गेल्या काही दिवसात अनेक हिंदी आणि मराठी चित्रपट पाहिले. एक विचार मनात आल्याशिवाय राहवत नाही ...कुटुंब आणि कौटुंबिक नातेसंबंध हा मराठी चित्रपटांचा आवडता विषय झाला आहे का ? तसाच स्वतःचा शोध हा हिंदी चित्रपटांचा केंद्रबिंदू होतोय का ? स्वतःचा शोध हा मोक्षप्राप्ती आणि सुख ह्या दोन्ही परस्परविरोधी उद्दिष्टांच्या मुळाशी आहे आणि त्यामुळे हिंदी चित्रपट मराठीपेक्षा एक पाऊल पुढे आहे का ?
पण थोडा विचार केल्यावर माझ्या असं लक्षात आलं , कौटुंबिक नात्यातही माणूस स्वतःलाच शोधत असतो. किंबहुना कधी त्या नात्यांच्या उबदार वर्तुळात राहून किंवा कधी त्या नात्यांपासून दूर जाऊन तो मी कोण आहे, मला खरंच काय हवंय, मी ऑथेंटिक आयुष्य जगतोय की इतरांनी आखलेल्या चौकटीत जगतोय ह्या प्रश्नांचा मागोवा घेत असतो. म्हणजे वरकरणी कौटुंबिक असलेले चित्रपटही खरं तर स्वतःच्या शोधावर आधारित असतात. पण पूर्णपणे स्वतः च्या शोधांवरील चित्रपटात कुटुंब हे धूसर पार्श्वभूमी असतं , त्यातली पात्रं किंवा नाती ठळकपणे रंगवलेली नसतात.( उदा. तमाशा )
फॅमिली कट्टा , राजवाडे आणि सन्स व ventilator हे मी खरतर almost एका दिवसातच पाहिलेले 3 चित्रपट .ह्यांना एकाच माळेत गुंफण्याचे कारण म्हणजे त्या तिन्हींतून असणारा कौटुंबिक नातेसंबंधांचा धागा - कधी रेशमी , कधी साधा-सरळ सूती तर कधी जाडाभरडा , गाठी पडलेला.पण तिन्ही चित्रपटातून नातेसंबंधाबरोबरच अजूनही एक कॉमन धागा जाणवला-परस्परातील संवाद ...
Family कट्टा तसा साधा,सरळ ,लिनीअर म्हणता यावा तसा. म्हातारे आईबाप आणि त्यांची दूर राहणारी मुलं . अनेक वर्ष केवळ औपचारिक संवाद . लहानपणी एकमेकांसाठी असलेलं प्रेम हरवलंय ...
याउलट राजवाडे आणि त्यांची मुलं -इथे अतिपरिचय , अतिसहवास -कुणालाही space , privacy देण्याची पद्धत नाही.
व्हेंटिलेटर मात्र अनेक रंगांचं,अनेक पोतांचं वस्त्र … मुख्य रंग बाबा आणि मुलगा यांच्या नात्याचा .
संवाद हरवलेली आणि समजुतीच्या अभावाने रुक्ष झालेली हीे नाती. खूप वेळा असं होतं ...अगदी जिवाभावाचा एखादा माणूस आपल्यापासून दूर जातो , मित्र , एखादं भावंडं किंवा आई वडील सुद्धा. आपण आयुष्यात कितीतरी जणांशी केवळ वरवरचं असं औपचारिक नातं ठेवून असतो, भावनिक गुंतवणूक नसते फारशी.पण कदाचित म्हणूनच ती नाती आपल्याला सोयीस्कर वाटत असावीत. जिथे वेळ द्यावा लागत नाही, फार प्रयत्नही करावा लागत नाही आणि अपेक्षाभंगही होण्याची शक्यता कमी. Ventilator मधल्या राजा कामेरकरनेही कदाचित स्वतःभोवती एक भिंत घालून घेतली असावी.हॉस्पिटलमध्ये जमलेले ,कावकाव करणारे नातेवाईक त्यातलेच. वरवर प्रेम करणारे पण आतून काही वेगळाच agenda बाळगणारे. पण त्यातही काही अगदी genuine लोक दिसतातच आपल्याला, अगदी अनपेक्षित रित्या …
कुठल्याही नात्याचा पाया म्हणजे संवाद आणि तोही डोळसपणे(!) केलेला.न बोलताच समोरच्याने समजून जावं ही अपेक्षा चुकीची . कुणीही इतकं सुज्ञ नसतं . तसंच दुसऱ्या पिढीचे लोक आपल्याला काही सांगू पाहतायत, ते त्यांच्या दृष्टिकोनातून पाहणे, समजून घेणे जरूरी . आज Generation गॅप नावाच्या आजारावरचा तो एकमेव आधार आहे.
शेवटी आपल्या आत्मशोधाला नात्यांच्या परिघात राहूनच अर्थ प्राप्त होतो आणि नात्यांच्या आरोग्यासाठी सुसंवाद हवा ...
No comments:
Post a Comment