एकटा जीव
दादा कोंडके यांचं हे प्रांजळ आत्मचरित्र कधी वाचेन असं खरंच वाटलं नव्हतं. त्यांचे चित्रपट म्हणजे फक्त निर्बुद्ध ,द्वयर्थी संवाद युक्त, सुमार अभिनय-गाणी असलेले असं माझं मत होतं. चित्रपटाबद्दल मतपरिवर्तन व्हावं असं काही घडलं नसलं तरी दादा कोंडके या व्यक्तीबद्दल मात्र उगाच मन कलुषित झालं होतं , “ जसे ते ,तसेच त्यांचे चित्रपट,” या ठाम गैरसमजुतीमुळे त्यांच्या विषयी काहीही वाचण्याच्या भानगडीत पडले नव्हते.
‘ पन्नाशीचा भोज्या ’ हे पुस्तक पुन्हा वाचताना ,दादांच्या प्रकरणाशी थबकले.वाटलं , अभ्यंकारांचं पुस्तक मला आवडलं आणि त्यांना दादांचं , मग आपणही ‘ एकटा जीव ‘ वाचायला हवं.
आत्मचरित्रात जर काहीच अशक्यप्राय , धक्कादायक नसेल तर ते बोर किंवा सपक नाहीतर अप्रामाणिक ,लपवाछपवी करणारं आहे असं वाटतं. याउलट काही गौप्यस्फोट असेल तर “ थापा तर नाहीत ना “ असं वाटत. आत्मचरित्र लिहिणे ही अशी तारेवरची कसरत ! पण मला असं वाटतं की आत्मचरित्र खरं की खोटं हे सांगणं कठीण -सारख्या घटनांचे पडसाद , त्यांचं interpretation प्रत्येकासाठी वेगळ असू शकतं.
Truth is never absolute, it is relative !
दादांनी आपला व्रात्य स्वभाव, गुंडगिरी ,शिक्षणातली एकूणच प्रगती याबद्दल प्रामाणिकपणे लिहिलंय,पण कुठेतरी स्वतःचे थोडेफार समर्थनही केलंय- गुंडागर्दीतुन आपल्याला पैसे कमवायचे नव्हते ,तर मिरवणे कधी मोठेपणा घेणे यासाठी हे सर्व उद्योग केले.
एका संघाच्या सामान्य सेवकापासून ते यशस्वी वगकर्त्यापर्यंतचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी . ‘ विच्छा माझी पुरी करा ‘ अत्यंत यशस्वी लोकनाट्य -माझ्या पिढीला ते मूळ संचात पाहता आलं नाही हे आमचे दुर्दैव . अत्यन्त हजरजबाबी,आणि पोट धरून हसायला लावणारे चुरचुरीत संवाद ज्यात चालू घडामोडींवर भाष्य असे -त्यामुळे प्रत्येक प्रयोग नवा वाटे. ३-४ तास चालणारे प्रयोग म्हणजे कलाकारांची जणू परीक्षाच !
त्यांचा बावळट,अजागळ ,लोम्बती नाडीवाली अर्धी विजार घातलेला अवतार चांगलाच प्रसिद्ध झाला. त्यांच्या जवळजवळ सर्वच चित्रपटांनी चांगली कमाई केली.दादांच्या मते शहरातले उच्चभ्रू लोक जरी त्यांच्या सिनेमाला नावं ठेवत असले तरी गुपचूप अंधारात हसत.ग्रामीण भागात त्यांचे सिनेमा खूपच लोकप्रिय होते.दादा म्हणतात, माझे चित्रपट चालले कारण त्या बावळट नायकात लोकांना आपले प्रतिबिंब दिसे ….
या व्यवसायात राहूनही पूर्णपणे निर्व्यसनी असा माणूस मिळणे दुर्मिळ -दादा तसेच होते.त्यांच्या प्रेमप्रकरणाची माहिती ,काही वेळा धक्कादायक (आशा भोसले), तर काही वेळा काहीशी अपेक्षित (उषा चव्हाण). मंगेशकर भगिनींबद्दलचे त्यांचे विचार खरे असतील असं वाटल्याशिवाय राहवत नाही.यातले सर्वात मनोरंजक प्रकरण म्हणजे ‘ शेणसार बोर्ड’ - जे दादांच्याच शब्दांत वाचायला हवे.
आयुष्याच्या शेवटी सर्व काही असूनही ते एकटे होते. त्यांची खंत,दुःख, एकटेपणा जाणवतो. ”पुढल्या जन्मी पैसे,मन,सन्मान नको ,पण प्रेमाची माणसे दे” - या पुस्तकाचे नाव सार्थक ठरवणारे दादांचे मनोगत.
या पुस्तकाचे शब्दांकन अनिता पाध्ये यांनी केलंय. यात कुठेही त्यांचा आवाज ऐकू येत नाही, दादांचं जाणवतात,यातच त्यांच्यातल्या लेखिकेचे यश आहे.