Friday, September 7, 2018

आजचा दिवस संपला एकदाचा....

आजचा दिवस संपला एकदाचा

कधी एखादा दिवस अगदी विचित्र असतो. आधीच्या दिवसाचे पडसाद त्यात असतात. आदल्या दिवशी ऐकलेली एखादी ‘तितकीशी चांगली नसलेली’ बातमी दिवसाची सुरूवात बिनसवते.

रात्री मी त्याच बातमीचा विचार करत झोपलेली असते. त्याही आधी संध्याकाळी खूप चलबिलचलीत मनाने ही नोकरी सोडून दुसरी बघण्याचा निश्चय केलेला असतो. अगदी नोकरी डॉट कॉम वर नवी प्रोफाईल सुद्धा अपलोड केलेली असते. मला रात्री स्वप्नसुद्धा तशीच पडतात. नव्या नोकरीची नव्हे पण जीवाची घालमेल दाखवणारी. सकाळी ती आठवत नाहीत, फक्त अस्वस्थता जाणवत राहते. आणि थकल्यासारख वाटत.

मग सकाळी कामावर जाताना सोसायटीच्या कम्पौंड मध्ये एक साळुंकी दिसते - अचानक आठवतं , लहानपणी एक साळुंकी दिसली की आम्ही अपशकून म्हणायचो. पटकन रिक्षाही मिळत नाही. हॉस्पिटल मध्ये पोचते तर दारातच मांजर आडवी जाते. आता काय नवी भानगड वाट पाहत बसलीय आत ? ह्याआधी मांजर कधी दिसली नाही ती इथे ? मुद्दाम माझ्या रस्त्यात आली मेली. पण ते मरो, आधी लेट मार्क चुकवायला हवा ,  म्हणून मी धावते, अर्थात हे वजन आणि तो अघळपघळ पलाझो सांभाळत जेमतेम .

कामाला सुरुवात तर करते , पण मनातल्या मनात लढाया चालूच असतात. मी यंव करेन आणि मी त्यंव करेन. पण अग बाई कधी करशील ? आधी हातातलं काम संपव की ! तिथे चुकलीस तर नसत्या भानगडी करून ठेवशील. मनातल्या प्रत्येक लढाईला आणि भांडणाला अशी स्वतःच वकिली करून स्वतःला काम संपवायला भाग पाडते.

तेवढ्यात १० वाजतात, कामाचा पुढचा टप्पा सुरू होता. इथे आपण पहिला टप्पा यशस्वीरीत्या पार पाडलाय हे माझ्या ध्यानातही येत नाही, अजूनही लढाईचे पडसाद मनात गुंजत असतात. हे असं का होतं , मला हवं तसंच का होत नाही , आता मला हवी तशी दुसरी नोकरी कोण देईल , xxx जरा आपल्या हाताखालच्या लोकांशी सक्तीने वागेल तर हे सगळं होणारच नाही हे विचार अजूनही चालूच असतात.

दुसऱ्या टप्प्यात नव्या,ताज्या अडचणी. पण ह्या मला सोडवता येतील असा वाटतं. कधी स्वतः तर कधी इतरांची मदत घेत मी त्या सोडवून टाकते.  आणि मग दुपारच्या जेवणापूर्वी मार्ग दिसतो … पूर्ण नाही ,धूसर,थोडा फार.

हे होईपर्यंत घड्याळाचे काटे हळूहळू माझ्या आवडत्या वेळेकडे सरकत असतात. घरी जायच्या. मला हायस वाटतं , आजचा दिवस संपला एकदाचा.

उद्या नव्या अडचणी. सोडवू शकेन किंवा अशीच त्रागा करत दिवसभर बसेन , हे फक्त माझ्या हाती आहे...

पण मी काही शिकले का या दिवसातून ? शिकले की सर्व गोष्टी आपल्या हातात नसतात. आपण त्रागा,आदळआपट केली म्हणून काहीच फरक पडत नाही. ज्यांच्यावर आपण चिडतो आणि ज्यांचा आपल्याला गळा दाबावासा वाटतो, ते आपलं आयुष्य मजेत जगतात, कोडगे होऊन. आपण मात्र आपला आज आणि त्यातले सुंदर क्षण त्या लोकांशी मनातल्या मनात भांडत, त्यांचा बदला घेत , त्यांची खोड मोडण्यात घालवून बसलो.

त्यामुळे मनाचे कप्पे केले पाहिजेत. जिथल्या भावना तिथेच ठेवून तो बंद करून टाकायचा. आणि ज्या गोष्टी आपल्या आवाक्याबाहेर आहेत, तिथे फक्त आकाशाकडे पाहायचे, बोट दाखवून खांदे उडवायचे आणि म्हणायचं - हे तुझं काम, माझं नाही.

No comments:

Post a Comment