Tuesday, June 22, 2021

सहज सांगायची गोष्ट १

 पंकुची गोष्ट

पंकु आमचा ward boy. सर्वात मेहनती. कुठल्याही कामाला नाही नाही . सदैव तत्पर. ओवर टाईम म्हटलं की ह्याला आनंदाच्या उकळ्या फुटतात. गणपतीच्या दिवसात ,जेव्हा सर्व वॉर्डबोय गावाला जातात, ह्याला उत्तम संधी मिळते. मग त्यावेळी सलग ७२ तास सुद्धा काम करतो . घरीच जात नाही . तारवटलेल्या डोळ्यांनी, तिसऱ्या दिवशी, अक्षरशः उभ्या उभ्या झोपत असतो. पण तरीही कामात हलगर्जीपणा , चुका कधीच नाहीत .

महिन्याच्या शेवटी एखाद्या डॉक्टरला लाजवेल असा पगार ह्याच्या अकाउंट मध्ये येतो. साहेब या पैशाचं काय करत असतील ? दागिने घेतात ! दहा बोटांमध्ये २० अंगठ्या आहेत, हातात २ वेगवेगळ्या styles ची कडी आहेत आणि गळ्यामध्ये जाडजूड सोन्याची  "चैन ! "

ह्याचा आदर्श बप्पी लाहिरी, वर्सोव्याची एखादी कोळीण भागाबाई किंवा एखादा स्मग्लर असावा अशी मला नेहमीच शंका येते.

पंकु अजून एकटा आहे, दोनाचे चार हात कधी होतील ह्याच्या सदैव प्रतीक्षेत असतो. आमच्याकडे शिकायला येणाऱ्या सर्व मुलींकडे आशेने पाहतो, त्यांना सर्वतोपरी मदत करतो, त्यांचे लाड करतो, खायला प्यायला घालतो. त्या मुली ह्याला दादा म्हणून ह्याची हवाच काढून टाकतात. पण तरीही पठ्ठ्या कधीही आशा सोडत नाही. पुढची batch आली की तितक्याच उत्साहात स्वारी सेवेस तत्पर असते !

पंकु सर्व डिपार्टमेंटच्या समारंभाची जान आणि शान आहे. खायला घेऊन येणे, वाढदिवसासाठी केक आणणे, भेट वस्तू आणणे यात सर्वात पुढे. नवरात्रीत नऊ दिवस इमाने इतबारे सर्व रंगांचे शर्ट घालतो. शेवटच्या दिवशी department मध्ये सर्व यंत्रांच्या साक्षीने गरबा खेळायला लावतो. जिथे जिथे शक्य असेल तिथे गाणी लावून नाचायला बघतो, आणि सोबत जे तयार असतील त्यांनाही खेचतो. नागीण डान्स झालंच तर झिंगाट म्हणजे ह्याच्या आवडीचे प्रकार!

साहेब बोलताना मात्र तोंडातल्या तोंडात बोलतात, बऱ्याचदा तोंडात गुटखा असतो म्हणा( ह्यावरून आमच्याकडून नेहमी बोलणी खातो. त्यावर उत्तर ठरलेलं.. सोडलाय मी गुटखा, फक्त आजच खाल्ला ..तो पण जरासा.) गुटखा नसला तरीही लक्षपूर्वक ऐकलं नाही तर भलतेच अर्थ निघतात त्याच्या बोलण्यातून. ( ' "तुमच्या डोळ्याला काय हे रंग लावलेत ते चांगले दिसतायत"  ही माझ्या डोळ्यांच्या मेकअपला दिलेली दाद समजायला मला खूप वेळ लागला. मुळात हा अस्थानी अशी दाद देईल हे ही माझ्या गावी नव्हतं म्हणा !)

परवाचीच गोष्ट…

माझ्या colleague( डॉक्टर) ने नवं घर घेतलं, मुंबईच्या चांगल्या भागात. त्या निमित्ताने सर्वांसाठी खायला घेऊन आली. हे साहेब खाऊन बिऊन झाल्यावर धन्यवाद देण्यासाठी केबिनमध्ये आले . 

तो: किती पैशे पडले ?

आम्ही एकमेकाकडे बघतोय.

डॉक्टर: अरे मिठाईसाठी अमुक अमुक आणि कचोरीसाठी अमुक.

तो गोंधळून बघतोय आमच्याकडे

मी: अगा तो विचारतोय ,घर कितीला पडलं

तो: हा , रूम कितीला घेतला तुम्ही ?

आता आम्ही दोघी हसतोय. 

मी: अरे वा, आता मॅडम च्या बाजूला घर घ्यायचा प्लॅन आहे वाटतं.

तो थोडं लाजून: नाय नाय, सहज विचारलं

तो गेल्यावर आम्ही दोघी खूप हसलो. म्हटलं, तुला लवकर नवा शेजारी येणार आणि फावल्या वेळात तुला त्याच्यासाठी मुली बघाव्या लागणार..तयारीत रहा !No comments:

Post a Comment