Monday, October 24, 2016

हर फियरफुल सीमेट्री

हर फियरफुल सीमेट्री

हल्ली कादंबऱ्या कथा वाचायला थोडा कंटाळाच येतो , अगदी माझ्या आवडत्या  रहस्यकथाही ... काही दिवसांपूर्वी लायब्ररीत एका ‘चीन’ वर लिहिलेल्या पुस्तकाच्या शोधात फेरी मारताना हे पुस्तक हातात पडलं…

खरं तर हे पुस्तक अगदी उत्कृष्ट,जरूर वाचावे या पठडीत बसत नाही. पण तरीही काही इंटरेस्टिंग आयडिया आणि वेगवान कथानक यामुळे रंजक नक्कीच आहे...हे पुस्तक वाचताना मनात सहज आलेले काही विचार ….

लेखिका Audrey Niffenegger हिचे याआधीच पुस्तक अत्यंत सुंदर होते , थोडी फँटसी, एक उत्कट प्रेमकथा , आणि शोकांतिका म्हणावी की सुखांतीका असा विचार करायला लावणारी भन्नाट कल्पना होती ( The timekeeper’s wife)

या पुस्तकातही एक फँटसीचा एलिमेंट आहेच. पण त्याबरोबर मुख्य कथानकात सुंदर नात्यांची हळुवार उलगड आहे….

यातली पात्रही अगदी रंगीबेरंगी ,वैविध्यपूर्ण… आणि त्यांचे व्यवसायही नाविन्यपूर्ण...कुणी RJ आहे , कुणी Highgate सिमेटेरी ,लंडनचा Tour Guide आहे , एक क्रॉसवर्ड निर्माण करतो , तर आपल्या नायिका ‘ are simply not interested in education or jobs ‘...वाटतं की ह्यातल्या प्रत्येकाचा थोडा अंश माझ्यात आहे...Marijke जी  नव्या आयुष्याच्या शोधात घर सोडले … तिचा नवरा मार्टिन जो स्वतःच्या भवती एक कोष विणून त्यातच राहू पाहतोय , रॉबर्ट ,उत्कट प्रेम आणि कायमचा विरह- अनुभवणारा ….

अरेरे ! फार पुढे गेले …

(‘झाडाचं भूत’ एक गोष्टीतली गोष्ट - पण अगदी वेगळीच कल्पना ...भीतीदायक आणि कुठेतरी थोडी calming सुद्धा)

तर या गोष्टीत जुळ्या बहिणीच्या दोन जोड्या आहेत...हिंदू शास्त्रांप्रमाणे , आपली जन्मवेळ आणि स्थान याप्रमाणे आपल्या आयुष्याचा क्रम लिहिला जातो…(विश्वास नसला तरी ही कल्पना मला नक्कीच फेसिनॅटिंग वाटते…माझ्या ओळखीची अशीच एक जुळ्या बहिणींची जोडी आहे , ज्यांच्या आयुष्यात खरंच सर्व गोष्टी एकमेकांना समांतर घडतायत...अर्थात त्या नाट्यपूर्ण नाहीत, म्हणून सांगत नाही..)

ही गोष्ट  Highgate सिमेटेरी च्या सान्निध्यात घडते , सिमेटेरीज वातावरणनिर्मिती साठी उत्तम ! (पण आपलं भूत इथे कधीच येत नाही…) ह्यावरून आठवलं, गोव्याला माझ्या काकांच्या घराशेजारीच एक ख्रिश्चन दफनभूमी होती , कधी रात्री तिथून जावं लागलं की पाचावर धारण बसायची , अक्षरशः धावतच घर गाठायचो…

जुलिया आणि वॅलेन्टीना जुळ्या बहिणी , त्यांची आई एडी हिलाही एक जुळी बहीण आहे, पण त्यांची ही Elspeth मावशी गेली अनेक वर्षे आपल्या बहिणीपासून दुरावलेली आहे. अचानक कॅन्सर मुळे Elspeth चा मृत्यू होतो , तेव्हा तिच्या मृत्युपत्रात तिने आपलं सर्व काही आपल्या भाच्यांच्या नावे करून ठेवले आहे हे उघड होते …

इल्सपेथ मृत्यूनंतरही पंचतत्वात विलीन झालेली नाहीये , तिथेच आहे ,आपल्या घरात ,एक पुसट, अस्पष्ट अस्तित्व...एका छोट्याश्या कप्प्यात स्वतःला आखडून घेऊन राहणारं , आणि तिथे सुरक्षित वाटणारं…

नाही , ही तशी भयकथा नाही , पण ह्यातली (थोडीफार) भयनिर्मिती ही खरं तर स्वार्थी मनुष्य स्वभावामुळेच झालीये….

अर्ध पुस्तक झाल्यावर मला आठवलं- हे पुस्तक मी आधी वाचलंय , हे कप्प्यात राहणारं आणि दिवसेंदिवस थोडा आकार आणि शक्ती मिळवणार भूत ओळखीचं आहे की ! आणि त्यातला मांजराचं पिल्लूही - जे अजाणतेपणे माणसांच्या आणि भूतांच्याही मनात भलत्याच कल्पना घालू पाहतंय….

पुस्तक मनोरंजक आहे , पण अनेक प्रश्नांची समाधानकारक उत्तरं देत नाही , इल्सपेथ भूत का झाली आणि ती आपल्या घरातच का अडकून राहिली , तसेच एडी आणि इल्सपेथ या बहिणीचं तकलादू रहस्य व त्या मागची कारणमीमांसा दोन्हीही गोष्टी पटत नाहीत , आणि त्यांची चलाखी पकडली गेली नाही हे तर बिलकुलच ….

हाँ , इथे लेखिकेने जी शक्कल लढवलीये, तिला दाद द्यायलाच हवी ….ज्या प्रश्नांची उत्तरं तिला सुचली नाहीत ते सारे प्रश्न तिने आपल्या पात्रांच्या तोंडी दिलेत ….आणि अर्थातच त्यांनाही त्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत….

असो , थोडक्यात विश्लेषण - “मनोरंजक पण पुन्हा वाचण्याजोगे नाही ….”

No comments:

Post a Comment