Monday, January 4, 2016

अधुरी कहाणी

साथ आपली संपली
आणि रस्ते दुभंगले
वाहुनी गेलास तू ...
पण मी इथेच थांबले

मागली कित्येक वर्षे
सोबतीने संपली
मात्र एकलीच आता
ना वृक्ष ना सावली

हसण्यात साथ होती
दुःखात हात हाती
तुझ्या सवे अवसही
एक चांदरात होती

मागे वळू नको सख्या
मी ही न पाही परतुनी
बांध फुटेल अश्रुंचा
जाऊ दोघेही वाहूनी

जरी कधी भेट झाली
वाटेत पुन्हा आपली
तडक जा निघुनी तू
तसाच उलट पावली

मी ही कधी ऐकीले
जरी कधी तुझेच नाव
झुकवेन नजर आणि
लपवेन सारेच भाव

नाव तुझे न कामना
काही न उरले जीवनी
अर्थच लागे न आता
अधुरी उरली कहाणी