Thursday, December 31, 2015

निसर्ग

कधी वाटते तडक उठावे
वाटेने या चालत जावे....

सोडून ही मळलेली वाट....
ओलांडून हा जुनकट घाट....

पोहोचावे त्या वनात नीरव ...
गच्च झाडीचा जेथे मांडव ...

खळखळणारा जेथे झरा ....
अलवार सोबत करतो वारा...

पाय सोडूनी जळात बसावे....
मनातले गुज त्यास वदावे.....

खळखळ झरा जातो वाहत ...
ठेवत नाही काही मनात ....

किलबिल कुंजन सुरेख सुंदर
नाजूक ते रव मनही नीडर....

भिनते अंगी ही शांतता ...
शहरी गजबज निघून जाता ...

प्रतिमा तेथे आपुली पाहून ....
परत फिरावे ताजे होऊन ....

Wednesday, December 30, 2015

मीरा...

" चाला वाही देश " मीराबाईच्या भजनांचा अतिशय सुंदर अल्बम , पंडित हृदयनाथ मंगेशकरांच संगीत आणि लताबाईचा स्वर ! एकाहून एक सरस भजनं आणि गायला त्याहून कठीण....ही गाणी गाता येण्याइतपत तयार व्हावं ही माझी सुप्त इच्छा ! असो ....हे घडेल तेव्हा घडेल...तोपर्यंत माझ्या यातील अत्यंत आवडत्या भजनांबद्दल थोडेसे.....
खरं तर मीराबाई ही राजस्थानमधील ... पण पुढे उत्तर प्रदेशात येऊन राहिली असा उल्लेख आहे. तिच्या या भजनांवर मारवाडीबरोबरच ब्रिजभाषेचा प्रभाव आढळतो .या विषयावर माझा फारसा अभ्यास नाही पण तरीही मला असे वाटते की ,कदाचित ही भजनं मुळ मीराबाईची नसावीत ....काही ओळी ,शब्द ( किंवा कधी पूर्ण भजनच ) नंतर घातलेले असावेत.

" सखी री लाज बैरन भाई ....."

मीरा कृष्णाबरोबर गोकुळी गेली नाही...जाऊ शकली नाही ...जेव्हा तो रथात बसू लागला तेव्हा,शरमेमुळे मागेच राहिली...आता मात्र विरहाने कासावीस झाली आहे...हृदयावर मोठा पत्थर ठेवल्यागत तिची अवस्था झाली आहे... ती म्हणते...इतका विरह सहन करण्याच्या आधी ,माझे अस्तित्व पंचप्राणात विलीन का झाले नाही....त्या योगे तरी कृष्णाशी एकरूप होता आले असते....

चाल केवळ  अद्वितीय....सखी री , गई आणि गोकुळ वरच्या जागा सुरेख...एक विशेष म्हणजे गाण्याच्या  शेवटी येणारा तो खळखळणाऱ्या पाण्याचा आवाज...अलगद पुढच्या गाण्यात मिसळून जातो....


"को बिरहिनी को दुख जाणे है....."

विरहिणीचे दुःख तीच जाणे...कान्हा सोडून गोकुळी निघून गेला...आता तिने काय करावे ?...मीरा विवाहित असली तरीही तिने मनोमन कृष्णाला पती मानले आहे...या विरहाग्निचे औषध तिला ठाऊक आहे....ते औषध म्हणजेच कृष्ण तिच्या तनामनात वसलेला आहे...पण या क्षणी मात्र तिला तो आपल्याहून दूर झाल्याचा भास होतोय ....विरहाग्नीने पोळून उठलेल्या मीरेचे दुःख ही दगड-माती-कचऱ्याचे जग काय समजणार ? हरिशिवाय हे जग,हे सुख व्यर्थ आहे !

या गाण्यातील वैशिष्ठ्यपूर्ण गोष्टी ...कोरसचा सुरेख उपयोग...गाण्याला बांधून ठेवायला...गाण्याची सुरुवात तसेच दोन कडव्यांच्या मध्ये ..... तसेच गाण्याचा ताल ( धम्मार ).....





अतिशय सुरेख...तितकीच कठीण गाणी...मनाला ताजेपणा देणारी...मीराबाईच सामर्थ्य की  पंडितजींच्या संगीताच ? माहित नाही....पण आपलं काम श्रवणानंद घेण्याचं...आपण तेच करायचं .............




Tuesday, December 29, 2015

शब्द जुळारी !!

मी तर केवळ शब्द जुळारी ...



भावनांचा पीळ...
लांबलचक वाक्ये...
काही चमकदार शब्द...
काही उद्गारचिन्हे !!!

तोडून फोडून
उलटून सुलटून...
ठेवते समोरासमोर
जरा आलटून पालटून...

कधी जाते जमून
पटकन एखादे यमक
पण असते कुठे त्यात
ती काव्याची महक

नुसतीच बोलीभाषा
असते गद्यच खरे
चांगले म्हटले म्हणून
ठरेल कसे बरे

धन्य ते कवी-शायर
लिहिती सुरेख ओळी
किंवा भावपूर्ण,आशयगर्भ
सुबकशी चारोळी

मी बापडी,उचलून पेन
खरडत राही काहीबाही
मी कसली कवयित्री
मी तर केवळ  शब्द जुळारी !!!

मूर्ती

छे ! नाही !! अजिबात नाही !!!
तू तर "तो " बिलकुल नाहीस....
ज्याला मी शोधतेय
कित्येक वर्षापासून...
तू तर असाच एक आपला
आकाशातला दूरगामी तारा ..

पहिल्यांदा भेटले तुला ...
चक्क देवच समजले !
असाही माणूस असतो का ?
अशा विचारात हरपले...
हळूहळू ओळख...मग मैत्री...
देवाचा माणूस...आणि माणसाचा मित्र....

मग काळाच्या ओघात वाहून गेलो...
कुठे तू...आणि कुठे मी.....
गुपचूप तुझी खबर ठेवून होते
तू मोठ्ठा माणूस झाल्याचे ऐकून होते...
मधल्या काळात माझ्या लेखी...
अधिकच "गुणी" बनलास तू...

मग कधीतरी पुन्हा प्रकटलास ...
या दिव्यजालातून अचानक...
मी आनंदून हात पुढे केला...
अनोळखी नजरेने मात्र तू प्रतिसाद दिला...
आठवण द्यावी तुला...नाही धजावले मी...
"कोण आपण ?" या प्रश्नाला ...प्रचंड घाबरले मी....

असू दे...असतात अशीही माणसे
विसरभोळी....
पण हो...ती तर माणसच असतात.....
आणि तुला तर मी देव बनवलेलं !'
पण तुझे पाय मातीचे होते....
तुझा नाही रे बाबा...माझंच चुकलं !!

वाट

नव्या वाटेवर ,नवे काटे...
नवे दगड , नवे गोटे...

ठेच तर लागणारच...
वेदना जाणारच मस्तकात..
अंगात झिणझिण्या आणि
बधीरता येणारच देहात...

पण तरीही...
पुन्हा उठायच...
विचार न करता...
चालू पडायचं.....

अनुभवायची
वेदनेची धुंदी...
नशीली ....
नविनता पदोपदी....

ही वाट
सतत नव शिकवते....
विजयाकडे
हीच तर घेऊन जाते...

अंतिम जयापेक्षा थरारक
या वाटेचा प्रवास...
एकदम मोठे होण्यापेक्षा
हळूहळू बदलण्याचा प्रयास..



तिन्हीसांज....उडासलेली....

शेखर ताम्हाणे लिखित " तिन्हीसांज  "नाटक ही एक रहस्यमय संगीतिका आहे ( असा त्यांचा दावा आहे )...यात २-३ गाणी जरूर आहेत...जी त्यावेळी ऐकायला छान वाटतात , पण नंतर एकही लक्षात राहत नाही.. .... यातील रहस्य मात्र अगदीच सपक !

मोहन ( अंगद म्हसकर ) एक गाणं हरवलेला गायक,त्याची सुविद्य,श्रीमंत , वकील पत्नी भारती ( शीतल क्षीरसागर ) आणि मुलगा आशुतोष यांच्या सोबत पत्नीच्या प्रचंड मोठ्या वाड्यात राहतोय .मोहनच गाणं त्याच्या प्रेमभंगामुळे हरपलंय ...गेली १४ वर्ष तो एक दारुमय,रिकाम आयुष्य जगतोय.मात्र, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी, देवळात आरती सुरु झाली की  त्याच्या अंगात न्यायाधीश संचारतो... आपल्या हरवलेल्या प्रेमाची दाद मागत , जो समोर येईल त्याच्यावर खटला भरत सुटतो.....

आणि अचानक एके दिवशी, त्याची हरवलेली प्रेयसी , शकीला त्याच्या समोर येऊन उभी राहते ...मोहनला त्याच प्रेम आणि गाणं दोन्ही गवसतं..पण त्यातच एके दिवशी अचानक, संकष्टीच्या दिवशी, न्यायाधीश महाराजांचं आगमन होतं....आणि मोहन भानावर येतो, तोपर्यंत शकीलावर प्राणघातक हल्ला झालेला असतो....
इथे पहिला अंक संपतो.

दुसऱ्या अंकात रहस्याचा उलगडा....

आधी या नाटकातील जमेच्या बाजू....मुख्य कलाकारांचा  सशक्त अभिनय , नाटकाला थोडंफार सुसह्य बनवतो .विशेष उल्लेख छोट्या आशुतोषच्या भूमिकेतील श्रीराज ताम्हणकर याचा..तबलाही सुरेख आणि अभिनयही सहज सुंदर,नैसर्गिक. शीतल क्षीरसागर- कर्तबगार ,करारी वकील आणि एकतर्फी प्रेमात होरपळणारी पत्नी म्हणून आवडून जाते. कोर्टातील भावनोद्रेकाचा प्रसंगही  चांगला वठला आहे  . अंगद म्हसकरचे लोभस,देखणे व्यक्तिमत्व मोहनच्या भूमिकेला साजेसे . प्रेम, विनोद तसेच भावोत्कटता- सर्वच प्रसंगात उत्तम अभिनय ...विशेषतः न्यायाधीश संचारल्यावर होणारे परिवर्तन ,त्या प्रसंगातला stage चा वापर प्रभावी .

नेपथ्य आणि प्रकाशयोजना चांगली  - घराचा दिवाणखाना ,व्हरांडा ,बाग  आणि बागेतील कारंज सुंदर . शकीलाची वेशभूषा योग्य , १९३६ साली बायका - अगदी शिकलेल्या असल्या तरीही - स्लीवलेस ब्लाऊझ घालत ,की  लांब आणि फुग्यांच्या  हाताचे ....विचार करण्याजोगा प्रश्न ....

कमी पडते ती गोष्ट...नाटकाची संहिता फार दुबळी,तोकडी. दिग्दर्शनही फार प्रभाव टाकू शकत नाही. इतिहासातील आणि वेशभूषेतील चुकांकडे दुर्लक्ष करूनही नाटक फारसे रंगत नाही.कमकुवत प्लॉट ,पटकन समजून येणारे  रहस्य , कोर्टरूम ड्रामा अशी जाहिरात असूनही  कोर्टातील फक्त दोनच...तेही अर्धेमुर्धे  प्रसंग...
नाटकात संगीत आणि रहस्य दोन्ही पुरेसे स्थान मिळवू शकले नाही...कशाला महत्व द्यावे हे न जाणवल्यामुळे दोन्हींवर अन्याय झालाय....रहस्य पुरेश्या विस्ताराभावी सपक,विरळ वाटतं. पहिला अंक अक्षरशः फुकट गेल्यासारखा वाटतो---प्लॉटचा ,ज्याला buildup म्हणतात तो झालाच नाही...प्रेमालाप आणि गाणी यावर फार वेळ फुकट गेलाय. प्रेमकहाणी दीर्घ आणि रहस्यकथा फार त्रोटक असं काहीसा वाटतं. रहस्यमय , कोर्टरूम ड्रामा म्हणून पाहायला येणारा प्रेक्षक नक्कीच निराश होतो.रहस्याचा उलगडा होताना आणि एकदा मोहनच्या तोंडी असलेले " तेंडूलकरी ,उघडे वाघडे "संवाद खटकतात .

एकंदरीत मोठ्या अपेक्षेने रहस्यमय नाटक पाहायला गेलेला प्रेक्षक निराश होणार एवढं नक्की ...




Monday, December 28, 2015

आमचाही एक असाच… बाजीराव

प्रत्येकीच्या मनात
एक बाजीराव असतो…
कधी रोमीयो ,कधी फरहाद
तर कधी फवादही भासतो….

गालावरच्या बटा हटवत
थेट मनात पाहतो…
“खुप सुंदर दिसतेस “
अलगद सांगून जातो…


लाडीगोडी ,छेडखानी
चोरटे स्पर्श उगीचच…
नुसत्या नजरेने त्याच्या
देही उठती रोमांच…


चांदण्या रात्री लाँग वॉक…
कधी मोगऱ्याचा  गजरा…
कधी एकच गुलाब
लालचुटुक टपोरा…


या स्वप्नांच्या गावी…
प्रेमानेच पोट भरतं…
जेवणबीवण ,कामबीम
असं काहीच नसतं…


आमच्या मनातला बाजी
कधीच व्यभिचार नसतो…
खरं सांगू का..हा चेहरा..
आपल्याच माणसाचा असतो….

दोन नाटके...

हल्लीच लागून सुट्टी मिळाली ...म्हटलं सुट्टीचा सदुपयोग करुया...दोन दिवसांत दोन मराठी नाटकं पाहून आले!

खरं तर दोन्ही नाटकं आपआपल्या जागी बरी म्हणता येतील...पण तरीही फार परिणामकारक वाटली नाहीत….

“शेवग्याच्या शेंगा “ या नाटकाची रचना किंवा मांडणी चांगली वाटली. ३ एकट्या व्यक्ती ...आपआपल्या परीने गुंतून राहण्याचा प्रयत्न करतात…..जगण्यतला आनंद शोधू पाहतात…..हे सर्व पाहणारी एक तरूणी...जी गोष्टीतही आहे आणि बाहेरही….तिचा एक वेगळा track...ती एकटी नाहीये…..पण स्वतःचं अवकाश शोधू पाहतेय….एकट्या व्यक्ती सोबत शोधतात….ती मात्र एकटं राहायचं ठरवते…..

खरं तर या नाटकाचं मध्यवर्ती पात्र एकटेपणाच आहे….एकटेपणाची गोष्ट ! तरुण वयात एकटेपणा , ज्याला स्वतःची  स्पेस म्हणता येईल - ती हवीहवीशी वाटते . ह्या स्पेसमध्ये सृजनशीलतेचा जन्म होतो,किंबहुना एकांत हा एक कोरा कॅनवास म्हणा न ...जो आपल्या आवडीच्या रंगानी सजवू शकतो...किंवा कदाचित आपल्या स्पेसमध्ये  कोणीही केलेली लुडबुड गुदमरवून टाकणारीही वाटत असेल . तरुणपणातली स्पेस म्हणजे अनेक शक्यतानी भरलेली पोकळीच म्हणा ना !

याउलट म्हातारपणी मात्र solitude हा loneliness होतो….एकाकी एकांत….अनेक प्रकारच्या भीती मनाला ग्रासतात ….मृत्यू,आजारपण,परावलम्बित्व...सध्याच्या युगात जिथे छोटी कुटुंबे आहेत, तिथे ही स्थिती प्रत्येक जण थोड्याबहुत फरकाने अनुभवतोच.ह्या सर्व शंका तरुणपणी मनाला शिवतही नाहीत...खूप वेळ आहे अजून या गोष्टींना…. असच वाटत राहत !

ह्या नाटकाचा शेवट सकारात्मक आहे...आशादायक आहे...प्रत्येकाने आपली वाट , आनंद शोधायचा असतो...आणि प्रयत्नाती तो नक्कीच मिळेल !

दुसरा नाटक  “ठष्ट “- अत्यंत वेगळ नाव - हा खरं तर “ ठरलेला लग्न मोडलेल्या मुलींची गोष्ट “ ह्या phrase च पहिल आणि शेवटच अक्षर घेऊन बनलेल नाव आहे.हे नाटक खरं तर आवडलं की  नाही सांगता येणं कठीण...कदाचित नाटककारालाही आपलं नाटक लोकांना  आवडाव अशी  अपेक्षा नसेल...घणाचे घाव आणि मेंदूला   झिणझिण्या हेच याच वर्णन !एका खोलीत राहणाऱ्या चार मुलींची ही गोष्ट. नाट्य किंवा घटना त्यातल्या दोघींबरोबर घडते,इतर दोघी साक्षीदार किंवा भाष्यकार म्हणू हव तर .

स्त्रीमुक्तिवादी पण नकारात्मक ….माझ्या मते तरी  ….स्त्रियांवर इतके अन्याय होताना पाहून जीव गुदमरतो...सत्य परिस्थिती आहे, मान्य आहे - पण शेवट सकारात्मक करता आला असता. स्त्रीमुक्ती म्हणजे आपल्यावर होणाऱ्या  अन्यायाचा सतत उच्चार करत राहणे नव्हे,तर त्यातून मार्ग काढत बाहेर पडणे,ताठ मानेने उभे राहणे…..आपले आणि अन्यायकर्त्याचे आयुष्य संपवणे नव्हे !

तर अशी ही  “ मी पाहिलेल्या दोन नाटकांची कहाणी “…. (  “ मीणी “...अस म्हणू शकते का ? )

Wednesday, December 16, 2015

वाटेवरील सोबती - विजय पाडळकर

" सिनेमाचे दिवस " हे मी विजय पाडळकर यांचं वाचलेले पहिलं पुस्तक ! पुस्तक , त्याची संकल्पना आणि एकंदरीतच त्यांचा लिखाण मला फार आवडलं होत....विशेषतः " फिल्म appreciation course " करण्याची कल्पना ...
हे पुस्तक याआधी वर्तमानपत्रात मालिकेच्या रुपात प्रसिद्ध झाल आहे. विविध पुस्तकांतील आवडलेल्या व्यक्तिरेखा ...जणू आपल्याला भेटलेली अनेक रंगा-ढंगांची माणसे ! ( माझ्याही मनात ही कल्पना घोळतेय....पण  समित बासूचा किरीन , साॅमरसेट मॉमचा लॅरी डॅरेल, झोरबा द ग्रीक ,फार फार तर जेन मार्पल आणि मॉमचीच जबरदस्त जेन ह्या पलीकडे काही सुचले नाही...)

या पुस्तकात उल्लेख केलेली अनेक पुस्तके मी वाचलेली नाहीत - काहींबद्दल ऐकून किंवा वाचून थोडंफार माहित आहे, जसं बिभूतीभूषण यांचा  अपु . काही अगदीच अपरिचित आहेत , काही इतकी दुर्मिळ असावीत की वाचायला मिळतील की नाही हीच शंका येते ! काही व्यक्तिरेखा उदा. कवी रेनर मारिया रिल्के आणि चित्रकार वॅन गाॅ - हे त्यांनी लिहिलेल्या पत्रांद्वारे लेखकाला भेटले - एक वेगळा आणि वैशिष्ठ्यपूर्ण  आविष्कार ! तर अॅलीस ( इन वंडरलॅन्ड ) आणि हेमिंग्वेचा म्हातारा ( द ओल्ड मॅन अॅंड द सी ) अजरामर व्यक्तिरेखा ! Jean Christophe ही महाकादंबरी आणि तिचे लेखक  Romain Rolland ह्यांची माझी भेट होणा अशक्य ( कादंबरी १० खंडात लिहीली गेलीये ! ...पण यातील एक कल्पना फार आवडली - आत्म्याला आत्म्याचा स्पर्श होण्याचा अविस्मरणीय क्षण ! यातील Antonetti  ही छोटीशी व्यक्तिरेखा , जिच्याबद्दल लेखकाने सुरेख लिहिले आहे . )

अतिशय आवडल्या आणि म्हणून नक्की वाचेन अशा काही व्यक्तिरेखा !

माचीवरला बुधा - गोनीदांची मी  अनेक पुस्तकं वाचलीत पण हे राहून गेलं (  जैत रे जैत , कुणा एकाची भ्रमणगाथा ,आम्ही भगीरथाचे पुत्र आणि रुमाली रहस्य ही विशेष आवडती - विशेषतः रु.र. - ही केवळ एक उत्तम रहस्यकथा म्हणून नाही तर त्यातल्या भन्नाट वातावरण निर्मितीसाठीही ! सतत कंदिलाच्या मिणमिणत्या प्रकाशात बसून आपण वाचतोय, असे भास व्हायचे मला !) ह्या लेखातून भेटलेला बुधा थेट थोरोशीच नातं सांगतो - थोरो दोन वर्षांसाठी वाल्डेनकाठी राहिला तर बुधा निवृत्तीनंतर गावाकडे, निसर्गाच्या सानिध्यात - आपण इथेच मरायचं अस ठरवून आला . दोघेही पोटापुरत पिकवून खातात , निसर्गाशी मैत्री करून ,त्याच्याशी एकरूप होऊन राहतात ...वाचून आपणही खूप शांत, समाधानी होतो !

दुसरं पुस्तक इंग्रजी - Goodbye Mr. Chips - मि. चिप्सची व्यक्तिरेखाही समाधानी आयुष्याच एक सुरेख उदाहरण -- आपलं कार्य आपल्याला पैसा ,प्रसिद्धी देतं की नाही यापेक्षा काम उत्तम रित्या पार पडल्याचं समाधान देतं की  नाही , हे जास्त महत्वाच ! आवडीच काम आणि आपण कुणाच्यातरी आयुष्याला चांगली दिशा देतोय ही भावना , ही पुंजी आयुष्यभर पुरू शकते...अगदी एकटेपणातही !

Flowers for Mrs. Harris मधील नायिका हॅरीसबाईही तशाच ! म्हाताऱ्या , गरीब,घरकाम करणाऱ्या , पण छोट्या गोष्टींत आनंद मानणाऱ्या, समाधानी.

ह्या तिन्ही व्यक्तिरेखांत एक समान धागा आहे - समाधानाचा....

पण  "भेट "ह्या जी ए कुलकर्णींच्या कथेत भेटणारा अश्वत्थामा मात्र पूर्ण वेगळा ! ही कथा शाळेत अभ्यासायला होती . गूढ , थोडी भीतीदायक अशी ही गोष्ट - कुठल्याशा जंगलात , कपाळावर भळभळती जखम घेऊन अश्वत्थामा अजूनही फिरतोय अशी कल्पना....त्याची भेट गौतम बुद्धाशी होते....गौतम मरणाला शाप मानत असतो तर जखमी , हतबल, मरणाची वाट पाहणारा ,रिकामं -अश्रद्ध - वैराण आयुष्य जगणारा अश्वत्थामा सांगतो - अमरत्व हा शाप आहे ! त्याच्या हातून घडलेल्या महापापाला हजारो वर्षे लोटली , पण त्याला उःशाप मात्र नाही ! देव तर सर्वांना माफ करतो, मग ह्यालाच का असं आयुष्य ? ( असा मला शाळेपासून पडलेला प्रश्न !)

ह्या काही विशेष आवडलेल्या व्यक्तिरेखा ....किंवा जवळच्या वाटलेल्या ...हा विषय आपणही कधी तरी हाताळावा अस पुन्हा एकदा सुचवून गेल्या !




Sunday, December 6, 2015

गाण्याची परीक्षा ...न दिलेली !!

या शनिवारी ,खरं तर मला गाण्याची परीक्षा द्यायची होती...म्हणजे माझा form भरून झाला होता...hall ticket सुद्धा आल होतं....पण अस्मादिक घाबरले ! इतक्या वर्षांनी परीक्षा ! बाप रे !! मग माझ्या अंतर्मनाने ( बहुदा !) पाठदुखी निर्माण केली...त्यामुळे मी परीक्षेला जाऊच शकले नाही ! ( हुश्श !!) मी अक्षरशः एक आठवडा आधी पाठांतर सुरु केल होत...त्यामुळे ....जाऊ दे...अधिक न बोलणेच बरे...

मग विचार केला...ही परीक्षा देणं खरच जरुरी आहे का ...म्हणजे आपण form वगैरे भरला हे ठीक....पण परीक्षेमुळे खरच काय होतं ? लताबाई ,किशोरीताई किंवा वसंतराव यांपैकी कोणी परीक्षा दिली आहे ? तसाही परीक्षा देऊन पास झाले असते ,तर त्याचा अर्थ हे आठ राग मला समजले असा आहे का ? ( खरं तर कुठल्याही परीक्षेच्या संदर्भात हा प्रश्न उभा राहतो....) बिलकुल नाही....

मला वाटतं की मला गाणं समजतच नाही...फक्त मी सुरात गाते ,माझा आवाज चांगला आहे आणि मी गाण्यांची उत्तम नक्कल करू शकते ..बस्स एवढच ! मला न सूर समजतात न राग... किंबहुना मला असा वाटत की मी गाणं हे कुठच्याही शास्त्राप्रमाणे शिकू पाहतेय ...शास्त्रीय संगीताचे शास्त्र...आरोह,अवरोह,पकड,सरगमगीत , आलापीसहित एखादी बंदिश वगैरे शिकल की गाणं आलं ?
गाण्यात खरं तर Left Brain चा उपयोग मर्यादित ! Right brain वापरून संगीताची अनुभूती व्हायला हवी ....शास्त्रीय संगीत म्हणजे अमूर्त ! फक्त स्वरातून अनेक गोष्टी सांगणारं ! ..माझे तर कानही अजून शास्त्रीय संगीत फारसं स्वीकार करू शकले नाहीत ! ( खरं सांगते ...मी फक्त चित्रपट संगीत आणि सुगम संगीतच ऐकते ) तर ते आत्म्यापर्यंत कस काय पोहोचेल ?

सूर मनाच्या गाभ्यापर्यंत पोचायला हवेत....पण पहिल्या काही मिनिटांत माझी बुद्धी जागी होते आणि चुळबुळ करू लागते...शब्दांना प्राधान्य न देणारे सूर नाकारू लागते....भिंती उभ्या करते ....त्यातून ते सूर ( शक्तिशाली असले तरीही बापडेच !) आत जाऊ शकत नाहीत ! Right Brain वापरण्यासाठी आधी मनाच्या खिडक्या उघडता यायला हव्यात !!

कदाचित कट्यार किंवा नाट्यसंगीतासारख एखाद संगीत , या मूर्त आणि अमूर्तातील दुवा ठरत ! मी कट्यारची,माझ्या मनावर विलक्षण प्रभाव टाकून गेलेली गाणी , या सकारात्मक बदलाची नांदी आहे अस मानतेय ! माझ्या गाणं समजण्याच्या प्रवासाची सुरुवात !!


पण जर अस झाल नाही , तर मात्र मला खेदपूर्वक, उत्तम नकलाकार म्हणूनच मार्गक्रमण करत राहाण्याखेरीज दुसरा पर्याय नाही !!

दिसामाजी काही लिहीत जावे ....

गेले काही दिवस काही चांगल लिहून होत नाहीये...किंवा जमत नाहीये म्हणा ....विषय सुचत नाहीत तर कधी काही चांगले विषय सुचले, तरी त्यावर लिहिणे जमत नाही....पेन पुढे सरकत नाही....

मुद्दाम लिहायला बसलं की लेखणीही बंड करते कधी...शब्द उमटतच नाहीत...अनेक विषय बाद करते...छे ! यावर काय लिहायच ?.... हा नकोच ...अनेक शंका !

काही दिवसभराच्या कामाच्या रामरगाड्यातून न मिळणाऱ्या वेळेमुळे असेल किंवा मनाला मोकळेपणे विचार न करू देणाऱ्या चिंतेमुळे असेल .... त्याहीपेक्षा म्हणजे स्वतःच्या लिखाणाचा जो मनात बागुलबुवा निर्माण झालाय त्यामुळे असेल , लिहिणे जमत नाहीये एवढे मात्र खरे....

असो...सर्व दिवस सारखे नसतात ...निसर्गही इतका वैविध्य दाखवतोच की .....कधी कोवळ ऊन आणि अगदी हव तस,सुखद,आल्हाददायक वातावरण...कधी भयानक तल्खली ....कधी ढगाळ, कुंद हवा... कधी बोचरी थंडी....माणूस तर निसर्गाचा नाठाळ ,हटवादी पुत्र ! निसर्गाहूनही मनमानी !

कधी मन बंड करत...काही लिहायचच नाहीये मला....बकवास लिखाण ! कोण वाचणार ते ! किंबहुना यापुढे कधी लिहायचच नाही....

तर कधी नवाच प्रकार ! ....पहिली दोन वाक्य ...अगदी लख्ख...चमकदार ...आणि पुढे ? वैराण वाळवंटच जणू !

कधी  कधी थोड नाटक करतं.... आपल्याला “ लेखकराव “ बनवायला पाहत....फक्त दाखवण्यासाठी लिखाण...मनापासुन नाही, तर प्रदर्शनासाठी.....चकचकीत पण बेगडी, मुलामा दिलेल.....असत मधेच एखाद  सोन्यासारखा तळपत वाक्य....पण नाहीच शक्यतो....कारण हात आणि लेखणी अगदी एक होतात, तेव्हाच काहीतरी उमटतं कागदावर...सुरेख आणि सुरेल....नाहीतर ? नुसत्याच रेघोट्या....

पण या रेघोटयांचाही उपयोग होतो कधीतरी....रेघोट्या एकत्र करून एक झाडू बनवावा आणि मनाचा तुंबलेला नाला साफ करावा.....( शी ! वाईट उपमा ! )....किंवा ह्या रेघोट्या म्हणजे जणू दगडगोटयाचा एक बांधच....जसा कागदावर मनातून उमटतो तसा मनातून नाहीसा होत जातो....विचार पुन्हा प्रवाही होतात....

असं हे लिखाण...सतत लिहू ‍पाहणाऱ्याची ( लेखक म्हणणार नाही) परीक्षा घेतं....सतत प्रश्न विचारत....

आहे तुझ्याकडे चिकाटी ? .... सतत न हरता , न थकता , पुढे जाण्याची ?

आहे वेळ ? आजच्या जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट ?

आहे प्रचंड आशा ? जी सतत या कामात येणाऱ्या निराशेला ,frustration ला हरवेल ?

आहे धैर्य ? लोकांसमोर येण्याचं....सत्य सांगण्याचं...आपण कोण आहोत हे मांडण्याचं...आणि सतत आपल्याला कोणीतरी judge करणार हे स्वीकारण्याच ? ( प्रत्येक लेखन हे लेखकाचा थोडा अंश घेऊनच जन्माला येतं....मात्र त्यातून डोकावणारा लेखक  वाचकांना दिसेलच अस नाही...)

तर जसं समर्थ म्हणाले (...त्यात थोडा फेरफार करून...)...दिसामाजी काही लिहीत जावे ....त्यामुळेच, सर्व प्रश्नांना सामोरे जाऊन , हात लिहित ठेवणे हाच उपाय ! त्यातूनच लेखक पुढे सरकतो !

म्हणून,लिहित राहा !!