tragedies in life: one is not getting what one wants, and the other is getting it.  

आपल्याला जे मनापासून हवं होतं, ते मिळणं ही शोकांतिका का ठरावी ? जागून ज्याची वाट पाहिली ते सुख दारी येऊनही आपण म्हणावे तसे आणि तितके आनंदी का नसतो ?

“….And they lived happily ever after “ अशी स्वप्न अगदी सहज रित्या खरी होतात का ?

ज्यासाठी जीव टाकत होतो ,अशी नवी वस्तू घरी आली की होणार आनंद लगेच का मावळतो ?

खूप लोकांना हे कळत नाही की स्वप्नं पूर्ण होणे हा शेवट नसून सुरुवात आहे , एका नव्या प्रवासाची . जी व्यक्ती प्रवासाऐवजी , मुक्कामाकडे डोळे लावून वाटचाल करते, ती प्रवासातले छोटे छोटे आनंदाचे क्षण गमावते हे तर खरं आहेच, पण एक स्वप्न पूर्ण झालं म्हणजे आयुष्य सुफळ संपूर्ण झालं असं नाही हे कधी कधी तिला जाणवतही नाही.

And they lived happily ever after ची हीच कहाणी आहे. खरा प्रवास तर लग्नानंतर सुरु होतो.  त्या नव्या नोकरीनंतर सुरु होतो. पूर्णपणे नवी जागा, नवी माणसं, नवी प्रणाली जाणून त्यात मिसळून जाण्याचं आव्हान कधी कधी खूप कठीण , तणाव कारक असू शकतं . पण त्यावर रोज थोडी मेहनत, थोड नशीब , थोडी आशा आणि बरंच हसू हा उतारा केल्यास गोष्टी हळूहळू त्या happily ever after च्या दिशेने सरकू लागतात.

पण ही अपूर्णतेची गोष्ट नाही. अपूर्णता ही जर-तर ची गोष्ट.’जर ती माझ्या आयुष्यात असती तर…’ हा शक्यतांच्या प्रदेशातील फेरफटका . खरं तर जर ती आयुष्यात असती तर तीही दिवसाच्या शेवटी भूतासारखीच दिसली असती , तीचेही हात खरखरीत असते. आणि त्याच म्हणाल तर पोट सुटलं असतं, टक्कल पडलं असतं आणि त्यालाही कदाचित जेवल्यानंतर ढेकर द्यायची सवय असती .

स्वप्न पूर्ण झाल्यावर The End .अजून काही छान घडण्याची शक्यता संपली.कदाचित आपल्या मनाला पुढे काय होईल ही उत्सुकता , हुरहुर अधिक उल्हासीत करते. अजून काय होऊ शकले असते हा विचार आत्ता काय झालंय ह्यापेक्षा जास्त उत्साहवर्धक आहे.

नवं स्वप्न ,नवा उत्साह, अधिक मेहनत करण्याची नवी उमेद . स्वप्नाचा पाठपुरावा करताना आशा निराशेचा खेळ, पुन्हा उल्हासित होऊन ,नव्या जोमाने कामाला सुरुवात ….हे अंगातला चैतन्य यश मिळाल्यावर काहीसे थंड पडते.

आशाताईंच्या या गाण्यात या सर्वाचे अगदी समर्पक वर्णन आलेय…..

स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा
गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा

रेखाकृती सुखाच्या चित्ती चितारलेल्या
साशंक कल्पनांनी सहजी विरून गेल्या
कधि सोशिला उन्हाळा कधि लाभला विसावा

नैराश्य कृष्णमेघी आशा कधी बुडावी
विरहात चिंब भिजुनी प्रीती फुलोनि यावी
काट्याविना न हाती केव्हा गुलाब यावा

सिद्धीस कार्य जाता येते सुखास जडता
जडतेत चेतनेला उरतो न कोणि त्राता
अतृप्त भावनांनी जीवात जीव यावा

आणि जर हा लेख अपूर्ण वाटला , तर त्याचा एकमेव उद्देश ही अपूर्णतेची गोडी तुम्हाला चाखवणे ,असं समजा.....

Friday, January 20, 2017

शोध आणि संवाद

गेल्या काही दिवसात अनेक हिंदी आणि मराठी चित्रपट पाहिले. एक विचार मनात आल्याशिवाय राहवत नाही ...कुटुंब आणि कौटुंबिक नातेसंबंध हा मराठी चित्रपटांचा आवडता विषय झाला आहे का ? तसाच स्वतःचा शोध हा हिंदी चित्रपटांचा केंद्रबिंदू होतोय का ? स्वतःचा शोध हा मोक्षप्राप्ती आणि सुख ह्या दोन्ही परस्परविरोधी उद्दिष्टांच्या मुळाशी आहे  आणि  त्यामुळे हिंदी चित्रपट मराठीपेक्षा एक पाऊल पुढे आहे का ?

पण थोडा विचार केल्यावर माझ्या असं लक्षात आलं , कौटुंबिक नात्यातही माणूस स्वतःलाच शोधत असतो. किंबहुना कधी त्या नात्यांच्या उबदार वर्तुळात राहून किंवा कधी त्या नात्यांपासून दूर जाऊन तो मी कोण आहे, मला खरंच काय हवंय, मी ऑथेंटिक आयुष्य जगतोय की इतरांनी आखलेल्या चौकटीत जगतोय ह्या प्रश्नांचा मागोवा घेत असतो. म्हणजे वरकरणी कौटुंबिक असलेले चित्रपटही खरं तर स्वतःच्या शोधावर आधारित असतात. पण पूर्णपणे स्वतः च्या शोधांवरील चित्रपटात कुटुंब हे धूसर पार्श्वभूमी असतं , त्यातली पात्रं किंवा नाती ठळकपणे रंगवलेली नसतात.( उदा. तमाशा )

फॅमिली कट्टा , राजवाडे आणि सन्स व ventilator हे मी खरतर almost एका दिवसातच  पाहिलेले 3 चित्रपट .ह्यांना एकाच माळेत गुंफण्याचे कारण म्हणजे त्या तिन्हींतून असणारा कौटुंबिक नातेसंबंधांचा धागा - कधी रेशमी , कधी साधा-सरळ सूती तर कधी जाडाभरडा , गाठी पडलेला.पण तिन्ही चित्रपटातून नातेसंबंधाबरोबरच अजूनही एक कॉमन धागा जाणवला-परस्परातील संवाद ...

Family कट्टा तसा साधा,सरळ ,लिनीअर म्हणता यावा तसा. म्हातारे आईबाप आणि त्यांची दूर राहणारी मुलं . अनेक वर्ष केवळ औपचारिक संवाद . लहानपणी एकमेकांसाठी असलेलं प्रेम हरवलंय ...

याउलट राजवाडे आणि त्यांची मुलं -इथे अतिपरिचय , अतिसहवास -कुणालाही space , privacy देण्याची पद्धत नाही.

व्हेंटिलेटर मात्र अनेक रंगांचं,अनेक पोतांचं वस्त्र … मुख्य रंग बाबा आणि मुलगा यांच्या नात्याचा .

संवाद हरवलेली आणि समजुतीच्या अभावाने रुक्ष झालेली हीे नाती. खूप वेळा असं होतं ...अगदी जिवाभावाचा एखादा माणूस आपल्यापासून दूर जातो , मित्र , एखादं भावंडं किंवा आई वडील सुद्धा. आपण आयुष्यात कितीतरी जणांशी केवळ वरवरचं असं औपचारिक नातं ठेवून असतो, भावनिक गुंतवणूक नसते फारशी.पण कदाचित म्हणूनच ती नाती आपल्याला सोयीस्कर वाटत असावीत. जिथे वेळ द्यावा लागत नाही, फार प्रयत्नही करावा लागत नाही आणि अपेक्षाभंगही होण्याची शक्यता कमी. Ventilator मधल्या राजा कामेरकरनेही कदाचित स्वतःभोवती एक भिंत घालून घेतली असावी.हॉस्पिटलमध्ये जमलेले ,कावकाव करणारे नातेवाईक त्यातलेच. वरवर प्रेम करणारे पण आतून काही वेगळाच agenda बाळगणारे. पण त्यातही काही अगदी genuine लोक दिसतातच आपल्याला, अगदी अनपेक्षित रित्या …

कुठल्याही नात्याचा पाया म्हणजे संवाद  आणि तोही डोळसपणे(!) केलेला.न बोलताच समोरच्याने समजून जावं ही अपेक्षा चुकीची . कुणीही इतकं सुज्ञ नसतं . तसंच दुसऱ्या पिढीचे लोक आपल्याला काही सांगू पाहतायत, ते त्यांच्या दृष्टिकोनातून पाहणे, समजून घेणे जरूरी . आज Generation गॅप नावाच्या आजारावरचा तो एकमेव आधार आहे.

शेवटी आपल्या आत्मशोधाला नात्यांच्या परिघात राहूनच अर्थ प्राप्त होतो आणि नात्यांच्या आरोग्यासाठी सुसंवाद हवा ...