कधी कधी काय होतं…
कधी कधी काय होतं…की आपल्याला खूप दिवसांपासून एक पुस्तक वाचायचं असतं. दैवयोगाने ते आपल्याला लायब्ररीत मिळतं. आपण सुरुवात करतो . आपल्याला खूप छान वाटतं. आता आपल्याला साहित्य कळतंय असा वाटायला लागतं.कारण हे पुस्तक भल्या भल्यांनी नावाजलेले असते. आपण मारे अमुक अमुक वाचन भाग -१ अशी एखादी blog post सुद्धा टाकून देतो. पण मग गोची होते. पुस्तक खूप छान लिहिलं आहे ह्यात दुमत नाही , पण ह्या लेखक बाबाला नक्की सांगायचंय काय ? शेवटचे दोन भाग तर सपशेल डोक्यावरून गेलेले असतात. It is all very beautiful but rather difficult to understand अशी गत होते. आपण मारे त्याच लेखका ची अजून २पुस्तके आणून ठेवलेली असतात, आता तो बागुलबुवा होऊन वाकुल्या दाखवत असतो. आणि खरी गोम ही की आता अमुक अमुक वाचन भाग -२ लिहायचं कसं ????
कधी कधी काय होतं… की आपण एक खरोखर छान, ओघवत्या भाषेतल पुस्तक वाचतो , ज्यात अगदी रोजच्या आयुष्यातले अनुभव खुसखुशीत भाषेत लिहिलेले असतात. वाचून आपल्यालाही वाटतं - सोप्पं आहे , आपणही लिहून पाहूया. पण मग लिहायला घेतलं की सुचत नाही आणि जे लिहितो ते अगदीच फालतू असतं…
कधी कधी काय होतं… आपल्या गृपवर एखादी आध्यात्मिक भाषणाची जाहिरात येते.आणि आपण न वाचताच अंदाजाने ‘ नॉनव्हेज असेल तरच मी येणार ‘ असं म्हणून मोकळे होतो…
कधी कधी काय होतं… आपण एखाद्या मजकूर कॉपी करून दुसऱ्या गृपवर पोस्ट करते , पण बराच वेळ , तो मजकूर आपल्या बोटाला चिकटला आहे असा भास होत राहतो , किती वेळ ते बोट आपण इतर कशालाही लावत नाही…
कधी कधी काय होतं… आपण पुस्तक वाचून एखादा पदार्थ बनवायला जातो , पण पूर्वतयारी नसल्याने व्हिनेगर ऐवजी चिंचेचा कोळ चालेल का असा क्रांतिकारी विचार करतो , पण surprise surprise !! परिणाम नेहमी वाईट असतो असं नाही !
कधी कधी काय होतं… सगळ्यांकडे आहे म्हणून आपण डास मारण्याची रॅकेट घेतो. पण मग कळतं , डास मारणं काही तेवढं सोपं नाही. कारण त्यासाठी प्रत्येक डास शोधून त्याला टीपावा लागतो. आणि कायम रॅकेट हातात धरून सतर्क राहावं लागतं.पण
तरीही रॅकेट फिरवल्यावर “ पुट पुट”असा नाजूक फटाक्यांचा आवाज येतो आणि रॅकेट मधून धूर येतो तेव्हा समाधानाने हसू येतं.
आणि कधी कधी असही होतं की मध्यरात्री कानाच्या जवळ अशाच नाजूक फटाक्यांचा आवाज येतो आणि आपण दचकून जागे होतो. आपली झोपमोड झाली म्हणून वैतागायच की आता डास मेले म्हणून खुश होऊन पुन्हा पहिल्यापासून गुडुप झोपायच हेच कळत नाही …
कधी कधी आपल्याला खूप काही लिहायचं असतं पण काय लिहायचं कळत नाही ….
आणि कधी कधी सुरुवात तर छान होते पण लेखाचा शेवट कसा करायचा कळत नाही….
No comments:
Post a Comment