Monday, September 12, 2016

फुरसत के रात दिन

खुप वर्षं एखादं गाणं मनात रुंजी घालत असतं ,पण अचानक एके दिवशी अनपेक्षित रित्या नव्याने भेटायला येतं…..तेच तेच वाचून लिहून कंटाळलेल्या मनाला  तरतरी देतं…
दिल ढुढंता है फिर वोही फुरसत के रात दिन
बैठे रहे तसव्वूर -ए - जाना किये हुए….
( खूप वर्षं हे तसव्वूर -ए - जाना प्रकरण मला कळलंच नव्हतं … बैठे रहे तसव्वूरे , जाना किये  हुए असं समजत होते ...
जाना करत बसण म्हणजे काय असाही विचार वारंवार मनात यायचा ….आज केवळ गूगल देवीमुळे खरे शब्द समजले .)
खूप पूर्वीपासून हे माझं अतिशय आवडतं गाणं आहे .( अगदी चुकीच्या शब्दासकट !) लताबाईंचा सुरवातीचा आलाप मनाला एक हुरहुर लावतो ….आपल्याकडची सर्वात मौल्यवान गोष्ट आपल्या नकळत हरवलीये आणि कितीही प्रयत्न केला तरीही परत मिळणार नाहीये ….
गाण्याचा अर्थ असाच आहे पण अर्थ समजण्याआधीपासूनच मला अशी हरवल्याची भावना जाणवे ….
तसही आपण सर्व ‘फुरसत के रात दिन ‘शोधतच आहोत ….जेव्हा घड्याळाच्या काटयाबरोबर ना धावता काही क्षण स्वतःशी संवाद साधू …. ‘तसव्वूर -ए - जाना’ ...आपल्या प्रिय व्यक्ती / छंद/ परमात्मा यांच्या ध्यानात हरवून जाऊ ...
(तसव्वूर - imagination , contemplation
जाना- प्रिय व्यक्ती - मी थोड्या broad अर्थाने म्हणतेय .)
या गाण्याची दोन versions सर्वश्रुत आहेत . पैकी duet थोड्या आनंदी वळणाच … संजीव - शर्मिला प्रेमी युगुलावर चित्रित झालेलं ...पण दुःखी version अधिक समर्पक ….त्या प्रेमींचे असे काय हरवलंय ….त्यांचे तर खेळण्याबागडण्याचे , झाडांभोवती फिरण्याचे दिवस ….पण या युगुलाच्या मागून फ्रेम मध्ये डोकावणारा वयस्क संजीव ‘ वादी में गुंजती हुई खामोशिया ‘ ऐकतो ….सुंदर ! भूपेंद्र च्या धीरगंभीर आवाजातील slow version अतिशय सुरेख .
गूगल देवीकडून या गाण्यावरील एका छोटासा वाद समजला .
हा मूळ शेर गालिबचा. त्या मूळ शेरात स्वल्पविराम वापरून ओळ कुठे तोडलीये हा तो मुद्दा ….
एक version मी वर दिलेले …
तर दुसरे ….
दिल ढुढंता है फिर वोही फुरसत ...
के रात दिन बैठे रहे तसव्वूर -ए - जाना किये हुए….
हे दुसरं version रचनेच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण वाटतं खरं पण ते बहुधा शेर या प्रकारच्या ‘मीटर’ मध्ये बसत नसावं ...मला आपल प्रचलित version च योग्य वाटतं …
असो. मी ह्यातली तज्ज्ञ नाही … मी फक्त कानसेन ….आणि लता-मदन  फुरसत मिळाली की ऐकणारी … अगदी रात दिन ...

हा एक intersting video आहे , मदनमोहन यांनी ज्या अनेक चाली ह्या गाण्यासाठी बनवल्या होत्या त्यांबद्दल....पहा तुम्हाला कोणती आवडते....

त्यातील आशाताई आणि गुलझारची टिप्पणी तर...वाह वा !