MPM२ वर लिहिताना म्हटल
होता तसच आताही म्हणतेय....हे परीक्षण नाहीये....कारण ह्या चित्रपटाच परीक्षण करणे
म्हणजे दारव्हेकर , वसंतराव आणि अभिषेकींच परीक्षण केल्यासारख वाटेल !
हा चित्रपट मी एकटीने जाऊन
पाहिला – एकट्याने चित्रपट पाहण्यातही एक वेगळी मजा असते... तुम्ही अगदी मोकळेपणे
येणाऱ्या अश्रुना वाट देता...कोण काय म्हणेल याचा विचार न करता .....
सुबोध भावेचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट ....आणि जुन्या संगीत नाटकांच पुनरुज्जीवन करण्याचा हा उपक्रम नक्कीच स्तुत्य ! नवीन पिढीला “ बद्तमीज दिल आणि मटरगशती “ च्या खेरीज इतरही संगीत अस्तित्वात आहे ह्याची जाणीव झाली . मराठी सिनेसृष्टीला चांगले दिवस आलेत ही समजूत अधिकच पक्की झाली .
हा चित्रपट खरं तर मी गेल्या आठवड्यातच पाहिला ....पण मी त्या अनुभवाला मनात रुजू देत होते जणू.....पाहताना अनेक वेळा डोळ्यातून अश्रू वाहू लागले....खरं तर प्रसंगांमुळे नाहीत तर संगीतामुळे....अंगावर रोमांचही उभे राहत होते अनेक वेळा ...सुरांची ताकदच आहे तेव्हढी ....
पहिल्या प्रेमाचा तो भर
उतरल्यावर मी किंचित critical दृष्टीने आज पुन्हा त्या चित्रपटाकडे पाहण्याचा
प्रयत्न केला ....तेव्हा मला जाणवले की संगीतच खरं आहे ह्यात...इतर काही फारस महत्वाच
नाही...
मुळात हे नाटक लिहिले गेले
तेच संगीत नाटकांचे पुनरुज्जीवन व्हावे यासाठी , त्यामुळे ही कथा साधीशी असणार यात
नवल नाही , ह्या नव्या रुपात चित्रपट चकचकीत आणि दिमाखदार दिसतो यात शंकाच नाही पण
तरीही संगीत हेच मध्यवर्ती !
दोन संगीत घराण्यातल्या स्पर्धेची ही कथा – पंडित भानुशंकर आणि खांसाहेब यांची –कट्यार जिंकण्याच्या स्पर्धेची ...सतत १४ वर्ष खांसाहेब ही स्पर्धा हरतात . आणि १४ वर्ष त्यांच्यावर ( काहीसा) अन्याय होत राहतो ...आपल्या कानांना दोघांचही संगीत अगदी सारखंच प्रभावशाली वाटतं आणि राजेसाहेब कायम भानुशंकर यांना झुकतं माप देत आहेत अस वाटत राहत .१४ वर्ष उत्तम गाऊनही , स्पर्धेचे विजयीपद तर राहोच पण दोन वेळच्या खायचीही भ्रांत ! सतत अन्याय झाल्यावर कोणीही माणूस सुडाने पेटून उठतोच ( आपले हिंदी चित्रपट याचे सतत दाखले देतात !) पुढचा चित्रपट या सूडाचा प्रवास आणि शेवट दाखवतो....
खटकण्यासारखे अगदी थोडेसे – वेशभूषा काही ठिकाणी ( उमेची अमराठी साडी आणि भानुशंकर यांची मद्रासी पगडी ) तसाच झरिना मशिदीत जाऊन कशी काय कव्वाली ऐकते हा प्रश्न ...बर ऐकते तर ऐकते पण परदा न करता , परपुरुषासमोरही जाते हे थोडे खटकले.( भानुशंकर आणि विशेषतः उमा बिनदिक्कत मशिदीत जातात हेही नवीनच !)
शंकर महादेवन मुळात अभिनेता नाही त्यामुळे त्यांना कस लागेल असे प्रसंग देण्यात आले नाहीत . पण त्या व्यक्तिरेखेसाठी योग्यच ! सज्जन , ज्ञानीं आणि पट्टीचे गायक ते निश्चितच वाटतात. सचिनजीचा underplay केलेला खांसाहेब आणि त्यांच उर्दू झक्कास ! सुबोध भावे सदाशिव म्हणून चपखल ! ( गाताना मात्र दोघांचाही अभिनय किंचित कृत्रिम वाटतो )
Climax फार परिणामकारक विशेषतः तराणा ...अंगावर शहारे येतात आणि डोळ्यात पाणी! दुसरा आवडलेला scene काजव्यांचा ...कल्पक आणि उत्तम आकारलेला....देस रागातल “ मन मंदिरा “ अप्रतिम !...शिवम आणि शंकर महादेवन या पितापुत्रांनी गायलेल....संगीताची ताकद जाणवते ....गायकांचा बुलंद स्वर निळ्या आकाशाच्या घुमटावरून परावर्तीत होतो...आपल्या शरीरावर फुटलेल्या असंख्य कानांमधून आत शिरून थेट आपल्या आत्म्याला भिडतो असा सतत जाणवत रहात.....
एकंदरीत गाणं ह्या
चित्रपटाचा आत्मा आहे , गाण्याशिवाय हा चित्रपट शून्य आणि गाण्यामुळे हा चित्रपट
लक्षणीय बनलाय . त्यामुळे आभार ....राहुल देशपांडे, महेश काळे आणि शंकर व शिवम
महादेवन यांचे ! एक भव्य संगीतमय अनुभव !!