Showing posts with label वाचन सुरुवात. Show all posts
Showing posts with label वाचन सुरुवात. Show all posts

Friday, October 14, 2016

पहिली पायरी

हल्ली काही दिवसांपासून पुस्तकांवर लिहिलेली पुस्तकं वाचायचा सपाटा लावलाय , अर्थात इंग्रजीमध्ये !

बऱ्याच पुस्तकांमध्ये एक लेख जरूर असतो , लेखकाच्या लहानपणातील वाचनानुभवाबद्दल .

पण ह्या लेखकांच्या आणि आपल्या ...खरं तर माझ्या , बालपणीच्या लेखनविश्वात बराच फरक आहे ….

या सर्व लेखकांत एक गोष्ट समान आढळते , या सर्वांना त्यांनी वाचायला कधी आणि कुठे सुरवात केली ते लख्ख आठवतं , मला मात्र मी थेट मोठ्या अक्षरातली पुस्तकं वाचू लागले त्या आधीचं काहीच आठवत नाही , ( नाही म्हणायला इंग्रजी अक्षर ओळख चांगलीच आठवते - चौथीच्या वर्गात असताना ,माझ्या बाजूला बसलेल्या मुलाला मी a b c d लिहून दाखवलं आणि  फुशारक्याही मारत होते !)

माझ्या आयुष्यात एनिड ब्लायटन आणि तत्सम इतर लेखक कधी आलेच नाहीत , माझं लहानपण फक्त मराठी पुस्तकांनी भरलेलं आणि भारलेलं होतं. लायब्ररीपेक्षा पुस्तकं विकत घेऊन जास्त वाचायचे. माझे आजोबा दर सुट्टीत मला १५-२० पुस्तकं घेऊन द्यायचे , त्यांची अखंड पारायणं चालू असायची .

जादूचा घोडा , उडणारा गालिचासारखी साहित्याच्या वर्गवारीत ना बसणारी पुस्तकं आता लक्षातही नाहीत. पण तीसुद्धा सतत वाचायला आवडायची .

भा.रा.भागवत आणि लीलावती भागवतांची अनेक अत्यंत रंजक पुस्तकं वाचली , अर्थात त्यातली बरीच भाषांतरित होती हे नंतर कळलं, पण भा. रां. चा मानसपुत्र फास्टर फेणे आम्हा सर्वांचाच हिरो होता. त्यांचा दुसरा मानसपुत्र बिपीन बुकलवार मात्र काहीसा अप्रसिद्ध . हा बिपिनदादा कधी ओरिजिनल तर कधी गाजलेल्या लेखकांच्या गोष्टी सांगे. एका दिवाळी अंकात आलेली ‘घड्याळाचे गुपित’ मला काही वर्षांपूर्वी मॅजेस्टिक प्रदर्शनात मिळाली - जुना मित्र खूप दिवसांनी भेटल्याचा आनंद मिळाला .

दिवाळी अंक - मुलांचे- माझ्या वाचन विश्वाचा महत्वाचा घटक होते. त्यावेळचे दिवाळी अंक balanced म्हणावे असे होते - म्हणजे कविता, गोष्टी,लेख अगदी मुलांना आवडतील अशा प्रमाणात ! मनोरंजन हे आपले काम आहे हे ते अंक कधीही विसरले नाहीत - मागे माझ्या मुलासाठी मी काही दिवाळी अंक चाळले , ते फक्त माहितीपूर्ण लेखांनी भरले होते!

वर्षभर ना मिळणाऱ्या दोन गोष्टी - फराळ आणि दिवाळी अंक माझी दिवाळी खास बनवायचे -आता ह्या दोन्ही गमती संपल्या , ही खंत वाटत राहते ….

काही ओरिजिनल पुस्तकं आठवतायत , ह्यांचे लेखक अप्रसिद्ध … एक होतं ‘गोष्टींची दुलई ‘ - ह्या पुस्तकातल्या २-३ गोष्टी अजूनही आठवतायत - ‘ राजुची डायरी ‘ नावाची गोष्ट  माझी आवडती --राजू नावाच्या काहीश्या एकलकोंड्या मुलाला सांताक्लाउस भेटतो - दरवर्षी एक याप्रमाणे अनेक रंगीबेरंगी डायऱ्या देतो - आणि राजू त्या आपल्या रंगीबेरंगी अनुभवांनी भरून टाकतो - दरवर्षी काही नवं शिकून डायरी भरून टाकण्याची कल्पना मला फारच आवडली होती ! त्यात एक ‘ दुलदुलची गोष्ट ‘ या नावांनीही कथा मला फार आवडे. दुलदुलचं नाक नकट होतं ही गोष्ट दुलदुलला इतकी त्रास देई की त्यासाठी वाट्टेल ते करायची तिची तयारी होती - तिच्या प्रयत्नांना कसे यश येते आणि त्यातून काय गमतीजमती होतात यांची मजेशीर गोष्ट सांगितली होती.

आणि एक मजेशीर गोष्ट - पुस्तक अगदी प्रस्तावनेपासून वाचायचं हा माझा खाक्या - ‘अरगडे ,कुलकर्णी आणि मंडळी हे नाव तुमच्या चांगल्याच परिचयाचे झाले आहे ‘ ही काही  प्रस्तावनांची सुरुवात आठवतेय ,म्हणजे ह्या प्रकाशकांची खरं तर बरीच पुस्तकं असावीत ,- कुणी ‘अ ,कु आणि मं ‘ आपल्यासाठी पुस्तकं काढतायत हे वाचून खूप बरं वाटलं होतं!(अ कु मं च्या पुस्तकात पर्वतीच्या पोटात दडलेलं एक  भुयार आणि पेशवेकालीन गुप्त कागदपत्र होते...)

इतर अनेक भाषांतरित पुस्तकं मी वाचली - टारझन(ग. रा. टिकेकर) , हॅन्स अँडरसनच्या परीकथा ( सुमती पायगावकर), अरेबियन नाईट्स .गुलबकावली ,वेताळ पंचविशीसारखी सदाबहार पुस्तकं सुद्धा .’साने गुरुजींच्या गोड गोष्टी ‘मध्येही बऱ्याच भाषांतरित गोष्टी होत्या ( म्हणजे मराठी बालवाङ्मय फार कमी ओरिजिनल आहे ?त्यावेळी अर्थात या गोष्टीमुळे काहीही फरक पडायचा नाही म्हणा ...)

मग सातवी आठवीत कधी तरी गोनिदा , पु. ल.,भेटले ...स्वामी ,मृत्युंजय ,राजा शिवछत्रपती, वीरधवल यांची पारायणे सुरु झाली ...

ही मोठ्यांच्या पुस्तकविश्वातल्या दीर्घ सफरीची सुरुवात होती ….