माझे minimalism चे प्रयोग : खरं तर शुभारंभाचे प्रयोग !
“सौ चुहे खाके बिल्ली हज को चली” असं कुणी म्हणालं तर म्हणू देत. पण तरीही आता डोक्यात आलंय म्हणजे करून बघायलाच हव.
पण खरोखरच तसच झालंय म्हणा...अती झाल्यानेच ही बुद्धी झाली. Collection collection म्हणता म्हणता इतक्या गोष्टी(म्हणजे मुख्यतः दोन गोष्टी - पुस्तकं आणि नेल पॉलिश) जमवल्या की त्या पुढील ४-५ वर्ष वापरूनही संपणार नाहीत.
मग स्वतः चा तिटकारा वगैरे ,”किती ही पैशाची नासाडी “असा मध्यमवर्गीय विचार… कधी ‘मी इतर कशावरही पैसे खर्च करत काही म्हणून केलं’अशी स्वतःची स्वतःला च दिलेली सफाई , तर कधी ‘हौसेला मोल नाही ‘अशी मखलाशी ! शेवटी स्वतःचा फारच राग आला तेव्हा यु ट्यूब वर minimalism या विषयावरचे व्हिडिओ डोळ्यासमोर आले. म्हणजे योगायोगाने , पण आले खरे…. त्या देवाची अशीच इच्छा होती की काय देवच जाणे ,मग लगेच कपाटांची आवराआवरी , गोष्टी फेकून देण्याचा सिलसिला सुरू झाला. पण तिथेही मध्यमवर्गीय मनोवृत्ती आलीच एवढे माझे नेल पॉलिश- सरळ फेकून देऊ ? एवढे पैसे फुकट घालवू ? कुणी विकत घेईल का सेकंड हॅण्ड ? बरं नाही तर नाही - निदान कुणाला देऊन टाकू का ? त्यामुळे सध्या तरी ते मी लपवून ठेवलेत स्वतःपासून , म्हणजे दृष्टीआड केलेत , टाकल्याच नाटक केलंय स्वतःशीच. बघुया पुढे काय होतंय ते. निदान अजून विकत घेण्याची दुर्बुद्धी झाली नाही पुढलं , एखादं वर्ष तरी बास म्हणते मी. एक प्रयोग सुरू केला मी - प्रत्येक नेल पॉलिश लावून बघण्याचा : हवं की नको ठरवण्यासाठी, पण जी नको होती, तीही टाकण्यासाठी मन धजावलं नाही …. मग आपली लपवणुक चालूच...
ह्याच योगे दुसरी गोष्ट - आपल्या फोन वरची अॅप कमी करणे. कारण सहज , वेळ जात नाही, थोडं लो वाटतंय म्हणून त्या अॅप वर वारंवार फेरफटका होतो माझा. त्यात “अरे वा , नवीन शेड दिसतेय , try केली पाहिजे. “असा विचार सतत मनात येतो. कधी तर आपल्याला काही रंग आवडत नाहीत, शोभून दिसत नाहीत हे माहीत असूनही केवळ फोटो छान आहे म्हणून खरेदी होते.
तेही कमी करण्याचे प्रयोग आधी झालेत , पण यशस्वी ठरले नाहीत , काही दिवसांनी त्या सर्व अॅप नी अत्यंत विजयी मुद्रेने माझा आयुष्यात पुनरागमन केलेच. त्यामुळे यावेळी मी अत्यंत धोरणीपणाने त्या सर्वांच्या ईमेलना सुद्धा unsubscribe केलंय.
आता बघू पुढे काय होतंय ते.
दुसरा मुख्य संग्रह पुस्तकांचा - मी वाचन खूप करते , पण त्याही पेक्षा जास्त पुस्तकं विकत घेते. कधी ebooks तर कधी physical books. कधी नवी तर कधी सेकंड हॅण्ड . महिन्याला १० वाचते पण २० विकत घेते, कशी वाचून होणार ती ? अगदी प्रत्येक वर्षी ,ना चुकता, १ जानेवारी ला संकल्प करते - एकही पुस्तक विकत घेणार नाही. पण वजन घटवण्याचा आणि हा संकल्प , कायम बाराच्या भावात जातो! इथे मात्र पुस्तक कमी करण्याचे उपाय आहेत - विकणे , रद्दीत देणे अथवा वाचनालयाला भेट देणे. पण इथेही ठरवलंय, इतक्या प्रेमाने घेतलेल्या पुस्तकांना संधी द्यायला हवी , थोडं वाचून बघते - बरं वाटलं तर ठेवते नाहीतर टाटा बाय बाय !
हे प्रयोग खरं तर कालपासूनच सुरु केलेत.हे घरातल्या इतर गोष्टींनासुद्धा लागू पडतात. उदा. वाण समान. उगाच ढीगभर गोष्टी आणून ठेवते, ‘ लागलं तर ’ असा विचार करून... खरं तर दुकान समोरच आहे , इतक्या वर्षांच्या संसारा नंतर आपल्याला खरं तर आपण काय आणि किती वापरू अंदाज येतोच, पण सुपर मार्केट मध्ये गेल्यावर मोह होतोच. ठीक आहे - आज चुकले , उद्या सुधरेन असं म्हणत मजल दरमजल करायची….
पण मुळात मी इतकी वस्तूच्या मोहात पडणारी कधी ,कशी आणि का झाले ?
म्हणजे असं झालंय की एकदा वापरून टाकायचं किंवा वाचून टाकायचं या विचाराने मी हल्ली त्या गोष्टींची मजा घेणं सोडून दिलंय. हळू हळू,आस्वाद घेत , एखादं पुस्तक वाचायचं, कधी तरी , थोडं थांबून एखादं आवडलेल वाक्य, परिच्छेद, पान पुन्हा वाचायचं हे सर्व बंदच झालंय. भराभर वाचायचं आणि लोकांना सांगायचं - ब्लॉग वर ,goodreads वर…. हे उद्दीष्ट राहिलं आहे , तो लहानपणीचा काळ- जेव्हा एकच पुस्तक पुनः पुन्हा वाचायचे तो कधीच सरलाय , आता उरली आहे ती फक्त स्वतःशीच शर्यत. आणि दिखावा.
आणि हे minimalism चे प्रयोग मनातल्या विचारांवर सुद्धा करता येतील ? मेडिटेशन करून मन सुद्धा रिकामं करता येईल ? प्रयोग करून बघायला हवं….