Friday, September 7, 2018

कधी कधी काय होतं…

कधी कधी काय होतं…

कधी कधी काय होतं…की आपल्याला खूप दिवसांपासून एक पुस्तक वाचायचं असतं. दैवयोगाने ते आपल्याला लायब्ररीत मिळतं. आपण सुरुवात करतो . आपल्याला खूप छान वाटतं. आता आपल्याला साहित्य कळतंय असा वाटायला लागतं.कारण हे पुस्तक भल्या भल्यांनी नावाजलेले असते. आपण मारे अमुक अमुक वाचन भाग -१ अशी एखादी blog post सुद्धा टाकून देतो. पण मग गोची होते. पुस्तक खूप छान लिहिलं आहे ह्यात दुमत नाही , पण ह्या लेखक बाबाला नक्की सांगायचंय काय ? शेवटचे दोन भाग तर सपशेल डोक्यावरून गेलेले असतात. It is all very beautiful but rather difficult to understand अशी गत होते. आपण मारे त्याच लेखका ची अजून २पुस्तके आणून ठेवलेली असतात,  आता तो बागुलबुवा होऊन वाकुल्या दाखवत असतो. आणि खरी गोम ही की आता अमुक अमुक वाचन भाग -२ लिहायचं कसं ????

कधी कधी काय होतं… की आपण एक खरोखर छान, ओघवत्या भाषेतल पुस्तक वाचतो , ज्यात अगदी रोजच्या आयुष्यातले अनुभव खुसखुशीत भाषेत लिहिलेले असतात. वाचून आपल्यालाही वाटतं - सोप्पं आहे , आपणही लिहून पाहूया. पण मग लिहायला घेतलं की सुचत नाही आणि जे लिहितो ते अगदीच फालतू असतं…

कधी कधी काय होतं… आपल्या गृपवर एखादी आध्यात्मिक भाषणाची जाहिरात येते.आणि आपण न वाचताच अंदाजाने ‘ नॉनव्हेज असेल तरच मी येणार ‘ असं म्हणून मोकळे होतो…

कधी कधी काय होतं… आपण एखाद्या मजकूर कॉपी करून दुसऱ्या गृपवर पोस्ट करते , पण बराच वेळ , तो मजकूर आपल्या बोटाला चिकटला आहे असा भास होत राहतो , किती वेळ ते बोट आपण इतर कशालाही लावत नाही…

कधी कधी काय होतं… आपण पुस्तक वाचून एखादा पदार्थ बनवायला जातो , पण पूर्वतयारी नसल्याने व्हिनेगर ऐवजी चिंचेचा कोळ चालेल का असा क्रांतिकारी विचार करतो , पण surprise surprise !!  परिणाम नेहमी वाईट असतो असं नाही !

कधी कधी काय होतं… सगळ्यांकडे आहे म्हणून आपण डास मारण्याची रॅकेट घेतो. पण मग कळतं , डास  मारणं काही तेवढं सोपं नाही. कारण त्यासाठी प्रत्येक डास शोधून त्याला टीपावा लागतो. आणि कायम रॅकेट हातात धरून सतर्क राहावं लागतं.पण

तरीही रॅकेट फिरवल्यावर  “ पुट पुट”असा नाजूक फटाक्यांचा आवाज येतो आणि रॅकेट मधून धूर येतो तेव्हा समाधानाने हसू येतं.

आणि कधी कधी असही होतं की मध्यरात्री कानाच्या जवळ अशाच नाजूक फटाक्यांचा आवाज येतो आणि आपण दचकून जागे होतो. आपली झोपमोड झाली म्हणून वैतागायच की आता डास मेले म्हणून खुश होऊन पुन्हा पहिल्यापासून गुडुप झोपायच हेच कळत नाही …

कधी कधी आपल्याला खूप काही लिहायचं असतं पण काय लिहायचं कळत नाही ….

आणि कधी कधी सुरुवात तर छान होते पण लेखाचा शेवट कसा करायचा कळत नाही….







आजचा दिवस संपला एकदाचा....

आजचा दिवस संपला एकदाचा

कधी एखादा दिवस अगदी विचित्र असतो. आधीच्या दिवसाचे पडसाद त्यात असतात. आदल्या दिवशी ऐकलेली एखादी ‘तितकीशी चांगली नसलेली’ बातमी दिवसाची सुरूवात बिनसवते.

रात्री मी त्याच बातमीचा विचार करत झोपलेली असते. त्याही आधी संध्याकाळी खूप चलबिलचलीत मनाने ही नोकरी सोडून दुसरी बघण्याचा निश्चय केलेला असतो. अगदी नोकरी डॉट कॉम वर नवी प्रोफाईल सुद्धा अपलोड केलेली असते. मला रात्री स्वप्नसुद्धा तशीच पडतात. नव्या नोकरीची नव्हे पण जीवाची घालमेल दाखवणारी. सकाळी ती आठवत नाहीत, फक्त अस्वस्थता जाणवत राहते. आणि थकल्यासारख वाटत.

मग सकाळी कामावर जाताना सोसायटीच्या कम्पौंड मध्ये एक साळुंकी दिसते - अचानक आठवतं , लहानपणी एक साळुंकी दिसली की आम्ही अपशकून म्हणायचो. पटकन रिक्षाही मिळत नाही. हॉस्पिटल मध्ये पोचते तर दारातच मांजर आडवी जाते. आता काय नवी भानगड वाट पाहत बसलीय आत ? ह्याआधी मांजर कधी दिसली नाही ती इथे ? मुद्दाम माझ्या रस्त्यात आली मेली. पण ते मरो, आधी लेट मार्क चुकवायला हवा ,  म्हणून मी धावते, अर्थात हे वजन आणि तो अघळपघळ पलाझो सांभाळत जेमतेम .

कामाला सुरुवात तर करते , पण मनातल्या मनात लढाया चालूच असतात. मी यंव करेन आणि मी त्यंव करेन. पण अग बाई कधी करशील ? आधी हातातलं काम संपव की ! तिथे चुकलीस तर नसत्या भानगडी करून ठेवशील. मनातल्या प्रत्येक लढाईला आणि भांडणाला अशी स्वतःच वकिली करून स्वतःला काम संपवायला भाग पाडते.

तेवढ्यात १० वाजतात, कामाचा पुढचा टप्पा सुरू होता. इथे आपण पहिला टप्पा यशस्वीरीत्या पार पाडलाय हे माझ्या ध्यानातही येत नाही, अजूनही लढाईचे पडसाद मनात गुंजत असतात. हे असं का होतं , मला हवं तसंच का होत नाही , आता मला हवी तशी दुसरी नोकरी कोण देईल , xxx जरा आपल्या हाताखालच्या लोकांशी सक्तीने वागेल तर हे सगळं होणारच नाही हे विचार अजूनही चालूच असतात.

दुसऱ्या टप्प्यात नव्या,ताज्या अडचणी. पण ह्या मला सोडवता येतील असा वाटतं. कधी स्वतः तर कधी इतरांची मदत घेत मी त्या सोडवून टाकते.  आणि मग दुपारच्या जेवणापूर्वी मार्ग दिसतो … पूर्ण नाही ,धूसर,थोडा फार.

हे होईपर्यंत घड्याळाचे काटे हळूहळू माझ्या आवडत्या वेळेकडे सरकत असतात. घरी जायच्या. मला हायस वाटतं , आजचा दिवस संपला एकदाचा.

उद्या नव्या अडचणी. सोडवू शकेन किंवा अशीच त्रागा करत दिवसभर बसेन , हे फक्त माझ्या हाती आहे...

पण मी काही शिकले का या दिवसातून ? शिकले की सर्व गोष्टी आपल्या हातात नसतात. आपण त्रागा,आदळआपट केली म्हणून काहीच फरक पडत नाही. ज्यांच्यावर आपण चिडतो आणि ज्यांचा आपल्याला गळा दाबावासा वाटतो, ते आपलं आयुष्य मजेत जगतात, कोडगे होऊन. आपण मात्र आपला आज आणि त्यातले सुंदर क्षण त्या लोकांशी मनातल्या मनात भांडत, त्यांचा बदला घेत , त्यांची खोड मोडण्यात घालवून बसलो.

त्यामुळे मनाचे कप्पे केले पाहिजेत. जिथल्या भावना तिथेच ठेवून तो बंद करून टाकायचा. आणि ज्या गोष्टी आपल्या आवाक्याबाहेर आहेत, तिथे फक्त आकाशाकडे पाहायचे, बोट दाखवून खांदे उडवायचे आणि म्हणायचं - हे तुझं काम, माझं नाही.

Wednesday, September 5, 2018

अद्भुत असे काही ...

लहानपणी आपण सर्वच fantasy ह्या प्रकारात बसणारी (मराठीत अद्भुत म्हणावं का ह्याला ?)  पुस्तकं वाचतो, खरं तर ही पुस्तकं आपल्याला इतर कुठल्याही पुस्तकांपेक्षा जास्त आवडतात . पऱ्या , राक्षस, उडते गालिचे, चेटकीण -मला तर भारी आवडायची अशी पुस्तकं .पण मोठेपणी मात्र खऱ्याच गोष्टी वाचायच्या असं कुठेतरी वाटू लागलं. मोठ्यांसाठी सुद्धा अशी पुस्तकं असतात हे माहितही नव्हतं.(खरं तर नाथमाधव यांचं ‘वीरधवल’ शाळेत असताना खुप आवडीने वाचलं होतं. पण ते मोठ्यांसाठी होतं का ठाऊक नाही. मराठीत अशी मोठ्यांची पुस्तकं कमीच.)

कधीतरी मग मुलासाठी आणलेली लहान मुलांची अद्भुतरम्य पुस्तकं , त्याच्या सोबत वाचू लागले . हॅरी पॉटरने त्याच्याबरोबर मलाही भुरळ घातली. जे के रोलिंग ह्या लेखिकेला खरच मानायला हवं, सात पुस्तकांची गोष्ट तिच्या मनात तयारच होती. इतकी छान पात्र,त्यांच्यातल्या लढाया, चांगला वाईट संघर्ष,त्याबरोबर जादूच्या दुनियेची आणि त्यातल्या नियमांची इतकी सुंदर आणि जिवंत मांडणी.(अर्थात  जादूची दूनिया ,जादूचे नियम वगैरे असते हे मला पूर्वी काही माहीत नव्हतं. ते आत्ता हळूहळू कळायला लागलंय. आपल्या उडत्या गालीच्याला काही नियम होते का ?)

मग कधीतरी मला एक पुस्तक सापडलं. खरं तर भेटलं. दुसऱ्या एका पुस्तकात. ह्या पुस्तकात त्या पुस्तकाची खूप स्तुती केली आहे. म्हणून म्हटलं वाचूया. अर्थात मला त्यावेळी ते अद्भुत ह्या सदरात मोडणारे पुस्तक वाटले नाही. कारण अद्भुत म्हणजे जादूगार, पऱ्या, चेटकिणी अशी समजूत होती.. त्यामुळे एका पुस्तकाची नायिका  ती जे पुस्तक वाचतेय, त्यात जाऊन त्यातली गोष्ट बदलते आणि जाता जाता खलनायकाच्या xxxx मध्ये दोन लगावून सुद्धा येते हे एकदम भावलं.

त्या पुस्तकाचं नाव तसंच मजेदार. ते त्याच्या नायिकेच नाव.Thursday Next. पुढचा गुरुवार ? पुढचा गुरुवार असं एखाद्या हीरॉईनच नाव असू शकेल ? आणि असं पुस्तक कुणी आवडीने वाचेल का? आहे …. असं नाव आणि पुस्तकं आहेत , आणि एक नव्हे तर 7 पुस्तकांची मालिकाच आहे ती . माझी ही विशेष आवडीची आहे कारण मोठ्यांच्या फँटसी पुस्तकांच्या दुनियेत तिथूनच मी प्रवेश केला.(अर्थात पहिले ३ भाग वाचून मी क्षणभर विश्रांती घेतलीये…गेले काही महिने ...)

खरं तर मला चांगली आणि चांगल्या रीतीने सांगितलेली कुठलीही गोष्ट आवडते. माझ्यासाठी चांगल्या गोष्टीची लक्षणं म्हणजे उत्तम रित्या लिहिलेली पात्रं, चांगली किंवा वाईट कशीही,पण आपल्या व्यक्तिरेखेशी प्रामाणिक, सच्च्या भावना,अनपेक्षित धक्के,वळणं, गूढ ,गुपिते, रहस्य, भरपूर संवाद, फार क्लिष्ट नसलेलं लिखाण,डोळ्यासमोर चित्र उभी करतील अशी जागांची,माणसांची वर्णनं .

पण तरीही मला ही fantasy सदरात बसणारी पुस्तकं वाचायला खूप आवडतात. खरं तर हा प्रकार लिहिणं थोडं कठीण. एक पूर्ण वेगळं जग निर्माण करायचं, त्याचे नियम बनवायचे ,विविध चांगली वाईट पात्र बनवायची, त्या पात्रांना थोडी हटके अशी नावं द्यायची. मग लढाया , जादू ,मग शेवटी चांगल्याचा विजय. हा साचा असला,तरी काही पुस्तकं ह्या साच्यातूनही काही वेगळं बनवू पाहतात.

कोणी काहीही म्हणो, पण ही पुस्तकं वाचून मला एक वेगळंच समाधान मिळतं. कुणी त्याला oversimplify का म्हणेनात. पण सर्व अडचणीचं समाधानकारक उत्तर मिळतं.शेवटी सर्व चांगले लोक आनंदाने नांदतात. ज्याची खात्री आयुष्य देऊ शकत नाही ,ते ह्या पुस्तकातून मिळतं , मग का वाचू नये ही पुस्तकं ?

पत्र लिहिण्यास कारण की....

हल्ली पत्र स्वरूपातील २ कादंबऱ्या वाचण्यात आल्या. हा लेखनाचा प्रकार मला खूप आवडला/आवडतो.( ह्याला इंग्रजीत epistolary असं म्हणतात.) कादंबऱ्या फार छान आहेत, त्याबद्दल नंतर कधीतरी. पण ह्या कादंबऱ्या वाचून मला माझा पत्रप्रपंच आठवला….

आम्ही खूप पत्र लिहायचो पूर्वी. माझी आई,मावशी,आजोबा खूप छान पत्र लिहायचे. माझी आई मला मी हॉस्टेलला राहत असताना रोज एक चिठ्ठी लिहायची आणि डब्यातून पाठवायची.अगदी साध्या साध्या गोष्टी, पण त्या दिलासा द्यायच्या.खूप वर्ष मी त्या जपून ठेवल्या होत्या.
माझ्या आईकडे ,तिला आणि मलाही , आलेली सर्व पत्र अजूनही जपून ठेवली आहेत. त्यात 'वाचून झालं की हे पत्र फाडून टाक'अशा मजकुराचे सुद्धा एक पत्र आहे. इतरही अनेक पत्र,ज्यातून त्या त्या वेळच्या अनेक आठवणी जाग्या होतात. माझ्या मावस भावाने एक छोटेखानी गोष्टवजा पत्र लिहिलं होतं. त्यांच्या घरासमोर घडणाऱ्या चित्तथरारक धरपकडी बद्दल मजेदार वर्णन केलं होतं.कधी मोठी पत्र लिहायला वेळ मिळाला नाही तर पोस्टकार्ड किंवा अगदी वाढदिवसाच्या शुभेच्छा पत्रातून चार ओळी लिहायच्या.

दुपारी पोस्टमन येण्याच्या वेळा ठरलेल्या असायच्या. सकाळी ११ ,दुपारी २.३० . त्यावेळी सारखा दाराजवळ वावर असायचा. आणि एकदा पत्र आलं की लगेच त्याचं उत्तर द्यायचं. ते पत्र पोस्टात टाकलं की दिवस मोजायला सुरुवात ,आता हे पत्र इथपर्यंत पोचल असेल, आता तिने वाचलं असेल, आता ती उत्तर लिहील आणि आता ती पोस्ट करेल. अर्थात सर्वच माझ्यासारखे आतुर नसत . मग कधी15 दिवसांनी तर कधी महिना दोन महिन्यांनी त्याचं उत्तर यायचं. ‘तू ...मामाच्या लग्नात साडी नेसणार की ड्रेस घालणार ?’असाही प्रश्न विचारलेला आठवतोय. ते पत्र मात्र वेळेत आलं असणार...नाहीतर काय उपयोग होता त्याचा ? एका पत्रात ‘ …. फार मस्ती करते. एकदा शेंगदाणा उचलून नाकात घातला. मग उचलून हॉस्पिटल मध्ये न्यावं लागला. फार धावपळ झाली.’ या मजकुराच पत्र आईने जपून ठेवलंय .

(पण जर घर सावरण्याची हुक्की आली तर माणूस निर्दय होऊन घरातला सर्व sentimental पसारा काढायला जातो. सुदैवाने आपल्या आधीची पिढी त्यातली नाही.)

जरी आपण एफबी आणि wa ला आज दोष देत असलो तरीही जेव्हापासून घराघरात फोन आले, साधे बरं का, मोबाईल नव्हे,तेव्हापासून पत्र लिहिणे कमी झाले. अर्थात बाहेर(म्हणजे फॉरेनला) असलेले आपले सुहृद पत्र लिहीत असत ,पण मोबाईल आल्यापासून तेही कमीच झालं. हळू हळू पत्र लिहिणं मागासलेल वाटायला लागलं. मग ई पत्र सुरू झाली,पण ती कामापुरतीच.

(तरीही गेल्या वर्षी खूप काळानंतर भेटलेल्या मैत्रिणींनी मला सुरेख इ मेल पाठवले होते.)

संवाद तर आता फोन आणि आता व्हॉटसअप मधूनही होतो. तरीही ही पत्र इतकी गोड का वाटतात ? फोनमधून विचार कळतात,खुशाली कळते,भावना कळतात.पण मला वाटतं भावनांइतकंच लिहिण्याला महत्व आहे. व्हाट्सप क्षणभंगुर .आपण सारेच रोज रात्री फोन साफसूफ करून झोपतो. पण पत्र राहतात.कधी कधी कित्येक वर्ष ठेवली जातात.पुन्हा काढून वाचली की पुन्हा गप्पा मारल्यासारख वाटत. पुन्हा आठवणींना उजाळा मिळतो.पत्रांना वैयक्तिक जिव्हाळ्याचा स्पर्श असतो.कुणीतरी मुद्दाम बसून, वेळ काढून,विचार करून आपल्यासाठी लिहिलंय, आपला विचार करून लिहिलंय,वॉट्सप्प सारखा येता जाता काहीतरी typela नाहीये.

….आणि मग,कधी कधी अशा पत्रांतून अशी एखादी कादंबरी जन्माला येते…

Tuesday, September 4, 2018

माझे minimalism चे प्रयोग : खरं तर शुभारंभाचे प्रयोग !

माझे minimalism चे प्रयोग : खरं तर शुभारंभाचे प्रयोग !

“सौ चुहे खाके बिल्ली हज को चली” असं कुणी म्हणालं तर म्हणू देत. पण तरीही आता डोक्यात आलंय म्हणजे करून बघायलाच हव.

पण खरोखरच तसच झालंय म्हणा...अती झाल्यानेच ही बुद्धी झाली. Collection collection म्हणता म्हणता इतक्या गोष्टी(म्हणजे मुख्यतः दोन गोष्टी - पुस्तकं आणि नेल पॉलिश) जमवल्या की त्या पुढील ४-५ वर्ष वापरूनही संपणार नाहीत.

मग स्वतः चा तिटकारा वगैरे ,”किती ही पैशाची नासाडी “असा मध्यमवर्गीय विचार… कधी ‘मी इतर कशावरही पैसे खर्च करत काही म्हणून केलं’अशी स्वतःची स्वतःला च दिलेली सफाई , तर कधी ‘हौसेला मोल नाही ‘अशी मखलाशी ! शेवटी स्वतःचा फारच राग आला तेव्हा यु ट्यूब वर minimalism या विषयावरचे व्हिडिओ डोळ्यासमोर आले.  म्हणजे योगायोगाने , पण आले खरे…. त्या देवाची अशीच इच्छा होती की काय देवच जाणे ,मग लगेच कपाटांची आवराआवरी , गोष्टी फेकून देण्याचा सिलसिला सुरू झाला. पण तिथेही मध्यमवर्गीय मनोवृत्ती आलीच एवढे माझे नेल पॉलिश- सरळ फेकून देऊ ? एवढे पैसे फुकट घालवू ? कुणी विकत घेईल का सेकंड हॅण्ड ? बरं नाही तर नाही - निदान कुणाला देऊन टाकू का ?  त्यामुळे सध्या तरी ते मी लपवून ठेवलेत स्वतःपासून , म्हणजे दृष्टीआड केलेत , टाकल्याच नाटक केलंय स्वतःशीच. बघुया पुढे काय होतंय ते. निदान अजून विकत घेण्याची दुर्बुद्धी झाली नाही पुढलं , एखादं वर्ष तरी बास म्हणते मी. एक प्रयोग सुरू केला मी - प्रत्येक नेल पॉलिश लावून बघण्याचा : हवं की नको ठरवण्यासाठी, पण जी नको होती, तीही टाकण्यासाठी मन धजावलं नाही …. मग आपली लपवणुक चालूच...

ह्याच योगे दुसरी गोष्ट - आपल्या फोन वरची अॅप कमी करणे. कारण सहज , वेळ जात नाही, थोडं लो वाटतंय म्हणून त्या अॅप वर वारंवार फेरफटका होतो माझा. त्यात “अरे वा , नवीन शेड दिसतेय , try केली पाहिजे. “असा विचार सतत मनात येतो. कधी तर आपल्याला काही रंग आवडत नाहीत, शोभून दिसत नाहीत हे माहीत असूनही केवळ फोटो छान आहे म्हणून खरेदी होते.

तेही कमी करण्याचे प्रयोग आधी झालेत , पण यशस्वी ठरले नाहीत , काही दिवसांनी त्या सर्व अॅप नी अत्यंत विजयी मुद्रेने माझा आयुष्यात पुनरागमन केलेच. त्यामुळे यावेळी मी अत्यंत धोरणीपणाने त्या सर्वांच्या ईमेलना सुद्धा unsubscribe केलंय.

आता बघू पुढे काय होतंय ते.

दुसरा मुख्य संग्रह पुस्तकांचा - मी वाचन खूप करते , पण त्याही पेक्षा जास्त पुस्तकं विकत घेते. कधी ebooks तर कधी physical books. कधी नवी तर कधी सेकंड हॅण्ड . महिन्याला १० वाचते पण २० विकत घेते, कशी वाचून होणार ती ? अगदी प्रत्येक वर्षी ,ना चुकता, १ जानेवारी ला संकल्प करते - एकही पुस्तक विकत घेणार नाही. पण वजन घटवण्याचा आणि हा संकल्प , कायम बाराच्या भावात जातो! इथे मात्र पुस्तक कमी करण्याचे उपाय आहेत - विकणे , रद्दीत देणे अथवा वाचनालयाला भेट देणे. पण इथेही ठरवलंय, इतक्या प्रेमाने घेतलेल्या पुस्तकांना संधी द्यायला हवी , थोडं वाचून बघते - बरं वाटलं तर ठेवते नाहीतर टाटा बाय बाय !

हे प्रयोग खरं तर कालपासूनच सुरु केलेत.हे घरातल्या इतर गोष्टींनासुद्धा लागू पडतात. उदा. वाण समान. उगाच ढीगभर गोष्टी आणून ठेवते, ‘ लागलं तर ’  असा विचार करून... खरं तर दुकान समोरच आहे , इतक्या वर्षांच्या संसारा नंतर आपल्याला खरं तर आपण काय आणि किती वापरू अंदाज येतोच, पण सुपर मार्केट मध्ये गेल्यावर मोह होतोच.  ठीक आहे - आज चुकले , उद्या सुधरेन असं म्हणत मजल दरमजल करायची….

पण मुळात मी इतकी वस्तूच्या मोहात पडणारी कधी ,कशी आणि का झाले ?

म्हणजे असं झालंय की एकदा वापरून टाकायचं किंवा वाचून टाकायचं या विचाराने मी हल्ली त्या गोष्टींची मजा घेणं सोडून दिलंय. हळू हळू,आस्वाद घेत , एखादं पुस्तक वाचायचं, कधी तरी , थोडं थांबून एखादं आवडलेल वाक्य, परिच्छेद, पान पुन्हा वाचायचं हे सर्व बंदच झालंय. भराभर वाचायचं आणि लोकांना सांगायचं - ब्लॉग वर ,goodreads वर…. हे उद्दीष्ट राहिलं आहे , तो लहानपणीचा काळ- जेव्हा एकच पुस्तक पुनः पुन्हा वाचायचे तो कधीच सरलाय , आता उरली आहे ती फक्त स्वतःशीच शर्यत. आणि दिखावा.

आणि हे minimalism चे प्रयोग मनातल्या विचारांवर सुद्धा करता येतील ? मेडिटेशन करून मन सुद्धा रिकामं करता येईल ? प्रयोग करून बघायला हवं….