ऑस्कर वाइल्डने म्हटलंय - There are only two tragedies in life: one is not getting what one wants, and the other is getting it.
आपल्याला जे मनापासून हवं होतं, ते मिळणं ही शोकांतिका का ठरावी ? जागून ज्याची वाट पाहिली ते सुख दारी येऊनही आपण म्हणावे तसे आणि तितके आनंदी का नसतो ?
“….And they lived happily ever after “ अशी स्वप्न अगदी सहज रित्या खरी होतात का ?
ज्यासाठी जीव टाकत होतो ,अशी नवी वस्तू घरी आली की होणार आनंद लगेच का मावळतो ?
खूप लोकांना हे कळत नाही की स्वप्नं पूर्ण होणे हा शेवट नसून सुरुवात आहे , एका नव्या प्रवासाची . जी व्यक्ती प्रवासाऐवजी , मुक्कामाकडे डोळे लावून वाटचाल करते, ती प्रवासातले छोटे छोटे आनंदाचे क्षण गमावते हे तर खरं आहेच, पण एक स्वप्न पूर्ण झालं म्हणजे आयुष्य सुफळ संपूर्ण झालं असं नाही हे कधी कधी तिला जाणवतही नाही.
And they lived happily ever after ची हीच कहाणी आहे. खरा प्रवास तर लग्नानंतर सुरु होतो. त्या नव्या नोकरीनंतर सुरु होतो. पूर्णपणे नवी जागा, नवी माणसं, नवी प्रणाली जाणून त्यात मिसळून जाण्याचं आव्हान कधी कधी खूप कठीण , तणाव कारक असू शकतं . पण त्यावर रोज थोडी मेहनत, थोड नशीब , थोडी आशा आणि बरंच हसू हा उतारा केल्यास गोष्टी हळूहळू त्या happily ever after च्या दिशेने सरकू लागतात.
पण ही अपूर्णतेची गोष्ट नाही. अपूर्णता ही जर-तर ची गोष्ट.’जर ती माझ्या आयुष्यात असती तर…’ हा शक्यतांच्या प्रदेशातील फेरफटका . खरं तर जर ती आयुष्यात असती तर तीही दिवसाच्या शेवटी भूतासारखीच दिसली असती , तीचेही हात खरखरीत असते. आणि त्याच म्हणाल तर पोट सुटलं असतं, टक्कल पडलं असतं आणि त्यालाही कदाचित जेवल्यानंतर ढेकर द्यायची सवय असती .
स्वप्न पूर्ण झाल्यावर The End .अजून काही छान घडण्याची शक्यता संपली.कदाचित आपल्या मनाला पुढे काय होईल ही उत्सुकता , हुरहुर अधिक उल्हासीत करते. अजून काय होऊ शकले असते हा विचार आत्ता काय झालंय ह्यापेक्षा जास्त उत्साहवर्धक आहे.
नवं स्वप्न ,नवा उत्साह, अधिक मेहनत करण्याची नवी उमेद . स्वप्नाचा पाठपुरावा करताना आशा निराशेचा खेळ, पुन्हा उल्हासित होऊन ,नव्या जोमाने कामाला सुरुवात ….हे अंगातला चैतन्य यश मिळाल्यावर काहीसे थंड पडते.
आशाताईंच्या या गाण्यात या सर्वाचे अगदी समर्पक वर्णन आलेय…..
स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा
गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा
रेखाकृती सुखाच्या चित्ती चितारलेल्या
साशंक कल्पनांनी सहजी विरून गेल्या
कधि सोशिला उन्हाळा कधि लाभला विसावा
नैराश्य कृष्णमेघी आशा कधी बुडावी
विरहात चिंब भिजुनी प्रीती फुलोनि यावी
काट्याविना न हाती केव्हा गुलाब यावा
सिद्धीस कार्य जाता येते सुखास जडता
जडतेत चेतनेला उरतो न कोणि त्राता
अतृप्त भावनांनी जीवात जीव यावा
आणि जर हा लेख अपूर्ण वाटला , तर त्याचा एकमेव उद्देश ही अपूर्णतेची गोडी तुम्हाला चाखवणे ,असं समजा.....
No comments:
Post a Comment