हल्ली पत्र स्वरूपातील २ कादंबऱ्या वाचण्यात आल्या. हा लेखनाचा प्रकार मला खूप आवडला/आवडतो.( ह्याला इंग्रजीत epistolary असं म्हणतात.) कादंबऱ्या फार छान आहेत, त्याबद्दल नंतर कधीतरी. पण ह्या कादंबऱ्या वाचून मला माझा पत्रप्रपंच आठवला….
आम्ही खूप पत्र लिहायचो पूर्वी. माझी आई,मावशी,आजोबा खूप छान पत्र लिहायचे. माझी आई मला मी हॉस्टेलला राहत असताना रोज एक चिठ्ठी लिहायची आणि डब्यातून पाठवायची.अगदी साध्या साध्या गोष्टी, पण त्या दिलासा द्यायच्या.खूप वर्ष मी त्या जपून ठेवल्या होत्या.
माझ्या आईकडे ,तिला आणि मलाही , आलेली सर्व पत्र अजूनही जपून ठेवली आहेत. त्यात 'वाचून झालं की हे पत्र फाडून टाक'अशा मजकुराचे सुद्धा एक पत्र आहे. इतरही अनेक पत्र,ज्यातून त्या त्या वेळच्या अनेक आठवणी जाग्या होतात. माझ्या मावस भावाने एक छोटेखानी गोष्टवजा पत्र लिहिलं होतं. त्यांच्या घरासमोर घडणाऱ्या चित्तथरारक धरपकडी बद्दल मजेदार वर्णन केलं होतं.कधी मोठी पत्र लिहायला वेळ मिळाला नाही तर पोस्टकार्ड किंवा अगदी वाढदिवसाच्या शुभेच्छा पत्रातून चार ओळी लिहायच्या.
दुपारी पोस्टमन येण्याच्या वेळा ठरलेल्या असायच्या. सकाळी ११ ,दुपारी २.३० . त्यावेळी सारखा दाराजवळ वावर असायचा. आणि एकदा पत्र आलं की लगेच त्याचं उत्तर द्यायचं. ते पत्र पोस्टात टाकलं की दिवस मोजायला सुरुवात ,आता हे पत्र इथपर्यंत पोचल असेल, आता तिने वाचलं असेल, आता ती उत्तर लिहील आणि आता ती पोस्ट करेल. अर्थात सर्वच माझ्यासारखे आतुर नसत . मग कधी15 दिवसांनी तर कधी महिना दोन महिन्यांनी त्याचं उत्तर यायचं. ‘तू ...मामाच्या लग्नात साडी नेसणार की ड्रेस घालणार ?’असाही प्रश्न विचारलेला आठवतोय. ते पत्र मात्र वेळेत आलं असणार...नाहीतर काय उपयोग होता त्याचा ? एका पत्रात ‘ …. फार मस्ती करते. एकदा शेंगदाणा उचलून नाकात घातला. मग उचलून हॉस्पिटल मध्ये न्यावं लागला. फार धावपळ झाली.’ या मजकुराच पत्र आईने जपून ठेवलंय .
(पण जर घर सावरण्याची हुक्की आली तर माणूस निर्दय होऊन घरातला सर्व sentimental पसारा काढायला जातो. सुदैवाने आपल्या आधीची पिढी त्यातली नाही.)
जरी आपण एफबी आणि wa ला आज दोष देत असलो तरीही जेव्हापासून घराघरात फोन आले, साधे बरं का, मोबाईल नव्हे,तेव्हापासून पत्र लिहिणे कमी झाले. अर्थात बाहेर(म्हणजे फॉरेनला) असलेले आपले सुहृद पत्र लिहीत असत ,पण मोबाईल आल्यापासून तेही कमीच झालं. हळू हळू पत्र लिहिणं मागासलेल वाटायला लागलं. मग ई पत्र सुरू झाली,पण ती कामापुरतीच.
(तरीही गेल्या वर्षी खूप काळानंतर भेटलेल्या मैत्रिणींनी मला सुरेख इ मेल पाठवले होते.)
संवाद तर आता फोन आणि आता व्हॉटसअप मधूनही होतो. तरीही ही पत्र इतकी गोड का वाटतात ? फोनमधून विचार कळतात,खुशाली कळते,भावना कळतात.पण मला वाटतं भावनांइतकंच लिहिण्याला महत्व आहे. व्हाट्सप क्षणभंगुर .आपण सारेच रोज रात्री फोन साफसूफ करून झोपतो. पण पत्र राहतात.कधी कधी कित्येक वर्ष ठेवली जातात.पुन्हा काढून वाचली की पुन्हा गप्पा मारल्यासारख वाटत. पुन्हा आठवणींना उजाळा मिळतो.पत्रांना वैयक्तिक जिव्हाळ्याचा स्पर्श असतो.कुणीतरी मुद्दाम बसून, वेळ काढून,विचार करून आपल्यासाठी लिहिलंय, आपला विचार करून लिहिलंय,वॉट्सप्प सारखा येता जाता काहीतरी typela नाहीये.
….आणि मग,कधी कधी अशा पत्रांतून अशी एखादी कादंबरी जन्माला येते…
No comments:
Post a Comment