Thursday, December 31, 2015

निसर्ग

कधी वाटते तडक उठावे
वाटेने या चालत जावे....

सोडून ही मळलेली वाट....
ओलांडून हा जुनकट घाट....

पोहोचावे त्या वनात नीरव ...
गच्च झाडीचा जेथे मांडव ...

खळखळणारा जेथे झरा ....
अलवार सोबत करतो वारा...

पाय सोडूनी जळात बसावे....
मनातले गुज त्यास वदावे.....

खळखळ झरा जातो वाहत ...
ठेवत नाही काही मनात ....

किलबिल कुंजन सुरेख सुंदर
नाजूक ते रव मनही नीडर....

भिनते अंगी ही शांतता ...
शहरी गजबज निघून जाता ...

प्रतिमा तेथे आपुली पाहून ....
परत फिरावे ताजे होऊन ....

Wednesday, December 30, 2015

मीरा...

" चाला वाही देश " मीराबाईच्या भजनांचा अतिशय सुंदर अल्बम , पंडित हृदयनाथ मंगेशकरांच संगीत आणि लताबाईचा स्वर ! एकाहून एक सरस भजनं आणि गायला त्याहून कठीण....ही गाणी गाता येण्याइतपत तयार व्हावं ही माझी सुप्त इच्छा ! असो ....हे घडेल तेव्हा घडेल...तोपर्यंत माझ्या यातील अत्यंत आवडत्या भजनांबद्दल थोडेसे.....
खरं तर मीराबाई ही राजस्थानमधील ... पण पुढे उत्तर प्रदेशात येऊन राहिली असा उल्लेख आहे. तिच्या या भजनांवर मारवाडीबरोबरच ब्रिजभाषेचा प्रभाव आढळतो .या विषयावर माझा फारसा अभ्यास नाही पण तरीही मला असे वाटते की ,कदाचित ही भजनं मुळ मीराबाईची नसावीत ....काही ओळी ,शब्द ( किंवा कधी पूर्ण भजनच ) नंतर घातलेले असावेत.

" सखी री लाज बैरन भाई ....."

मीरा कृष्णाबरोबर गोकुळी गेली नाही...जाऊ शकली नाही ...जेव्हा तो रथात बसू लागला तेव्हा,शरमेमुळे मागेच राहिली...आता मात्र विरहाने कासावीस झाली आहे...हृदयावर मोठा पत्थर ठेवल्यागत तिची अवस्था झाली आहे... ती म्हणते...इतका विरह सहन करण्याच्या आधी ,माझे अस्तित्व पंचप्राणात विलीन का झाले नाही....त्या योगे तरी कृष्णाशी एकरूप होता आले असते....

चाल केवळ  अद्वितीय....सखी री , गई आणि गोकुळ वरच्या जागा सुरेख...एक विशेष म्हणजे गाण्याच्या  शेवटी येणारा तो खळखळणाऱ्या पाण्याचा आवाज...अलगद पुढच्या गाण्यात मिसळून जातो....


"को बिरहिनी को दुख जाणे है....."

विरहिणीचे दुःख तीच जाणे...कान्हा सोडून गोकुळी निघून गेला...आता तिने काय करावे ?...मीरा विवाहित असली तरीही तिने मनोमन कृष्णाला पती मानले आहे...या विरहाग्निचे औषध तिला ठाऊक आहे....ते औषध म्हणजेच कृष्ण तिच्या तनामनात वसलेला आहे...पण या क्षणी मात्र तिला तो आपल्याहून दूर झाल्याचा भास होतोय ....विरहाग्नीने पोळून उठलेल्या मीरेचे दुःख ही दगड-माती-कचऱ्याचे जग काय समजणार ? हरिशिवाय हे जग,हे सुख व्यर्थ आहे !

या गाण्यातील वैशिष्ठ्यपूर्ण गोष्टी ...कोरसचा सुरेख उपयोग...गाण्याला बांधून ठेवायला...गाण्याची सुरुवात तसेच दोन कडव्यांच्या मध्ये ..... तसेच गाण्याचा ताल ( धम्मार ).....





अतिशय सुरेख...तितकीच कठीण गाणी...मनाला ताजेपणा देणारी...मीराबाईच सामर्थ्य की  पंडितजींच्या संगीताच ? माहित नाही....पण आपलं काम श्रवणानंद घेण्याचं...आपण तेच करायचं .............




Tuesday, December 29, 2015

शब्द जुळारी !!

मी तर केवळ शब्द जुळारी ...



भावनांचा पीळ...
लांबलचक वाक्ये...
काही चमकदार शब्द...
काही उद्गारचिन्हे !!!

तोडून फोडून
उलटून सुलटून...
ठेवते समोरासमोर
जरा आलटून पालटून...

कधी जाते जमून
पटकन एखादे यमक
पण असते कुठे त्यात
ती काव्याची महक

नुसतीच बोलीभाषा
असते गद्यच खरे
चांगले म्हटले म्हणून
ठरेल कसे बरे

धन्य ते कवी-शायर
लिहिती सुरेख ओळी
किंवा भावपूर्ण,आशयगर्भ
सुबकशी चारोळी

मी बापडी,उचलून पेन
खरडत राही काहीबाही
मी कसली कवयित्री
मी तर केवळ  शब्द जुळारी !!!

मूर्ती

छे ! नाही !! अजिबात नाही !!!
तू तर "तो " बिलकुल नाहीस....
ज्याला मी शोधतेय
कित्येक वर्षापासून...
तू तर असाच एक आपला
आकाशातला दूरगामी तारा ..

पहिल्यांदा भेटले तुला ...
चक्क देवच समजले !
असाही माणूस असतो का ?
अशा विचारात हरपले...
हळूहळू ओळख...मग मैत्री...
देवाचा माणूस...आणि माणसाचा मित्र....

मग काळाच्या ओघात वाहून गेलो...
कुठे तू...आणि कुठे मी.....
गुपचूप तुझी खबर ठेवून होते
तू मोठ्ठा माणूस झाल्याचे ऐकून होते...
मधल्या काळात माझ्या लेखी...
अधिकच "गुणी" बनलास तू...

मग कधीतरी पुन्हा प्रकटलास ...
या दिव्यजालातून अचानक...
मी आनंदून हात पुढे केला...
अनोळखी नजरेने मात्र तू प्रतिसाद दिला...
आठवण द्यावी तुला...नाही धजावले मी...
"कोण आपण ?" या प्रश्नाला ...प्रचंड घाबरले मी....

असू दे...असतात अशीही माणसे
विसरभोळी....
पण हो...ती तर माणसच असतात.....
आणि तुला तर मी देव बनवलेलं !'
पण तुझे पाय मातीचे होते....
तुझा नाही रे बाबा...माझंच चुकलं !!

वाट

नव्या वाटेवर ,नवे काटे...
नवे दगड , नवे गोटे...

ठेच तर लागणारच...
वेदना जाणारच मस्तकात..
अंगात झिणझिण्या आणि
बधीरता येणारच देहात...

पण तरीही...
पुन्हा उठायच...
विचार न करता...
चालू पडायचं.....

अनुभवायची
वेदनेची धुंदी...
नशीली ....
नविनता पदोपदी....

ही वाट
सतत नव शिकवते....
विजयाकडे
हीच तर घेऊन जाते...

अंतिम जयापेक्षा थरारक
या वाटेचा प्रवास...
एकदम मोठे होण्यापेक्षा
हळूहळू बदलण्याचा प्रयास..



तिन्हीसांज....उडासलेली....

शेखर ताम्हाणे लिखित " तिन्हीसांज  "नाटक ही एक रहस्यमय संगीतिका आहे ( असा त्यांचा दावा आहे )...यात २-३ गाणी जरूर आहेत...जी त्यावेळी ऐकायला छान वाटतात , पण नंतर एकही लक्षात राहत नाही.. .... यातील रहस्य मात्र अगदीच सपक !

मोहन ( अंगद म्हसकर ) एक गाणं हरवलेला गायक,त्याची सुविद्य,श्रीमंत , वकील पत्नी भारती ( शीतल क्षीरसागर ) आणि मुलगा आशुतोष यांच्या सोबत पत्नीच्या प्रचंड मोठ्या वाड्यात राहतोय .मोहनच गाणं त्याच्या प्रेमभंगामुळे हरपलंय ...गेली १४ वर्ष तो एक दारुमय,रिकाम आयुष्य जगतोय.मात्र, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी, देवळात आरती सुरु झाली की  त्याच्या अंगात न्यायाधीश संचारतो... आपल्या हरवलेल्या प्रेमाची दाद मागत , जो समोर येईल त्याच्यावर खटला भरत सुटतो.....

आणि अचानक एके दिवशी, त्याची हरवलेली प्रेयसी , शकीला त्याच्या समोर येऊन उभी राहते ...मोहनला त्याच प्रेम आणि गाणं दोन्ही गवसतं..पण त्यातच एके दिवशी अचानक, संकष्टीच्या दिवशी, न्यायाधीश महाराजांचं आगमन होतं....आणि मोहन भानावर येतो, तोपर्यंत शकीलावर प्राणघातक हल्ला झालेला असतो....
इथे पहिला अंक संपतो.

दुसऱ्या अंकात रहस्याचा उलगडा....

आधी या नाटकातील जमेच्या बाजू....मुख्य कलाकारांचा  सशक्त अभिनय , नाटकाला थोडंफार सुसह्य बनवतो .विशेष उल्लेख छोट्या आशुतोषच्या भूमिकेतील श्रीराज ताम्हणकर याचा..तबलाही सुरेख आणि अभिनयही सहज सुंदर,नैसर्गिक. शीतल क्षीरसागर- कर्तबगार ,करारी वकील आणि एकतर्फी प्रेमात होरपळणारी पत्नी म्हणून आवडून जाते. कोर्टातील भावनोद्रेकाचा प्रसंगही  चांगला वठला आहे  . अंगद म्हसकरचे लोभस,देखणे व्यक्तिमत्व मोहनच्या भूमिकेला साजेसे . प्रेम, विनोद तसेच भावोत्कटता- सर्वच प्रसंगात उत्तम अभिनय ...विशेषतः न्यायाधीश संचारल्यावर होणारे परिवर्तन ,त्या प्रसंगातला stage चा वापर प्रभावी .

नेपथ्य आणि प्रकाशयोजना चांगली  - घराचा दिवाणखाना ,व्हरांडा ,बाग  आणि बागेतील कारंज सुंदर . शकीलाची वेशभूषा योग्य , १९३६ साली बायका - अगदी शिकलेल्या असल्या तरीही - स्लीवलेस ब्लाऊझ घालत ,की  लांब आणि फुग्यांच्या  हाताचे ....विचार करण्याजोगा प्रश्न ....

कमी पडते ती गोष्ट...नाटकाची संहिता फार दुबळी,तोकडी. दिग्दर्शनही फार प्रभाव टाकू शकत नाही. इतिहासातील आणि वेशभूषेतील चुकांकडे दुर्लक्ष करूनही नाटक फारसे रंगत नाही.कमकुवत प्लॉट ,पटकन समजून येणारे  रहस्य , कोर्टरूम ड्रामा अशी जाहिरात असूनही  कोर्टातील फक्त दोनच...तेही अर्धेमुर्धे  प्रसंग...
नाटकात संगीत आणि रहस्य दोन्ही पुरेसे स्थान मिळवू शकले नाही...कशाला महत्व द्यावे हे न जाणवल्यामुळे दोन्हींवर अन्याय झालाय....रहस्य पुरेश्या विस्ताराभावी सपक,विरळ वाटतं. पहिला अंक अक्षरशः फुकट गेल्यासारखा वाटतो---प्लॉटचा ,ज्याला buildup म्हणतात तो झालाच नाही...प्रेमालाप आणि गाणी यावर फार वेळ फुकट गेलाय. प्रेमकहाणी दीर्घ आणि रहस्यकथा फार त्रोटक असं काहीसा वाटतं. रहस्यमय , कोर्टरूम ड्रामा म्हणून पाहायला येणारा प्रेक्षक नक्कीच निराश होतो.रहस्याचा उलगडा होताना आणि एकदा मोहनच्या तोंडी असलेले " तेंडूलकरी ,उघडे वाघडे "संवाद खटकतात .

एकंदरीत मोठ्या अपेक्षेने रहस्यमय नाटक पाहायला गेलेला प्रेक्षक निराश होणार एवढं नक्की ...




Monday, December 28, 2015

आमचाही एक असाच… बाजीराव

प्रत्येकीच्या मनात
एक बाजीराव असतो…
कधी रोमीयो ,कधी फरहाद
तर कधी फवादही भासतो….

गालावरच्या बटा हटवत
थेट मनात पाहतो…
“खुप सुंदर दिसतेस “
अलगद सांगून जातो…


लाडीगोडी ,छेडखानी
चोरटे स्पर्श उगीचच…
नुसत्या नजरेने त्याच्या
देही उठती रोमांच…


चांदण्या रात्री लाँग वॉक…
कधी मोगऱ्याचा  गजरा…
कधी एकच गुलाब
लालचुटुक टपोरा…


या स्वप्नांच्या गावी…
प्रेमानेच पोट भरतं…
जेवणबीवण ,कामबीम
असं काहीच नसतं…


आमच्या मनातला बाजी
कधीच व्यभिचार नसतो…
खरं सांगू का..हा चेहरा..
आपल्याच माणसाचा असतो….