Wednesday, September 5, 2018

अद्भुत असे काही ...

लहानपणी आपण सर्वच fantasy ह्या प्रकारात बसणारी (मराठीत अद्भुत म्हणावं का ह्याला ?)  पुस्तकं वाचतो, खरं तर ही पुस्तकं आपल्याला इतर कुठल्याही पुस्तकांपेक्षा जास्त आवडतात . पऱ्या , राक्षस, उडते गालिचे, चेटकीण -मला तर भारी आवडायची अशी पुस्तकं .पण मोठेपणी मात्र खऱ्याच गोष्टी वाचायच्या असं कुठेतरी वाटू लागलं. मोठ्यांसाठी सुद्धा अशी पुस्तकं असतात हे माहितही नव्हतं.(खरं तर नाथमाधव यांचं ‘वीरधवल’ शाळेत असताना खुप आवडीने वाचलं होतं. पण ते मोठ्यांसाठी होतं का ठाऊक नाही. मराठीत अशी मोठ्यांची पुस्तकं कमीच.)

कधीतरी मग मुलासाठी आणलेली लहान मुलांची अद्भुतरम्य पुस्तकं , त्याच्या सोबत वाचू लागले . हॅरी पॉटरने त्याच्याबरोबर मलाही भुरळ घातली. जे के रोलिंग ह्या लेखिकेला खरच मानायला हवं, सात पुस्तकांची गोष्ट तिच्या मनात तयारच होती. इतकी छान पात्र,त्यांच्यातल्या लढाया, चांगला वाईट संघर्ष,त्याबरोबर जादूच्या दुनियेची आणि त्यातल्या नियमांची इतकी सुंदर आणि जिवंत मांडणी.(अर्थात  जादूची दूनिया ,जादूचे नियम वगैरे असते हे मला पूर्वी काही माहीत नव्हतं. ते आत्ता हळूहळू कळायला लागलंय. आपल्या उडत्या गालीच्याला काही नियम होते का ?)

मग कधीतरी मला एक पुस्तक सापडलं. खरं तर भेटलं. दुसऱ्या एका पुस्तकात. ह्या पुस्तकात त्या पुस्तकाची खूप स्तुती केली आहे. म्हणून म्हटलं वाचूया. अर्थात मला त्यावेळी ते अद्भुत ह्या सदरात मोडणारे पुस्तक वाटले नाही. कारण अद्भुत म्हणजे जादूगार, पऱ्या, चेटकिणी अशी समजूत होती.. त्यामुळे एका पुस्तकाची नायिका  ती जे पुस्तक वाचतेय, त्यात जाऊन त्यातली गोष्ट बदलते आणि जाता जाता खलनायकाच्या xxxx मध्ये दोन लगावून सुद्धा येते हे एकदम भावलं.

त्या पुस्तकाचं नाव तसंच मजेदार. ते त्याच्या नायिकेच नाव.Thursday Next. पुढचा गुरुवार ? पुढचा गुरुवार असं एखाद्या हीरॉईनच नाव असू शकेल ? आणि असं पुस्तक कुणी आवडीने वाचेल का? आहे …. असं नाव आणि पुस्तकं आहेत , आणि एक नव्हे तर 7 पुस्तकांची मालिकाच आहे ती . माझी ही विशेष आवडीची आहे कारण मोठ्यांच्या फँटसी पुस्तकांच्या दुनियेत तिथूनच मी प्रवेश केला.(अर्थात पहिले ३ भाग वाचून मी क्षणभर विश्रांती घेतलीये…गेले काही महिने ...)

खरं तर मला चांगली आणि चांगल्या रीतीने सांगितलेली कुठलीही गोष्ट आवडते. माझ्यासाठी चांगल्या गोष्टीची लक्षणं म्हणजे उत्तम रित्या लिहिलेली पात्रं, चांगली किंवा वाईट कशीही,पण आपल्या व्यक्तिरेखेशी प्रामाणिक, सच्च्या भावना,अनपेक्षित धक्के,वळणं, गूढ ,गुपिते, रहस्य, भरपूर संवाद, फार क्लिष्ट नसलेलं लिखाण,डोळ्यासमोर चित्र उभी करतील अशी जागांची,माणसांची वर्णनं .

पण तरीही मला ही fantasy सदरात बसणारी पुस्तकं वाचायला खूप आवडतात. खरं तर हा प्रकार लिहिणं थोडं कठीण. एक पूर्ण वेगळं जग निर्माण करायचं, त्याचे नियम बनवायचे ,विविध चांगली वाईट पात्र बनवायची, त्या पात्रांना थोडी हटके अशी नावं द्यायची. मग लढाया , जादू ,मग शेवटी चांगल्याचा विजय. हा साचा असला,तरी काही पुस्तकं ह्या साच्यातूनही काही वेगळं बनवू पाहतात.

कोणी काहीही म्हणो, पण ही पुस्तकं वाचून मला एक वेगळंच समाधान मिळतं. कुणी त्याला oversimplify का म्हणेनात. पण सर्व अडचणीचं समाधानकारक उत्तर मिळतं.शेवटी सर्व चांगले लोक आनंदाने नांदतात. ज्याची खात्री आयुष्य देऊ शकत नाही ,ते ह्या पुस्तकातून मिळतं , मग का वाचू नये ही पुस्तकं ?

No comments:

Post a Comment