Sunday, September 18, 2016

पुनर्वाचन

पुन्हा एकदा तेच पुस्तक वाचायचं ही कल्पनाही मला काही वर्षांपूर्वी आवडली नसती.मी ‘वाचा आणि पुढे चला ‘या पंथातली .”काहीही नवीन गोष्ट वाचायला मिळत नाही , नवीन शिकायला मिळत नाही ,कसलीही नवी विचारधारा सापडत नाही आणि कादंबरीचा शेवट व्यवस्थित आठवतोय …. मग का पुन्हा वाचू ? “ असे माझे विचार होते….

पण लख्ख आठवतंय - लहानपणी अशी नव्हते . किंबहुना लहानपणी सर्वच,  स्वतःकडची बरीच पुस्तकं पुनःपुन्हा वाचतात …. माझ्याजवळ असलेली फास्टर फेणे , टारझन , शेरलॉक होम्स ,हॅन्स अँडरसनच्या परीकथा अशा अनेक पुस्तकांची मीही सतत पारायणे करी….

पण मोठम खोटं वयात, ही सवय मागे पडली …

मागे ,आईच्या घरी गेले ,तेव्हा तिथली माझी काही आवडती पुस्तकं घेऊन आले . त्यातच ‘आहे मनोहर तरी ‘ पुन्हा एकदा भेटलं….

याचं पहिलं वाचन वयाच्या २५-२६ व्या वर्षी केलंय , जेव्हा आयुष्य साधं ,सरळ ,सरधोपट होतं , फक्त स्वतःच्या मर्जीनुसार जगत होते ,डोळ्यात अनेक स्वप्नं होती ,स्वतः बद्दल आशा होत्या ,प्रश्न फक्त परीक्षेत येतात आणि उत्तरं पुस्तकांत मिळतात असं वाटण्याचे ते दिवस होते.

आता ,जेव्हा अर्धं आयुष्य जागून झालंय, साधारणपणे कळलंय -आयुष्य आपल्याला कुठे नेतय, असच सुमार,सामान्य पण आरामाचं आयुष्य आपण जगत राहणार हेही जाणवतंय ….किंबहुना त्याहून अधिक आपण आयुष्याकडून काहीच मागत नाही अशा परिस्थितीत हे पुस्तक वेगळं वाटेल का ?

आपण कुणीही ग्रेट नाही , आयुष्याकडून अवाजवी अपेक्षाही नाहीत , असलच काही टॅलेंट तरी सरधोपट सुखासीन जगता यावं यासाठी आपण स्वतःला वेगळ्या मार्गावरून चालूच दिलं नाही हा विचारही आता मनात येत नाही ….

सुनीताबाई पु. ल. च्या सावलीत स्वतःचे गुण विकसित करण्याच्या पर्यायाकडे दुर्लक्ष करत राहिल्या ,त्यात मी स्वतःला शोधू पाहतेय का ...निष्क्रियतेला एखादे उदात्त नाव देऊ पाहतेय का ….

आता या प्रश्नांची उत्तरे पुनर्वाचनानंतरच ….

1 comment:

  1. Swataha swatahache swabhav vishesh olakhnare khup kami lok asatat, tu tyapaiki ek. Sunitabai Sawali houn rahilya, pan te hi Maharashtrache Ladake Vyaktimatva asalelya Pu Lan chya ... itar koni asata tar Sunitabaini evadha tyag kela asata ka? Manat ugach prashna ubha. Tyag mahatvachach pan to konasathi he jasta mahatvacha ... khup chhaan pane adhorekhit kelayes tu ...

    ReplyDelete