Tuesday, March 15, 2016

पुन्हा एकदा लिखाण...

महिन्याभरात एकही पोस्ट लिहिली नाहीये मी...मान्य आहे...पण आज त्याबद्दल तक्रार , किंवा रडगाणं मुळीच गाणार नाहीये ! काही अनुभव मनात रुजवत ठेवावे लागतात,मग कधीतरी अलगद ते फुलतात...बहरून येतात....मध्यंतरी पाहिलेली काही नाटकं ,वाचलेली काही पुस्तकं आणि नव्या नोकरीत भेटलेली अरभाट माणस अशीच रुजवत ठेवली आहेत....वाट बघतेय...काही दिवसांनी नक्कीच काहीतरी छान हाती लागेल.....

असो...

मध्यंतरी एका ब्लोग्गिंग साईट वर एका marathon ची घोषणा झाली होती. कमीत कमी ४५० शब्दांची एक , याप्रमाणे पोस्ट लिहायच्या होत्या. पोस्ट संख्येवर मर्यादा नव्हती..तुम्ही एका दिवशी १२ पोस्ट ही लिहू शकत होता...( त्या ब्लॉग साईट वर मात्र दिवसाला ६ अशी मर्यादा आहे ) त्यानिमित्ताने मनात आलेले हे अरभाट आणि थिल्लर / चिल्लर विचार....( G. A. क्षमस्व !)......

कसा काय बुवा ह्या लोकांना रोज इतक लिहायला वेळ मिळतो ? ह्यांना इतर काही उद्योग धंदे नाहीयेत का ? पोटापाण्याच सोडा पण घरदार,अभ्यास , मुलबाळ काहीच कस नाही ? बर , अस धरून चालूया , की ह्या अडचणी महत्वाच्या नाहीत , पण दररोज ,६-१२ पोस्ट्स असा शब्दांचा रतीब कोण घालू शकत असेल? तोही रोज , न चुकता....( ज्याच्या सर्वात जास्त पोस्ट्स ,त्याला मोठ्ठ बक्षीसही होत, बर का !) मी त्यातल्या काही पोस्ट्स वाचण्याचा प्रयत्न केल्या. हो...प्रयत्नच !...फक्त शब्द संख्या वाढवण्यास लिहिल्या आहेत,हे स्पष्ट जाणवत होत. रोज नवे विषय कुठून आणायचे ? ( तसे त्यांनी ६ शब्द दिले होते ,पण फक्त ६च !) ४५० शब्दांच काव्य,( खंडकाव्य !) लिहिण... मस्करी नाहीये...त्यामुळे त्यातल्या त्यात सोप्प,म्हणजे गद्यच लिहिल गेलं  ! त्यांचे  परीक्षकही इतक्या शेकड्यांनी आलेल्या पोस्ट्स वाचू शकणार नाहीत हे उघडच होतं . म्हणजे त्या website वर ज्याला जास्त likes मिळणार,तोच जिंकणार हे सोप गणित . नशिबाचा भाग जास्त,गुणवत्तेचा कमी...

असो...

मुद्दा कोण जिंकणार हा नाहीच . मुद्दा हा आहे , की केवळ एका स्पर्धेत जास्त लिहायला सांगितलं, म्हणून काहीही , दर्जाहीन खरडाव की  काय ? मग आपण लिहितो ते कशासाठी ?

मी या स्पर्धेत भाग घेतला नाही,हे आत्तापर्यंत चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलच असेल ! रोज , न चुकता ,भरमसाठ लिहिण्याच्या विचाराने माझं डोकं भणाणून गेलं आणि मग पुढचे कित्येक दिवस मी काहीच लिखाण केल नाही हेही चाणाक्ष वाचक ( हो..हो..तुम्ही...तुम्हीच ते !)  समजले असतील....

या निमित्ताने ,आणखी एक गोष्ट ध्यानात आली. मराठी ब्लॉग sites साठी अशा स्पर्धा होत नाहीत.  दर आठवड्याला , इंग्लिश ब्लॉग community वर लिहिण्याचे prompts दिले जातात ,तसा काहीच प्रयत्न मराठीत होत नाही. आम्हा bloggers नाच याबद्दल काहीतरी कराव लागेल असं दिसतंय.....

भेटू लवकरच .....