Saturday, March 19, 2016

कोलाहल

नको वाटतो कधी कधी हा गलका...हा आवाज ! माणूस समाजप्रिय आहे खरं पण कधी कधी त्यालाही समाज नकोसा होतोच ! आपल्या कोशात जाऊन...सर्वांपासून दूर कुठेतरी बसावं असही कधीतरी वाटतं ...एखादं कासव आपलं अंग चोरून,कवचाखाली गुपचूप दडून राहत , अगदी तसच....

अशा मनाच्या अवस्थेत सगळच कर्कश वाटतं....मनाला त्रास देतं...नको कोणाशीही बोलणं..प्रत्यक्ष  नको....social media बिलकुलच  नको , असं वाटत राहत..... निरर्थक नको... अर्थपूर्ण त्याहूनही नको ....कारण त्यानंतर आपल्या मेंदूत जो संवाद चालू होतो तो थांबवण केवळ अशक्य ! चौकश्या  नकोत...अभिवादन नको... काहीच नको.....

...काश आपण या शहरात अनोळखी असतो ,अनोळखी नजरेने,वरवर पाहून पुढे गेलो असतो .....पण इथे ,कोणी न कोणी तर भेटतच सतत....मग तेच...तोंड देखलं हसू...हालहवाल ...ख्यालीखुशाली....

शांततेची ओढ लागली असताना, कोलाहलात वावरणे , काम करणे प्रचंड तापदायक ! हा आवाज आपल्या मनाला दगड बनून खाली खेचत राहतो....कान जर बंद करता आले असते तर....

आजची माझी अवस्था याही पलीकडली...फक्त आवाजच नाही तर शब्दही नको झालेत ... पुस्तकातले ... लिखाणातले .... संगीत नको ...काहीही वाचू नये...ऐकू नये...पाहू नये .....लिखाणही शब्द बम्बाळ....फाफटपसारा वाटतंय .....निरुद्देश भ्रमंती कागदावरची....

शनिवार संध्याकाळ आहे ...हा सर्व , या पूर्ण आठवड्याच्या कामाचा शीण कदाचित .....आठवडाभर  ऐकले - बोलले - वाचलेले हजारो- लाखो शब्द मला घेरून टाकतात...गोंगाट...गलका..कोलाहल...कानात घुमणारा ....

घरी येताना रस्त्यावरच्या गाड्या जणू मला त्रास द्यायला टपल्या आहेत असा राहून राहून वाटतंय ....माझ्या गल्लीत वळल्यावर तिथली निर्मनुष्य शांतता क्षणभर सुखावून जाते...पण क्षणभरच....तेवढ्यातच एक परिचित भेटतातच...तेच जुजबी संभाषण...करायचं म्हणून केलेल...पाट्या टाकल्यासारख....

घरी पोचल्यावर मात्र एक सुखद धक्का ...शांत घर ....कोणीही नाहीये....उबदार घर ...मायेने जवळ घेतं....न बोलताच समजून घेतं....जणू काही त्याला सार काही  कळलय .....

हातातली ओझी तशीच टाकून मी बसून राहते .....काही सेकंद...मिनिट...कदाचित तासभरही .....पुन्हा वर्दळ सुरु व्हायच्या आधी मला ही रिती घागर या शांततेने भरायची असते ....पुन्हा एक नवा दिवस , नवा आठवडा ...दंड थोपटत समोर उभा असतो ....नवी आव्हाने घेऊन ......


( शाळेत एक प्रश्न असायचा - विरुद्धार्थी शब्द लिहा...तसच काहीस वाटतंय आज... काही महिन्यापूर्वी शांतता सुखावून गेली होती ...पण त्याच्या अगदी उलट अवस्था ! ....चालायचंच ....ह्याला जीवन ऐसे नाव !
ती पोस्ट इथे वाचा ...)
3 comments:

  1. Barobar, shantata hi pan ek garaj aahe he lakshatach yet nahi ya prachand kolahalat ... agadi yogya shabdat varnan kelayes Maya ...

    ReplyDelete
  2. Apratim lekhan vichar karayala lavanare

    ReplyDelete
  3. Apratim lekhan vichar karayala lavanare

    ReplyDelete