"ओळख पाहू आज आमच्या हॉस्पिटलमध्ये कोण आलं होतं ?"
"कोण ? काहीतरी क्लू तर दे."
"हंं… बरं , असं बघ , एक VVVIP व्यक्ती आली होती , स्वतः च्या रक्त तपासण्या करायला. आता सांग."
( मला खरं तर ती VVVIP व्यक्ती आणि तिचं रक्त यांत मुळीच स्वारस्य नव्हतं. पण आपलेच दात , आपलेच ओठ, सांगतो कोणाला !)
"बरं बरं , ऐक…..
अमिताभ ?
शाहरुख ?
सचिन ?
अंबानी ?
हा sss कटरिना !!!!!"
मी अगदी चालीत म्हणून दाखवलं.
"आता तू ओळख , मी कुठच्या गाण्याची चाल वापरली आहे ते !"
"गाणी बिणी मला फारशी माहिती नाहीत बुवा ! तूच सांग.."
"अग , ते कटी पतंग मधलं गाणं " मेरा नाम है शबनम "
आठवलं ? त्यात नाही का शेवटी ' आशा गाते ' लीना , मीना , अंजू,मंजु, या sssssss मधू !!! "
आम्ही दोघेही हसू लागलो. लगेच यु ट्यूब वर जाऊन ते गाणं शोधून बघितलं. आणि जुन्या, छायागीतच्या आठवणी जाग्या झाल्या…..
राजेश खन्ना आणि आशा पारेख एका बार मध्ये पांढऱ्या रंगाच्या कप-बशी मधून चक्क चहा पीत बसलेत. मागे तोकडे कपडे घालून बिंदू अंगाला असंख्य झटके देत कॅबरे करतेय ! हे गद्य गाणे जीव तोडून गातेय. दोन ओळींच्या मध्ये एक extra कलाकार जमिनीवर लोळत, आरडीच्या आवाजात आचके देतोय !
आपल्या आशाचा आवाज कसा मस्त, मोकळा, बिनधास्त, सळसळता ! कसलीही inhibitions न बाळगता, खर्जातून, तार स्वरात अगदी लीलया जाणारा… कुठेही अगदी कणभर सुद्धा बेसुर न होता ती ' या ssssss मधू 'असं ओरडते.
तसा विचार केला तर हे गाणं तसं absurd च आहे. पण त्या absurdity मध्ये सुद्धा एक मजा आहे. आशा पारेख च्या चेहऱ्यावरचे बदलणारे रंग , राजेश खन्नाला काहीही समजत नसल्याने, ठोंब्यासारखे, कॅबरेचा रसास्वाद घेतल्याचे समाधान आणि बिंदुच्या चेहऱ्यावरचे ' कसं पकडलं ! आता तुझी वाट ! ' असे भाव ! हे गाणं नुस्तं ऐकण्यात नाही, तर बघण्यात समाधान आहे …( तरीही आरडी चं music मात्र मजा आणतं ! )
या आठवणीत मूळ प्रश्नाला बगल मिळाली !
"अगं , कोण आलं होतं, आता तरी सांगशील ?"
"तिचं नाव सोनूबाई"
"सोनुबाई ? VVVIP ?"
"हो, ते अमके अमके राजकीय नेते आहेत ना, त्यांची मोलकरीण !"
No comments:
Post a Comment