Wednesday, January 6, 2016

स्वागत

खिन्नता
विषण्णता
निर्जीवशी
निष्क्रियता

चांगले
निमाले
करपले
ते उरले

सुटले
ते हरवले
न जाणे कसे
निसटले

हातावरी
किरमिजी
नक्षी अशी
नाजुकी

रंगीत
फुलपाखरू
अलगदी
उडाले

अंगणात
दरवळतो
मनी सय
तो ठेवतो

हातावरी
पारिजात'
सुकतो
कोमेजतो

एकले
परी धाकले
पुष्प आज
उमलले

उद्या परी
पायदळी
अथवा
निर्माल्ये

किलकिले
करी डोळे
सूर्यदेव
उगवले

येइ त्वरे
निशाराणी
जेव्हा ते
बिंब ढळे

ऐक गड्या
जगी रोज
हाच असा
खेळ चाले

शून्यातून
एक आणि
एकातून
शून्य मिळे

सूर्यबिंब
झळकले
पहा फूल
सळसळे

मनी हेच
ठरवले
अंधारा
हरवले

सोहळे
जे पाहीले
हरखले
आनंदले

मीही नव्या
उदयाच्या
स्वागतास
सज्ज झाले....
1 comment: