Tuesday, January 24, 2017

अनपेक्षित आज्जीबाई

कामाच्या त्रासदायक विचारांपासून दूर पळण्याचा उत्तम उपाय म्हणजे मनाला बधिर करणे. काही लोक व्यसनाधीन होतात. माझ्यासारखे काही लोक मात्र काही राजमान्य अथवा सर्वमान्य व्यसनांचा आसरा घेतात. मी पुस्तक , आणि दृक श्राव्य माध्यम यांच्याबद्दल बोलतेय. दृकश्राव्य म्हणजे पूर्वी दूरचित्रवाणी होती . अर्थात तिथे आपली मर्जी फार चालत नसे. यु-ट्यूबने मात्र हा प्रश्न काहीसा सोडवलाय.

पूर्वी घरी आले की कामं आटपून TV समोर बसायचे , ते आता कानात earphones घालून मोबाइलला चिकटून बसते. अर्थात, लेकाच्या अभ्यासात अडथळा नको अशी एक उदात्त विचारधाराही आहे ( असं मी सर्वांना सांगते ! महान मातृहृदय वगैरे वगैरे !! तोही इतक्या गंभीरपणे अभ्यास करतो की मलाच कधी कधी भरून येते..)

यू ट्यूबची एक फार छान गोष्ट, खरं तर सोय, अशी आहे की आपण एक व्हिडिओ पाहिला, की आपल्याला भावतील अशा अनेक व्हिडिओंची रांगच उभी करतो आपल्यापुढे...घ्या, किती पाहाल ते.

एक जमाना होता, ज्यावेळी मी पाकिस्तानी उर्दू मालिकांची पारायणे करत होते. पण देशभक्ती,लोकलाज आणि तोचतोचपणा (इथे त्यांचं आपल्याशी असलेलं साधर्म्य दिसतं -कुणी कितीही नाकारलं तरीही ! विनोदात बाष्कळपणा अगदी तसाच !) या सर्वांमुळे मी त्यांच्याकडे पाठ फिरवली.( आणि आता पाहिल्या तरी गुपचूप ! या कानाची त्या कानाला खबर नाही लागू देत !)

अशा एका नाजूक (!) वळणावर मला कॉलिन फर्थ भेटला.( ऐकायलाही छान वाटतं ...भेटला !!) त्याबद्दल मी माझ्या दुसऱ्या ब्लॉगवर लिहिलं आहेच.त्यानंतर इंग्रजी सिनेमा आणि TV मालिकांची एक मोठी रांगच लागली.

आज youtube वर फिरताना अचानक The millionairess हा BBC ने प्ले ऑफ द मंथ या शीर्षकांतर्गत प्रसारित केलेला एक नाट्यचित्रपट पाहिला.

मूळ लेखक : George Bernard Shaw .

एका अतिश्रीमंत बाईची ही गोष्ट , जी स्वतःसाठी सुयोग्य जोडीदाराच्या शोधात आहे. ह्या बाईची सवय आहे-मी म्हणेल ती पूर्व. तिच्या इच्छांच्या आड प्रत्यक्ष परमेश्वरही यायला धजावणार नाही.

यातला विनोद caustic आणि pungent म्हणावा लागेल.ऑस्कर वाइल्ड सारखा witty किंवा शब्दांशी खेळणारा निश्चितच नाही. बर्नार्ड शॉचं 'पिगमालिओन' आठ्वल्यावाचून राहवत नाही. त्याचीही अनेक रुपं पाहिलीत. 'ती फुलराणी' पासून देव आनंदच्या 'मनपसंद 'पर्यंत.रेक्स हॅरिसनचा 'माय फेअर लेडी' मूळ नाटकाच्या सर्वात जवळचा. तिथे शॉ चा विनोद बोचणारा होता आणि शाब्दीकही . मुळात ते नाटकच शब्दांच्या आणि भाषेच्या जादूवर लिहिलेले आहे.असो. त्यावर पुन्हा कधीतरी.

तर एस्पॅनिया या अतिश्रीमंत तरुणीची भूमिका वठवलीये मॅगी स्मिथ यांनी.चेहरा ओळखीचा वाटलं म्हणून गूगल केलं ( हल्ली ही एक खूप छान गोष्ट झालीये -कुठलंही पुस्तक,नाटक,सिनेमा पाहिला, किंवा पुस्तक वाचलं की गूगल करून त्याबद्दल अधिक माहिती मिळवायची. कधीकधी ही माहिती/Trivia मूळ सिनेमा/पुस्तकापेक्षाही अधिक मजेदार व entertaining असते.) अरे! ही तर आपली McGonagall...Minerva McGonagall. चेहऱ्यावरील करारीपणा तेव्हाही तसाच होता. No nonsense वृत्ती आणि कर्तबगारीही तशीच.

अचानक ओळखीचं माणूस भेटल्याचा आनंद झाला...

...आणि मिनर्वा आज्जी तरुणपणी कशा दिसायच्या- बोलायच्या तेही दिसलं !!

No comments:

Post a Comment