Sunday, September 18, 2016

झपूर्झा

माझं इंग्रजी वाचन तसं भरपूर पण तरीही मनात एक खंत आहेच ….ज्याला classics म्हणतात अशी पुस्तकं मी जवळजवळ वाचलीच नाहीत . खरं तर खंत असूनही, त्यावर उपाय म्हणूनही मी  classics च्या वाटेल जाणे कठीण..... अशा वेळेला ,अच्युत गोडबोलेचं "झपूर्झा भाग १ आणि २ "अगदी मदतीला धावुन आल्यासारखं वाटलं .

अनेक उत्तमोत्तम इंग्रजी लेखक, ज्यांची मूळ पुस्तके आपल्याला समजणे कठीण.....खरं तर आपण घाबरून त्यांच्या वाटेलाच जाणार नाही ,असे लेखक आणि त्यांची गाजलेली पुस्तके याबद्दल सोप्या , सुटसुटीत भाषेत ,सुरेख लेख या पुस्तकात आहेत ....अगदी शेक्सपियरपासून ते मार्केझ पर्यंत अनेक लेखक यात आपल्याला भेटतात....

यातील प्रत्येक लेखकाचे काही वैशिष्ठय आहे , एक वेगळी  शैली आहे . कित्येकांकडे एखाद्या गाजलेल्या नव्या लेखनप्रकाराच्या उगमाचे श्रेय आहे  - जसे मार्केझकडे magical realism ....

अनेकदा प्रस्थापित लेखनशैली किंवा contents याविरुद्ध जाऊन , प्रचंड विरोध , कधी लोकक्षोभ यांना ना जुमानता ,हे सर्व लेखक स्वतःच्या लिखाणाशी प्रामाणिक राहिले....

ओनोरे बालझाकसारखा लेखक ,प्रचंड लेखन करी . वाटतं इतकी energy , कल्पनाशक्ती कुठून आणत असेल….

त्याउलट फ्रांझ काफ्का - ज्याला स्वतःच्या लेखनाबद्दल कधीच विश्वास वाटला नाही ,आपलं सर्व लिखाण आपल्या मरणानंतर जाळून टाकावे अशी विनंती त्याने आपल्या मित्राला केली होती .....

हेमिंगवेसारखा भन्नाट जगलेला माणूस तितक्याच भन्नाट रित्या मृत्यूच्या बाहुपाशात गेला ...

आणि शेक्सपियर ? ....उत्कृष्ट , खर तर आद्य नाटककार ,त्याची भाषा समजायला कठीण , विशेषतः माझ्यासारख्या मराठी माध्यमात शिकलेल्यांसाठी ....पण माझा 15 वर्षांच्या लेकाला त्याने भुरळ घातलीये . त्याच्या merchant of व्हेनिस नाटकातले संवाद तो धडाधड म्हणत असतो .... मॉडर्न मुलांना ,एक 18 व्या शतकातला लेखक प्रभावित करू शकतो यातच त्यांचं यश आल , नाही का ! त्याची गुंतागुंतीची कथानकं , उपकथानकं संवाद ,पात्ररचना यासाठी तो प्रसिद्ध आहे .

मी वाचलेले क्लासिक म्हणावेत असे लेखक मोजकेच - टॉल्स्टॉयची ऍना कारेनिना वाचली आहे , पण तिची घालमेल आपली वाटली नाही , त्यातली लांबलचक स्वगत आणि वर्णनं त्यातल्या narrative मध्ये बाधा आणतात असा मला वाटलं .

मार्केझ चा 100 इअर्स ऑफ सोलीट्युड खरं तर मला समजलीच नाही....

ब्रदर्स कारामझोव , मॅडम बोवारी , लेडी चॅटर्लीज लवर ह्या कादंबऱ्या वाचायचा फक्त निष्फळ प्रयत्न माझ्या पदरात आहे ! बहुधा जुनी पसरट लेखनशैली,कठीण इंग्रजी , आपलेसे न करू शकलेले dilemma यामुळे बहुधा …

आर्थर कॉनन डॉयल , ऑस्कर वाइल्ड यांची पुस्तकं मात्र फार आवडली , तसेच ब्रॉंटे भगिनींचीही ! आणि हो , बर्नार्ड शॉ चा Pygmalion ही अतिशय आवडतं !

या पुस्तकात नाहीत तरीही आवडते असे माझे अजूनही काही लेखक आहेत सोमरसेट मॉम ,एमिल झोला आणि सदा लोकप्रिय - अगाथा christie आणि वूडहाऊस.

हे दोन्ही भाग अतिशय रंजक आणि माहितीपूर्ण आहेत - लेखकांची थोडक्यात चरित्र , त्यांच्या गाजलेल्या पुस्तकांबद्दल माहिती तसेच थोडक्यात त्या पुस्तकाची कथा असं साधारण यातील लेखाचं स्वरूप आहे.
भाग 2 मध्ये काही कवी ,तसाच नाटककारही समाविष्ट आहेत .(Ezra पाउंड , आर्थर मिलर,एलिझाबेथ आणि रॉबर्ट ब्राउनिंग)

कधीकधी आपण जाणून असतो की आपण एखाद्या स्वप्नवत प्रदेशात फक्त vicariously जाऊ शकतो , दुसऱ्याच्या मार्फत - कोणाच्या शब्दांतून किंवा दृश्यनुभवातून .... हे पुस्तक माझ्यासाठी अगदी तसंच ...... कल्पनेपलिकडील प्रदेशातील भ्रमंती जणू !

Monday, September 12, 2016

फुरसत के रात दिन

खुप वर्षं एखादं गाणं मनात रुंजी घालत असतं ,पण अचानक एके दिवशी अनपेक्षित रित्या नव्याने भेटायला येतं…..तेच तेच वाचून लिहून कंटाळलेल्या मनाला  तरतरी देतं…
दिल ढुढंता है फिर वोही फुरसत के रात दिन
बैठे रहे तसव्वूर -ए - जाना किये हुए….
( खूप वर्षं हे तसव्वूर -ए - जाना प्रकरण मला कळलंच नव्हतं … बैठे रहे तसव्वूरे , जाना किये  हुए असं समजत होते ...
जाना करत बसण म्हणजे काय असाही विचार वारंवार मनात यायचा ….आज केवळ गूगल देवीमुळे खरे शब्द समजले .)
खूप पूर्वीपासून हे माझं अतिशय आवडतं गाणं आहे .( अगदी चुकीच्या शब्दासकट !) लताबाईंचा सुरवातीचा आलाप मनाला एक हुरहुर लावतो ….आपल्याकडची सर्वात मौल्यवान गोष्ट आपल्या नकळत हरवलीये आणि कितीही प्रयत्न केला तरीही परत मिळणार नाहीये ….
गाण्याचा अर्थ असाच आहे पण अर्थ समजण्याआधीपासूनच मला अशी हरवल्याची भावना जाणवे ….
तसही आपण सर्व ‘फुरसत के रात दिन ‘शोधतच आहोत ….जेव्हा घड्याळाच्या काटयाबरोबर ना धावता काही क्षण स्वतःशी संवाद साधू …. ‘तसव्वूर -ए - जाना’ ...आपल्या प्रिय व्यक्ती / छंद/ परमात्मा यांच्या ध्यानात हरवून जाऊ ...
(तसव्वूर - imagination , contemplation
जाना- प्रिय व्यक्ती - मी थोड्या broad अर्थाने म्हणतेय .)
या गाण्याची दोन versions सर्वश्रुत आहेत . पैकी duet थोड्या आनंदी वळणाच … संजीव - शर्मिला प्रेमी युगुलावर चित्रित झालेलं ...पण दुःखी version अधिक समर्पक ….त्या प्रेमींचे असे काय हरवलंय ….त्यांचे तर खेळण्याबागडण्याचे , झाडांभोवती फिरण्याचे दिवस ….पण या युगुलाच्या मागून फ्रेम मध्ये डोकावणारा वयस्क संजीव ‘ वादी में गुंजती हुई खामोशिया ‘ ऐकतो ….सुंदर ! भूपेंद्र च्या धीरगंभीर आवाजातील slow version अतिशय सुरेख .
गूगल देवीकडून या गाण्यावरील एका छोटासा वाद समजला .
हा मूळ शेर गालिबचा. त्या मूळ शेरात स्वल्पविराम वापरून ओळ कुठे तोडलीये हा तो मुद्दा ….
एक version मी वर दिलेले …
तर दुसरे ….
दिल ढुढंता है फिर वोही फुरसत ...
के रात दिन बैठे रहे तसव्वूर -ए - जाना किये हुए….
हे दुसरं version रचनेच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण वाटतं खरं पण ते बहुधा शेर या प्रकारच्या ‘मीटर’ मध्ये बसत नसावं ...मला आपल प्रचलित version च योग्य वाटतं …
असो. मी ह्यातली तज्ज्ञ नाही … मी फक्त कानसेन ….आणि लता-मदन  फुरसत मिळाली की ऐकणारी … अगदी रात दिन ...

हा एक intersting video आहे , मदनमोहन यांनी ज्या अनेक चाली ह्या गाण्यासाठी बनवल्या होत्या त्यांबद्दल....पहा तुम्हाला कोणती आवडते....

त्यातील आशाताई आणि गुलझारची टिप्पणी तर...वाह वा !






Saturday, July 16, 2016

अमलताश

खरं तर हे पुस्तक पाहीले तेव्हापासूनच ह्याबद्दल उत्सुकता होती.....
१.अमलताश म्हणजे काय ? ( एक पिवळ्या फुलांच झाड , आणि लेखिकेच्या कराडमधल्या घराचं नाव . या पुस्तकाचं मुखपृष्ठही अमलताशचच ! पिवळधम्मक ! )
२.मौज प्रकाशन...म्हणजे नक्कीच वाचनीय !
३.प्रकाश नारायण संत यांची पुस्तकं मला फार आवडतात ....त्यांच्या निर्मितीप्रक्रियेबद्दल काहीतरी वाचायला मिळेल ...लंपन ह्या त्यांच्या मानसपुत्राची जन्मकथा वगैरे.....
४.लेखक पत्नींची आत्मचरित्रे तशीही मला वाचायला आवडतात ( त्याबद्दल थोडे पुढे सविस्तर )
आपल्याला जो लेखक पुस्तकातून भेटतो ,आपण त्याच्या लिखाणावरून , त्याच्याबद्दल काही आडाखे बांधत असतो.पण कधीकधी तो लेखक खऱ्या जीवनात फार वेगळाही असू शकतो.आपल्याला वाटतात तसे खरच संत होते का ?
५.त्यांच्या नावाच रहस्य ! ( सुप्रिया भालचंद्र दिक्षित ह्या प्रकाश नारायण संत ह्यांच्या पत्नी ! आणि संत हे इंदिरा संतांचे चिरंजीव ! )

ह्या पुस्तकाबद्दल सांगण्याआधी या पुस्तकाच्या अनुषंगाने मनात आलेले काही विचार....

एखाद्या आत्मचरीत्राबद्दल लिहिताना मला नेहमी वाटतं , मी कोणाबद्दल लिहितेय....पुस्तकावर की त्या व्यक्तीवर ?
कोणी एखादी व्यक्ती आपला आयुष्य आपल्यापरीने जगतेय ...लढतेय...आणि तुम्हाला त्याबद्दल सांगू पाहतेय , म्हणून आपण त्यावर काही भाष्य करावे का ?  खरं तर आपलं आयुष्य मोकळेपणे मांडायला धैर्य लागतं ,मग खरं तर प्रत्येक आत्मचरित्राच कौतुक व्हायला हवं....त्याने जे लिहिलंय ,तेच त्याच्या दृष्टीने घडल असेल....
आणि जर आपल्याला , त्या व्यक्तीतले काही दोष जाणवले , तर ही त्या व्यक्तीच्या सच्चेपणाचीच निशाणी !

मला स्वतःला आत्मचरित्र वाचायला फार आवडतात....दैनंदिन आयुष्यातल्या अनेक छोट्या मोठ्या अडचणींपासून ते संकट म्हणाव इतक्या मोठ्या प्रसंगातून मार्ग काढत लोक आपल्या परीने जगण्यातला आनंद ,सौंदर्य  शोधत असतात ...हे सार मला खूप प्रेरणा देऊन जातं.....

याआधी अनेक लेखक पत्नींची आत्मचरित्र वाचली आहेत ...( काही राहुनही गेलीत !)
स्मृतिचित्रे...
आहे मनोहर तरी...
साथ सांगत ( रागिणी पुंडलिक)
कुणास्तव कुणीतरी ( यशोदा पाडगावकर)
रास ( सुमा करंदीकर)
नाच ग घुमा ( माधवी देसाई)

आणि आता हे ....अमलताश.....


तर अमलताशबद्दल.....
पुस्तकाची सुरुवात लेखिकेच्या बालपणीच्या घरापासून होते...इथूनच आपल्याला लेखिकेच्या जडणघडणीची  सुरुवात दिसते.काही कारणास्तव लेखिकेची आई तिच्या माहेरी परत आली , पण तिथे ती आपल्या नशिबावर रडत न बसता ,पुढे शिकून आपल्या पायावर उभा राहण्यासाठी सतत प्रयत्नशील होती. हाच गुण लेखिकेतही आपल्याला दिसतो.आयुष्यात अनेक अडचणी आल्या ,पण शिक्षणाचे महत्व समजून ते पूर्ण करण्याची जिद्द - त्यानंतर त्या शिक्षणाचा उपयोग व्हावा म्हणून केलेली धडपड - अनेक वेळा सासरची मंडळींशी दिलेला लढा - या सर्वांचे बीज लेखिकेच्या बालपणात -घरच्या वातावरणात आणि त्यांच्या आईच्या व्यक्तिमत्वात दिसते .

६० वर्षापूर्वीही मेडिकल कॉलेज तसेच होते- किंबहुना तीच challenges -काळामुळे  थोडी जास्तच खडतर वाट -मला क्षणभर माझे शिक्षण आठवले.....

घराच्या दबावामुळे gynaecology सारख्या विषयात मिळालेले PG सोडावे लागले .....सासू प्राचार्या  आणि कवयित्री झाली तरी ती सासुच असते - आई नाही !....

पण अनेक अडचणींवर मात करून त्या practice मात्र चालूच ठेवतात - अत्यंत प्रेरणादायी असा हा भाग !

त्यांचे लहानपणीचे फोटो -त्यातली हसरी सुधा -नंतरच्या आयुष्यात मात्र अनेक झुन्जीनंतर - हास्य हरवून -पोक्त , गंभीर आणि थोडी करारी झाल्यासारखी वाटते.....

संत आणि त्यांची प्रेमकहाणी अगदी रोमहर्षक - अगदी फिल्मी वाटावी अशी - ते भावनांचे चढउतार - आशा निराशेचा खेळ - विरह - मिलन - विरह अशी आवर्तने....लहानपणापासून ज्याला ओळखतो अशा व्यक्तीशी मैत्रीचे नकळत प्रेमात रुपांतर कसे झाले ....ह्याबद्दल फार छान लिहिले आहे....

उभयताना प्रकृतीच्या अनेक अडचणी आल्या - त्यामुळे त्या काही अंशी थकलेल्या , कंटाळलेल्या वाटतात ...संतांच्या लंपनचा  भाबडेपणा , आशावाद -जो संतांमध्ये दिसतो- तो त्यांच्यामध्ये नाही -  त्या अत्यंत practical वाटतात  -आणि ते लेखक पत्नीला आवश्यकच असावे -त्यांचे पाय जमिनीवर असायलाच हवेत .... तेव्हाच लेखक -संत - मुक्तपणे कल्पनेच्या आकाशात भरारी घेऊ शकले....

अनेक वर्षांच्या सहजीवनाचा शेवट संतांच्या अपघाती मृत्यूने झाला - मनाला खूप चटका लावून गेला - तोही अशा वेळी , जेव्हा संत लंपनच्या बाबांच्या मृत्यूचा क्षण लिहिण्याच्या तयारीत होते ....ते लिखाण संतांना थोडे जड जात होते .....कारण त्यांच्या स्वतःच्या वडिलांच्या अकाली मृत्यूची सावली सतत त्यांची भोवती असे....

संतांचे अनेक पैलू आपल्याला दिसतात ....एक रसिक - जीवनाच्या विविध अंगांचा आस्वाद घेणारा ....विविध प्रकारे जीवन कलाकृतीत आणू पाहणारा ....लेखक ,चित्रकार ,वायोलिन वादक -प्रियकर-नवरा-वडील-मातृभक्त मुलगा ....

लेखिकेचीही कर्तबगारी ,सतत असलेले प्रोत्साहन -पाठींबा - ज्याशिवाय संतांना निर्मिती सहजसाध्य झाली नसती ,कलासक्ती , सामाजिक भान ,उत्तम वैद्यकीय कौशल्य ,खंबीर ,कणखर स्वभाव -पण तरीही प्रेमळ स्वभाव -घरासाठी त्यागाची तयारी....एक स्त्री डॉक्टर म्हणून त्यांनी आलेल्या अडचणीचा केलेला सामना विशेष  कौतुकास्पद !

अनेक लेखक पत्नींच्या  मालिकेतले अजून एक आत्मचरित्र - पण ते विशेष ठरते ते लेखिकेच्या स्वतःच्या कर्तृत्वामुळे....जरूर वाचण्याजोगे !!


( सहज आठवले म्हणून .....

रविवारच्या लोकसत्तामध्ये ( १७ जुलै) आशुतोष जावडेकरांचा लेख वाचला , The Little Prince आणि त्याचा लेखक सेंट एक्झुपेरी वरचा. त्याच्याही पत्नीने आत्मचरित्र किंवा दोघांच्या सहजीवनावर पुस्तक लिहिलंय...( ते अजून वाचायचा योग आला नाहीये) पण मला वाटतं कि कदाचित The Little Prince मध्ये डोकावणारा सेंट एक्झुपेरी हा ह्या पुस्तकातल्या सेंट एक्झुपेरी पेक्षा खूप निराळा असणार एवढा नक्की ! पुस्तकातून आपल्याला भेटणारा लेखक हा प्रत्यक्ष जीवनात खूप वेगळा असू शकतो. पण मग लेखनात स्वतःचा अंश उतरतो अस का म्हणतात ? सोमरसेट मॉम हा प्रत्यक्ष जीवनात थोडा क्रूर असल्याच ऐकिवात आहे , पण त्याच्या लेखनात हे कधीच जाणवत नाही.....

...किंवा कदाचित असंही असेल....एखादी गोष्ट लिहिताना ,त्यातल्या पात्रांच्या आत , खोल अंतरंगात शिरून ,त्यांच्यासारख बनून लिहाव लागत असणार.....म्हणून आपल्याला तेच दिसतं जे लेखक दाखवू इच्छितो....)





Wednesday, April 6, 2016

पुन्हा एकदा गलका ... (यावेळी पद्य !)

फेरफटका जगात मारून
पुन्हा आले स्वतःशी.,
खरेच मजला पुन्हा कळाले ,
माझे आहे मजपाशी !

नको वाटतो गोंधळ-गलका
नकोच ती वादावादी
सतत प्रश्न ,अभिवादन नेहमी
काय अर्थ या संवादी ?

प्रत्यक्ष भेटुनी नजर भिडवूनी
चेहरा वाचत बोलावे
मोडित निघाली प्रथाच आता
दुखणे कोणा सांगावे

सतत हाती असतो तो फोन
बोटांचे जणू नृत्य चालते
शुभप्रभात आणि शुभरात्रीचा
मी उगीचच रतीब घालते

अति जाहले,मन उबगले
तक्रार सांगू कोणाला ?
तसे पाहता या सैताना
मीच नाही का जन्म दिला ?

Monday, April 4, 2016

मी काय वाचतेय.....

सध्या मी रोज एक छोटीशी पोस्ट लिहिण्याचा संकल्प केलाय , एका challenge चा भाग म्हणून. पण  ( कबुल करायला हरकत नाही की) खरं तर थोडी फसवणूकच करतेय . पुढच्या साधारण २० एक पोस्ट्स लिहून तयार आहेत माझ्या!

परिणामे मला आता उबग आला....इंग्रजी लिखाण आणि वाचनाचा ! त्यामुळे आता गाडी मराठीकडे !
आपल्याला ज्या विषयात फारसं कळत नाही अशा एका विषयाकडे मी आता वळणार आहे....खूप दिवसापासून आणून ठेवली होती ही...आजपासून श्रीगणेशा !

Saturday, March 19, 2016

कोलाहल

नको वाटतो कधी कधी हा गलका...हा आवाज ! माणूस समाजप्रिय आहे खरं पण कधी कधी त्यालाही समाज नकोसा होतोच ! आपल्या कोशात जाऊन...सर्वांपासून दूर कुठेतरी बसावं असही कधीतरी वाटतं ...एखादं कासव आपलं अंग चोरून,कवचाखाली गुपचूप दडून राहत , अगदी तसच....

अशा मनाच्या अवस्थेत सगळच कर्कश वाटतं....मनाला त्रास देतं...नको कोणाशीही बोलणं..प्रत्यक्ष  नको....social media बिलकुलच  नको , असं वाटत राहत..... निरर्थक नको... अर्थपूर्ण त्याहूनही नको ....कारण त्यानंतर आपल्या मेंदूत जो संवाद चालू होतो तो थांबवण केवळ अशक्य ! चौकश्या  नकोत...अभिवादन नको... काहीच नको.....

...काश आपण या शहरात अनोळखी असतो ,अनोळखी नजरेने,वरवर पाहून पुढे गेलो असतो .....पण इथे ,कोणी न कोणी तर भेटतच सतत....मग तेच...तोंड देखलं हसू...हालहवाल ...ख्यालीखुशाली....

शांततेची ओढ लागली असताना, कोलाहलात वावरणे , काम करणे प्रचंड तापदायक ! हा आवाज आपल्या मनाला दगड बनून खाली खेचत राहतो....कान जर बंद करता आले असते तर....

आजची माझी अवस्था याही पलीकडली...फक्त आवाजच नाही तर शब्दही नको झालेत ... पुस्तकातले ... लिखाणातले .... संगीत नको ...काहीही वाचू नये...ऐकू नये...पाहू नये .....लिखाणही शब्द बम्बाळ....फाफटपसारा वाटतंय .....निरुद्देश भ्रमंती कागदावरची....

शनिवार संध्याकाळ आहे ...हा सर्व , या पूर्ण आठवड्याच्या कामाचा शीण कदाचित .....आठवडाभर  ऐकले - बोलले - वाचलेले हजारो- लाखो शब्द मला घेरून टाकतात...गोंगाट...गलका..कोलाहल...कानात घुमणारा ....

घरी येताना रस्त्यावरच्या गाड्या जणू मला त्रास द्यायला टपल्या आहेत असा राहून राहून वाटतंय ....माझ्या गल्लीत वळल्यावर तिथली निर्मनुष्य शांतता क्षणभर सुखावून जाते...पण क्षणभरच....तेवढ्यातच एक परिचित भेटतातच...तेच जुजबी संभाषण...करायचं म्हणून केलेल...पाट्या टाकल्यासारख....

घरी पोचल्यावर मात्र एक सुखद धक्का ...शांत घर ....कोणीही नाहीये....उबदार घर ...मायेने जवळ घेतं....न बोलताच समजून घेतं....जणू काही त्याला सार काही  कळलय .....

हातातली ओझी तशीच टाकून मी बसून राहते .....काही सेकंद...मिनिट...कदाचित तासभरही .....पुन्हा वर्दळ सुरु व्हायच्या आधी मला ही रिती घागर या शांततेने भरायची असते ....पुन्हा एक नवा दिवस , नवा आठवडा ...दंड थोपटत समोर उभा असतो ....नवी आव्हाने घेऊन ......


( शाळेत एक प्रश्न असायचा - विरुद्धार्थी शब्द लिहा...तसच काहीस वाटतंय आज... काही महिन्यापूर्वी शांतता सुखावून गेली होती ...पण त्याच्या अगदी उलट अवस्था ! ....चालायचंच ....ह्याला जीवन ऐसे नाव !
ती पोस्ट इथे वाचा ...)




Tuesday, March 15, 2016

पुन्हा एकदा लिखाण...

महिन्याभरात एकही पोस्ट लिहिली नाहीये मी...मान्य आहे...पण आज त्याबद्दल तक्रार , किंवा रडगाणं मुळीच गाणार नाहीये ! काही अनुभव मनात रुजवत ठेवावे लागतात,मग कधीतरी अलगद ते फुलतात...बहरून येतात....मध्यंतरी पाहिलेली काही नाटकं ,वाचलेली काही पुस्तकं आणि नव्या नोकरीत भेटलेली अरभाट माणस अशीच रुजवत ठेवली आहेत....वाट बघतेय...काही दिवसांनी नक्कीच काहीतरी छान हाती लागेल.....

असो...

मध्यंतरी एका ब्लोग्गिंग साईट वर एका marathon ची घोषणा झाली होती. कमीत कमी ४५० शब्दांची एक , याप्रमाणे पोस्ट लिहायच्या होत्या. पोस्ट संख्येवर मर्यादा नव्हती..तुम्ही एका दिवशी १२ पोस्ट ही लिहू शकत होता...( त्या ब्लॉग साईट वर मात्र दिवसाला ६ अशी मर्यादा आहे ) त्यानिमित्ताने मनात आलेले हे अरभाट आणि थिल्लर / चिल्लर विचार....( G. A. क्षमस्व !)......

कसा काय बुवा ह्या लोकांना रोज इतक लिहायला वेळ मिळतो ? ह्यांना इतर काही उद्योग धंदे नाहीयेत का ? पोटापाण्याच सोडा पण घरदार,अभ्यास , मुलबाळ काहीच कस नाही ? बर , अस धरून चालूया , की ह्या अडचणी महत्वाच्या नाहीत , पण दररोज ,६-१२ पोस्ट्स असा शब्दांचा रतीब कोण घालू शकत असेल? तोही रोज , न चुकता....( ज्याच्या सर्वात जास्त पोस्ट्स ,त्याला मोठ्ठ बक्षीसही होत, बर का !) मी त्यातल्या काही पोस्ट्स वाचण्याचा प्रयत्न केल्या. हो...प्रयत्नच !...फक्त शब्द संख्या वाढवण्यास लिहिल्या आहेत,हे स्पष्ट जाणवत होत. रोज नवे विषय कुठून आणायचे ? ( तसे त्यांनी ६ शब्द दिले होते ,पण फक्त ६च !) ४५० शब्दांच काव्य,( खंडकाव्य !) लिहिण... मस्करी नाहीये...त्यामुळे त्यातल्या त्यात सोप्प,म्हणजे गद्यच लिहिल गेलं  ! त्यांचे  परीक्षकही इतक्या शेकड्यांनी आलेल्या पोस्ट्स वाचू शकणार नाहीत हे उघडच होतं . म्हणजे त्या website वर ज्याला जास्त likes मिळणार,तोच जिंकणार हे सोप गणित . नशिबाचा भाग जास्त,गुणवत्तेचा कमी...

असो...

मुद्दा कोण जिंकणार हा नाहीच . मुद्दा हा आहे , की केवळ एका स्पर्धेत जास्त लिहायला सांगितलं, म्हणून काहीही , दर्जाहीन खरडाव की  काय ? मग आपण लिहितो ते कशासाठी ?

मी या स्पर्धेत भाग घेतला नाही,हे आत्तापर्यंत चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलच असेल ! रोज , न चुकता ,भरमसाठ लिहिण्याच्या विचाराने माझं डोकं भणाणून गेलं आणि मग पुढचे कित्येक दिवस मी काहीच लिखाण केल नाही हेही चाणाक्ष वाचक ( हो..हो..तुम्ही...तुम्हीच ते !)  समजले असतील....

या निमित्ताने ,आणखी एक गोष्ट ध्यानात आली. मराठी ब्लॉग sites साठी अशा स्पर्धा होत नाहीत.  दर आठवड्याला , इंग्लिश ब्लॉग community वर लिहिण्याचे prompts दिले जातात ,तसा काहीच प्रयत्न मराठीत होत नाही. आम्हा bloggers नाच याबद्दल काहीतरी कराव लागेल असं दिसतंय.....

भेटू लवकरच .....